Big picks for third and fourth place | तिसऱ्या व चौथ्या स्थानासाठी मोठी चुरस
तिसऱ्या व चौथ्या स्थानासाठी मोठी चुरस

-अयाझ मेमन
याआठवड्याच्या शेवटी अत्यंत रोमांचक सामने झाले. या वेळी दोन महत्त्वाचे सामने झाले. पहिला सामना म्हणजे सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध चेन्नई सुपरकिंग्ज. पुण्यात झालेला हा सामना हैदराबाद सहजपणे जिंकेल असे वाटत होते. कारण त्यांनी यंदाच्या सत्रात मोठ्या धावसंख्येचा यशस्वी पाठलाग केला होता आणि छोट्या धावसंख्येचे यशस्वी संरक्षण केले होते. त्यामुळे चेन्नईविरुद्ध १७९ धावांची दमदार मजल मारल्यानंतर त्यांचा विजय गृहीत धरला जात होता. त्यांचे गोलंदाजी आक्रमण खूप मजबूत आहे. राशिद खान, भुवनेश्वर कुमार, शाकिब अल हसन असे तगडे गोलंदाज चेन्नईच्या फलंदाजांना रोखतील अशी अपेक्षा होती. मात्र असे काही झालेच नाही, त्याउलट चेन्नईने एक षटक राखून आणि केवळ २ फलंदाज गमावून विजय मिळवला. यामध्ये अंबाती रायडूने शानदार फलंदाजी केली. ज्या प्रकारे तो यंदाच्या सत्रात खेळला आहे, त्या जोरावर त्याचे भारतीय संघात पुनरागमन झालेच आहे. मात्र त्याशिवाय विश्वचषक संघात स्थान मिळवण्याचे त्याचे मुख्य लक्ष्य दिसत आहे. तो कोणत्याही स्थानावर फलंदाजी करू शकतो ही त्याची जमेची बाब आहे; शिवाय तो फिरकी आणि वेगवान गोलंदाजीही चांगल्या प्रकारे खेळतो. त्यासह क्षेत्ररक्षणही जबरदस्त आहे. त्यामुळे तो एक परिपूर्ण खेळाडू आहे.
प्ले आॅफविषयी म्हणायचे झाल्यास पराभवानंतरही हैदराबाद चेन्नईहून दोन गुणांनी पुढे आहे. या दोन्ही संघांनी प्ले आॅफमधील स्थान निश्चित केले असले, तरी दोघांमध्ये अव्वल स्थान मिळवण्याची स्पर्धा लागली आहे. बाकीच्या दोन संघांविषयी मात्र खूप चुरस लागली असून ते दोन संघ कोणते असतील याविषयी काहीही सांगता येणार नाही. दिल्लीचा अपवाद वगळता बाकी सर्व संघ प्ले आॅफच्या शर्यतीत कायम आहेत. मुंबई इंडियन्स आणि राजस्थान रॉयल्स यांना सरासरीच्या गणिताच्या जोरावर अधिक संधी आहे. तीच बाब रॉयल चॅलेंजर्स बँगलोरबाबत आहे. पण किंग्ज इलेव्हन पंजाब आणि कोलकाता नाइट रायडर्स या दोन संघांपैकी एकानेही आपल्या पुढील लढती गमावल्या, तर तळाच्या तीन संघांसाठी मोठी संधी निर्माण होईल.
रविवारी वानखेडे स्टेडियमवर झालेला मुंबई इंडियन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स सामना शानदार ठरला. मुंबई आपली विजयी लय कायम राखण्यात यशस्वी ठरेल अशी आशा होती. त्यात वानखेडे स्टेडियमवर लढत असल्याने त्यांच्या विजयाची शक्यता जास्त होती. मात्र तसे झाले नाही आणि याचे प्रमुख कारण म्हणजे जोस बटलरची धमाकेदार फलंदाजी. गेल्या ५-६ सामन्यांपासून तो सात्यत्याने अर्धशतक झळकावत आला आहे. बटलर ज्या प्रकारे खेळतो ते पाहता त्याला सुरुवातीपासून राजस्थानने सलामीला का नाही खेळवले याचे आश्चर्य वाटते. कारण जर का तो सलामीला सुरुवातीपासून खेळला असता, तर राजस्थानचे २-४ गुण अधिक झाले असते. दरम्यान, बटलरच्या या खेळीमुळे आता राजस्थानच्या प्ले आॅफच्या आशा खूप उंचावल्या आहेत.
सूर्यकुमार यादव आणि एविन लेविस यांनी चांगली सुरुवात करून दिल्यानंतरही मुंबईला मोठी धावसंख्या उभारण्यात अपयश आले. कर्णधार रोहित शर्मासाठी यंदाचे सत्र संमिश्र राहिले आहे. त्याच्या कामगिरीचा आलेख हा चढ-उताराचा राहिला आहे. एकूणच यंदाच्या सत्रात मुंबईसाठी लेविस, पांड्या बंधू, मयांक मारकंडे यांचे योगदान चांगले, तर सूर्यकुमार यादवचे जबरदस्त योगदान राहिले आहे. पण रोहितच्या कामगिरीत राहिलेला सातत्याचा अभाव मुंबईसाठी सर्वांत मोठा धक्का आहे.

(संपादकीय सल्लागार)


Web Title: Big picks for third and fourth place
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.