मुंबई - श्रीलंकेविरुद्ध होणाऱ्या तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या दोन कसोटी सामन्यांसाठी भारतीय संघाची घोषणा शुक्रवारी करण्यात आली आहे. या सामन्यांसाठी भारतीय संघात मोठे फेरबदल करण्यात आले नसले तरी धडाकेबाज अष्टपैलू क्रिकेटपटू हार्दिक पांड्या याला विश्रांती देण्यात आली आहे. मात्र पांड्याच्या जागी कुठल्याही खेळाडूची निवड करण्यात आलेली नाही. 

24 वर्षीय हार्दिक पांड्याने तडाखेबंद फलंदाजी आणि उपयुक्त गोलंदाजीच्या जोरावर अल्पावधीतच भारतीय संघातील स्थान पक्के केले आहे. इंग्लंडमध्ये झालेल्या चॅम्पियन्स ट्रॉफीपासून पांड्या सातत्याने खेळत आहे. श्रीलंकेमधील कसोटी मालिकेतही त्याचा संघात समावेश होता. "भारताच्या वरिष्ठ
 संघाच्या निवड समितीने अष्टपैलू हार्दिक पांड्याला श्रीलंकेविरुद्धच्या आगामी कसोटी मालिकेसाठी संघातून विश्रांती देण्याचा निर्णय घेतला आहे. सातत्याने खेळत असल्याने पांड्यावर ताण पडत आहेत. त्यामुळे संभाव्य दुखापत टाळून फिट ठेवण्यासाठी पांड्याला विश्रांती देण्यात आल्याने बीसीसीआयने आपल्या पत्रकात म्हटले आहे. 

दरम्यान, भारताविरुद्ध मागील दौ-यातील खराब कामगिरीतून मोठा बोध घेतला आहे. मात्र आता आमचा संघ पूर्वीच्या तुलनेत सरस असल्याने यजमान संघाविरुद्ध दडपण घेणार नाही, असे श्रीलंका संघाचे मुख्य कोच नीक पोथास यांनी म्हटले आहे. भारताने लंका दौ-यात यजमान संघाचा तीन कसोटी, पाच वन डे आणि एका टी-२० सामन्यात यजमान संघाला धूळ चारीत सलग नऊ विजयांची नोंद केली होती.  पोथास म्हणाले, ‘तो पराभव न आठवलेला बरा. भारताविरुद्ध भारतात खेळायचे म्हटले तर दडपण जाणवणारच. भारताविरुद्ध पराभवानंतर लंकेने यूएईत पाकला कसोटी मालिकेत २-० ने पराभूत केले. भारताविरुद्ध काय चुका झाल्या आणि त्या कशा सुधारायच्या, यावर मंथन केल्यानंतर पाकविरुद्ध विजय मिळविण्यात यश आले होते.’

भारत आणि श्रीलंकेमधील तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेला 16 नोव्हेंबरला ईडन गार्डनवर होणाऱ्या कसोटी सामन्याने सुरुवात होणार आहे. श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या दोन कसोटी सामन्यांसाठी निवडण्यात आलेला भारतीय संघ पुढीलप्रमाणे आहे. 

भारतीय संघ 
विराट कोहली (कर्णधार), के. एल. राहुल. मुरली विजय, शिखर धवन, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, रोहित शर्मा, वृद्धिमान साहा (यष्टिरक्षक),  रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, उमेश यादव, भुवनेश्वर कुमार,  इशांत शर्मा. 


Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.