वाडेकर... मॅच विनर, मॅच मेकर, ब्रँड अॅम्बेसिडर! 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2018 01:35 PM2018-08-16T13:35:49+5:302018-08-16T13:52:32+5:30

whatsapp join usJoin us
Ajit Wadekar... match winner, match maker, brand ambassador! | वाडेकर... मॅच विनर, मॅच मेकर, ब्रँड अॅम्बेसिडर! 

वाडेकर... मॅच विनर, मॅच मेकर, ब्रँड अॅम्बेसिडर! 

whatsapp join usJoin usgoogleNewsNext
ठळक मुद्देऐतिहासिक कसोटीत वाडेकर यांना माझे वडील दिवंगत दिलीप सरदेसाई यांनी धावबाद केले.1970 आणि 1990 सालात वाडेकर यांनी भारतीय फिरकीपटूंना प्रतिस्पर्धी संघांवर वर्चस्व गाजवण्याचे स्वातंत्र्य दिले.

वाडेकर सरांना भावपूर्ण श्रद्धांजली...

इंग्लंडविरूद्ध 1971 साली ओव्हल मैदानावर मिळवलेल्या ऐतिहासिक विजयाच्यावेळी अजित वाडेकर कुठे होते? ते ड्रेसिंग रूममध्ये कदाचित झोपले होते. त्यामुळेच त्या विजयानंतर ते किंचितसे गोंधळलेले वाटले. काही वर्षांनंतर मी त्यांना हा किस्सा खरा होता का, असे विचारले. त्यावर त्यांनी हो आणि नाही, असे उत्तर दिले. ते म्हणाले,'मी झोपण्याचा प्रयत्न करत होतो, परंतु काहीकाळ मी डोळे बंद करून बसलो होतो. त्यामुळे आम्ही विजयानजीक पोहोचल्यावरही मी अतिउत्साही झालो नाही.' 

या ऐतिहासिक कसोटीत वाडेकर यांना माझे वडील दिवंगत दिलीप सरदेसाई यांनी धावबाद केले.  1958सालापासून हे दोन मुंबईचे फलंदाज सोबत खेळत आहेत आणि या राईट-लेफ्ट हँडेड फलंदाजांनी अनेक विक्रमी भागीदारी केल्या आहेत. वेस्ट इंडिज दौ-यावर भारतीय संघात माझ्या वडीलांना घेण्याचा वाडेकर यांनी आग्रह धरला होता. नवाब पतौडी यांना कर्णधारपदावरून हटवल्यानंतर वाडेकरांकडे नेतृत्व सोपवण्यात आले होते आणि त्यांच्यावर विश्वास ठेवणारा कोणीतरी संघात असायला हवा, यासाठी वाडेकरांचा तो आग्रह होता. वैयक्तिक बाँडिंग असूनही माझे वडील आणि वाडेकर यांच्यातील रनिंग बिटवीन विकेटमधील ताळमेळ तितकासा चांगला नव्हता... त्या सामन्यात चुकीचा कॉल कोणी दिला होता?, असा प्रश्न मी त्यांना विचारला. त्यावर ते म्हणाले होते,' तू मला विचारशील तर तो दिलप्याचा कॉल होता, परंतु हाच प्रश्न वडिलांना विचारशील, तर ती धाव पूर्ण होऊ शकली असती, असं ते सांगतील.' 

हा दौरा वाडेकर यांना यशस्वी कसोटी कर्णधार म्हणून बहुमान मिळवून देणारा होता. सहा महिन्यांच्या कालावधीत भारतीय संघाने वेस्ट इंडिज आणि इंग्लंडला त्यांच्याच मायभूमीत पराभूत करण्याचा पराक्रम केला होता. परदेशातील या दोन मालिका विजयांनी भारतीय खेळाडूंमध्ये आत्मविश्वास निर्माण केला. कारण, परदेशात विजयांपेक्षा भारताचा पराभवाचा आकडा मोठा होता. मालिका विजयानंतर संघ मायदेशात परतला त्यावेळी मुंबईत रस्त्याच्या दुतर्फा भारतीय संघातील नव्या नायकाच्या स्वागतासाठी गर्दी जमली होती. मात्र, तीन वर्षांनंतर म्हणजेच 1974 मध्ये भारतीय संघ इंग्लंडमध्ये पराभूत झाला होता, त्यावेळी याच चाहत्यांनी वाडेकरांच्या घरावर दगड फेकले होते. भारतीय क्रिकेट चाहत्यांच्या अस्थिर मनोवृत्तीचे ते उदाहरण होते. 

