तलावाच्या निकृष्ट कामामुळे जैतापूरवासीयांवर पाणी संकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2018 10:28 PM2018-05-27T22:28:31+5:302018-05-27T22:28:43+5:30

भूगर्भातील खालावलेली पाण्याची पातळी व दिवसेंदिवस निर्माण होणारी पाणी समस्या सोडविण्याच्या दृष्टिकोणातून जैतापूर येथे तत्कालीन आमदार सुभाष धोटे यांनी गाव तलावाच्या कामाचे भूमीपूजन केले. यातून जैतापूरवासीयांची पाणी समस्या सोडविण्याचा प्रयत्न होता. परंतु अकार्यक्षम अभियंता व कंत्राटदार यांच्या दुर्लक्षतेमुळे व निकृष्ट कामामुळे या तलावाचे काम पाच वर्षे लोटूनही अपूर्ण आहे. त्यामुळे गावकऱ्यांना पाणी समस्येला तोंड द्यावे लागत आहे.

Water crisis on the people of Jaitapur due to the poor work of the lake | तलावाच्या निकृष्ट कामामुळे जैतापूरवासीयांवर पाणी संकट

तलावाच्या निकृष्ट कामामुळे जैतापूरवासीयांवर पाणी संकट

Next
ठळक मुद्देपाच वर्षानंतरही काम अर्धवट : लोकप्रतिनिधींनी लक्ष देण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्क
सास्ती : भूगर्भातील खालावलेली पाण्याची पातळी व दिवसेंदिवस निर्माण होणारी पाणी समस्या सोडविण्याच्या दृष्टिकोणातून जैतापूर येथे तत्कालीन आमदार सुभाष धोटे यांनी गाव तलावाच्या कामाचे भूमीपूजन केले. यातून जैतापूरवासीयांची पाणी समस्या सोडविण्याचा प्रयत्न होता. परंतु अकार्यक्षम अभियंता व कंत्राटदार यांच्या दुर्लक्षतेमुळे व निकृष्ट कामामुळे या तलावाचे काम पाच वर्षे लोटूनही अपूर्ण आहे. त्यामुळे गावकऱ्यांना पाणी समस्येला तोंड द्यावे लागत आहे.
जिल्हा परिषद लघु सिंचन उपविभाग राजुरा अंतर्गत कोरपना-राजुरा तालुक्याच्या सीमेवरील जैतापूर येथील तलावाच्या कामासाठी २० लाख ३९ हजार ६२ रुपये खर्चाची तरतूद करण्यात आली. या तलावाचे काम चंद्रपूर येथील कंत्राटदाराला देण्यात आले व नियमाप्रमाणे नोव्हेंबर २०१३ मध्ये या कामाचे भूमीपूजन करून कामाला सुरुवात झाली. मात्र, आज पाच वर्षाचा कालावधी लोटूनही गाव तलावाचे काम पूर्ण झाले नसल्याने जैतापूर येथील नागरिकांना पाण्यासाठी वनवन भटकावे लागत आहे.
गावातील हातपंपाचे, विहिरीतील पाण्याची पातळी वाढेल व मुक्या जनावरांना पिण्यासाठी पाणी मिळेल या दृष्टीकोणातून गावालगतच या तलावाचे काम सुरू करण्यात आले होते. मात्र सुरुवातीपासूनच अभियंत्याच्या आशिर्वादाने तलावाचे काम निकृष्ठ दर्जाचे झाल्याने पहिल्याच पावसाळ्यात तलावाच्या पाळीला भगदाड पडले. परिणामी तलावातील पाणी वाहून गेले. त्यानंतर कंत्राटदार व तत्कालीन अभियंत्याची तक्रार करण्यात आली. त्यानंतरही काम करण्यात आले. मात्र सध्यास्थितीत काम अपूर्ण आहे.

प्रशासनाच्या कार्यप्रणालीवरच प्रश्नचिन्ह
शासन गावे दुष्काळमुक्त करण्यासाठी प्रभाविपणे योजना राबवित आहे. तर दुसरीकडे एका तलावाचे काम करण्यासाठी पाच वर्षे लागत आहे. गावातील बोअरवेलची व जमिनीतील पाण्याची पातळी वाढेल, यासाठी गाव तलावाचे काम सुरू करण्यात आले. मात्र अकार्यक्षम अभियंत्याच्या आशिर्वादाने कंत्राटदाराने निकृष्ठ दर्जाचे काम केले. परिणामी डिसेंबर, जानेवारी महिन्यातच पाण्याने तळ गाठला. पाच वर्षे लोटूनही गाव तलावाचे काम होत नसल्याने प्रशासनाच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह निर्माण होत असून याकडे लक्ष देण्याची मागणी गावकºयांकडून होत आहे.

यावर्षी पाऊस कमी पडल्यामुळे तलाव पाण्याने भरला नाही. त्यामुळे तलाव कामाची पाहणी करता आली नाही. यावर्षी तलाव पाण्याने भरल्यास पाणी लिकेज होत तर नाही ना, याची पाहणी करून योग्य ती दुरुस्ती करण्यात येणार आहे. जे काम बाकी आहे, ते काम पूर्ण केल्याशिवाय कंत्राटदाराचे बिल अदा केले जाणार नाही.
- बी. एस. भालेराव,
उपविभागीय अधिकारी
जिल्हा परिषद लघु सिंचाई उपविभाग राजुरा

Web Title: Water crisis on the people of Jaitapur due to the poor work of the lake

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.