‘एबी’च्या निवृत्तीने क्रिकेटविश्वाचे नुकसान झाले आहे

आयपीएल शानदार पद्धतीने खेळल्यानंतर कोणाच्याही ध्यानीमनी नसताना त्याने हा मोठा निर्णय घेतला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2018 12:17 AM2018-05-25T00:17:00+5:302018-05-25T00:17:00+5:30

whatsapp join usJoin us
Abby's retirement has led to loss of cricket | ‘एबी’च्या निवृत्तीने क्रिकेटविश्वाचे नुकसान झाले आहे

‘एबी’च्या निवृत्तीने क्रिकेटविश्वाचे नुकसान झाले आहे

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

अयाझ मेमन

दक्षिण आफ्रिकेचा धडाकेबाज खेळाडू एबी डिव्हिलियर्सच्या निवृत्तीच्या अनपेक्षित वृत्ताने बुधवारी क्रिकेटविश्वात खळबळ माजली. त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या सर्व प्रकारांतून निवृत्ती घेत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. आयपीएल शानदार पद्धतीने खेळल्यानंतर कोणाच्याही ध्यानीमनी नसताना त्याने हा मोठा निर्णय घेतला; आणि त्यामुळेच सारे क्रिकेटविश्व स्तब्ध झाले. ‘मी आता थकलो आहे आणि यापुढे आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळू शकणार नाही,’ असे सांगत त्याने निवृत्ती घेतली. त्याच्या निर्णयाचा मोठा धक्का दक्षिण आफ्रिका क्रिकेटसाठी आहे. कारण पुढच्याच वर्षी विश्वचषक स्पर्धा होणार आहे; आणि त्याआधीच एबीने निवृत्ती घेतली. केवळ विश्वचषक स्पर्धेची ट्रॉफी एकमेव अशी आहे, जी एबीकडे नाही.
तो कशा प्रकारचा फलंदाज होता, हे सांगण्यासाठी मला वाटतं शब्दांची खूप कमतरता भासेल. माझ्या मते तो त्याच्या काळातील जगातील सर्वोत्तम फलंदाज आहे. जेव्हापासून त्याने आंतरराष्ट्रीय पदार्पण केले, तेव्हापासून एबीहून चांगला फलंदाज कोणी दिसला नाही. तो संयमी खेळी खेळू शकत होता, कसोटीत दीर्घ खेळी करू शकत होता, धुवाधार फलंदाजीही करू शकत होता. एकदिवसीय क्रिकेटमध्ये एबीच्या नावावर अनेक विक्रम आहेतच, त्याशिवाय टी२० क्रिकेटमध्येही त्याने शानदार कामगिरी केलेली आहे.
आयपीएलमध्येही एबीची दमदार खेळी सर्वांनीच अनुभवली आहे. याशिवाय तो अद्भुत क्षेत्ररक्षकही आहे. एकूणच एबी हा नैसर्गिक अ‍ॅथलिट आहे, असेच म्हणावे लागेल. गेल्या १५-२० वर्षांत क्वचितच त्याच्याशी तुलना होऊ शकणारा एखाद-दुसरा खेळाडू पाहिला असेल. त्यामुळे त्याच्यासारखा खेळाडू गमावणे केवळ दक्षिण आफ्रिकेसाठीच नाही, तर संपूर्ण क्रिकेटविश्वासाठी नुकसानकारक आहे. एबीच्या निवृत्तीनंतर क्रिकेट खूप निरस झाले आहे. पण आता आपण ‘वेल प्लेड सर.. अ‍ॅण्ड आॅल दी बेस्ट टू यू’ एवढेच म्हणू शकतो.
दुसरीकडे आयपीएलच्या दुसऱ्या क्वालिफायर सामन्याची उत्सुकता ताणली गेली आहे. कोलकाता नाइट रायडर्सने दमदार विजयासह आगेकूच करताना सनरायझर्स हैदराबादपुढे कडवे आव्हान उभे केले आहे. या सामन्यातील विजयी संघ अंतिम फेरीत चेन्नई सुपरकिंग्जविरुद्ध भिडेल. एलिमिनेटर सामन्यात कोलकाताने राजस्थान रॉयल्सला २५ धावांनी पराभूत करत शानदार विजय नोंदवला. २५ धावांनी मिळवलेला विजय टी२० सामन्यात खूप मोठा असतो. पण माझ्या मते राजस्थानने या सामन्यात विजय मिळवण्याची मोठी संधी गमावली. १७० धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना राजस्थानने १ बाद १०९ धावा अशी सुरुवात केली होती. अजिंक्य रहाणे - संजू सॅमसन पूर्णपणे नियंत्रित फलंदाजी करत होते. पण यानंतर रहाणे व सॅमसनकडून दोन खराब फटके खेळले गेले आणि सामन्याचे चित्रच पालटले.
हे दोन बळी गेल्यानंतर राजस्थानला मोठा फटका बसला. त्यांच्याकडे जोस बटलर नव्हता, बेन स्टोक्सही नव्हता. पण तरीही माझ्या मते त्यांनी थोडी चतुराई, संयम आणि हिंमत दाखवली असती तर त्यांच्याकडून हे लक्ष्य पूर्ण झाले असते. परंतु, रहाणे - सॅमसननंतर राजस्थानच्या फलंदाजीत कोणताच दम दिसून आला नाही.
त्याचवेळी कोलकाता आणि खासकरून कर्णधार दिनेश कार्तिकला दाद द्यायला हवी. त्याने शानदार अर्धशतकासह कल्पक नेतृत्व केले. तसेच फिरकीपटूंचाही चांगला वापर केला. आंद्रे रसेलचीही धुवाधार फटकेबाजी निर्णायक ठरली. कमी धावसंख्येच्या सामन्यात एक किंवा दोन खेळाडू चमकतात आणि कोलकातासाठी नेमकी हीच बाब घडली. राजस्थानसाठीही काही खेळाडू चमकले; पण त्यांच्यात अंतिम ध्येयापर्यंत पोहचण्याचा जोश दिसला नाही.

Web Title: Abby's retirement has led to loss of cricket

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.