कर्णधार म्हणून वाडेकरांना नशीब घेऊन आलेले असे काहीवेळा बोलण्यात आले, परंतु क्रिकेटमध्ये तुम्हाला स्वतःचे नशीब स्वतः घडवायचे असते. वाडेकर चतूर होते आणि शांत स्वभावामुळे त्यांना योग्य सामना जिंकता आला. 1990च्या दशकात व्यवस्थापक आणि प्रशिक्षक म्हणून त्यांनी मोहम्मद अझरुद्दीनच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय युवा खेळाडूंना मार्गदर्शन करण्याची भूमिका पार पाडली. त्यांनी सचिन तेंडुलकरलाही अनेक सामन्यांत मार्गदर्शन केले. 1970 आणि 1990 सालात वाडेकर यांनी भारतीय फिरकीपटूंना प्रतिस्पर्धी संघांवर वर्चस्व गाजवण्याचे स्वातंत्र्य दिले. परदेशी संघांविरूद्ध फिरकी हेच आपले प्रमुख अस्त्र आहे, असा त्यांचा विश्वास होता. 

माझ्या पत्रकारितेच्या सुरुवातीचा एक किस्सा आठवतो. वाडेकर यांनी मला त्यांच्या घरी भोजनासाठी बोलावले होते. त्या रात्री क्रिकेटच्या भरपूर गप्पा रंगतील या आशेने मी होकार दिला. त्यांनी एका तरुणीलाही जेवणाचे निमंत्रण दिले होते आणि ते आमची जोडी जमवू पाहत होते. 'मुलीचे कुटुंब चांगले आहे, मुलगीही चांगली आहे, तुला ती आवडेल,' असे ते मला सांगत होते. अरेंज मॅरेज ही संकल्पना माझ्या डोक्यात नव्हती आणि मी ज्या आशेने गेलो, तसे काहीच घडले नाही.' तुला माहितीय मी बँकेत काम केले आहे. त्यामुळे मी तुला हा सोपा पर्याय सुचवत आहे,' असे बोलून मोठ्याने हसत वाडेकर यांनी सिगारेटचा झुरका घेतला.  

असे होते वाडेकर. क्रिकेटमधील 1970च्या दशकातील अमोल पालेकर असे मी वाडेकरांना संबोधले होते. महाराष्ट्रातील मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मलेला हा नायक... सफेद शर्ट, काळी ट्राऊझर आणि कोल्हापूरी चप्पल असा त्यांचा पेहराव होता. मीडियाला सध्या हवा असलेल्या क्रिकेटपटूंप्रमाणे झगमगाटाचे त्यांचे रहाणीमान नक्की नव्हते, परंतु त्यांच्या काळीतील ते आदर्श ब्रँड अॅम्बेसिडर होते. त्यांनी भारतीय आणि स्टेट बँक ऑफ इंडिया क्रिकेटला दिलेले योगदान, याला तोड नाही. ' मी SBI शी लग्न केले आहे,' असे त्यांनी मला एकदा सांगितले होते. 

त्यांनी भारतीय क्रिकेटशीही विवाह केला होता आणि सर्वाधिक रणजी करंडक जेतेपदांमध्ये वाडेकर यांचा सहभाग होता. त्यात तिहेरी शतकाचाही समावेश आहे. आम्हाला तुमची आठवण सदैव येत राहील... तुमच्या आत्म्याला शांती लाभो... 
पत्रकार, संपादक राजदीप सरदेसाई यांच्या फेसबुक  वॉलवरून...

Web Title: Ajit Wadekar... match winner, match maker, brand ambassador!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.