दोन विभिन्न नक्षलविरोधी कारवाईत दोघांचा खात्मा तर दोघे अटकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2018 10:43 AM2018-02-10T10:43:10+5:302018-02-10T10:46:19+5:30

गडचिरोली जिल्ह्यातील लाहेरी पोलिसांना वॉन्टेड असलेल्या दोन जहाल नक्षलवाद्यांना नक्षल सेलच्या पथकाने चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर रेल्वे स्टेशन परिसरातून अटक केली.

Two naxal arrested and two dead in two separate anti-Naxal operations | दोन विभिन्न नक्षलविरोधी कारवाईत दोघांचा खात्मा तर दोघे अटकेत

दोन विभिन्न नक्षलविरोधी कारवाईत दोघांचा खात्मा तर दोघे अटकेत

Next
ठळक मुद्देबल्लारपुरात नक्षल सेलची मोठी कारवाई राजनांदगाव जिल्ह्यात चकमक

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर/ गोंदिया : गडचिरोली जिल्ह्यातील लाहेरी पोलिसांना वॉन्टेड असलेल्या दोन जहाल नक्षलवाद्यांना नक्षल सेलच्या पथकाने चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर रेल्वे स्टेशन परिसरातून अटक केली. ही कारवाई शुक्रवारी सकाळच्या सुमारास करण्यात आली. तर मध्य प्रदेश, छत्तीसगड व गोंदिया या परिसरासाठी नक्षलवाद्यांच्या प्लाटून नं. ५५ च्या डेप्युटी कमांडर व एक सदस्य अशा दोघांचा छत्तीसगडच्या राजनांदगाव पोलिसांनी शुक्रवारी (दि.९) सकाळीच झालेल्या चकमकीत खात्मा केला. त्यांच्यावर १० लाख रुपयांचे बक्षीस होते.
विनोद ऊर्फ दावेन सेरकुराम कोरेटी (२६) रा. कोसमी नं. १, सावरगाव, ता. कोरची, जि. गडचिरोली व सागर (२८) बस्तर (छत्तीसगड), अशी मृत नक्षल्यांची नावे असून रामन्ना आणि पद्मा अशी बल्लारपुरातून अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. या दोन्ही नक्षलवाद्यांवर गडचिरोली जिल्ह्यातील लाहेरी पोलीस ठाण्यात विविध गुन्हे दाखल आहेत. हे दोन्ही नक्षलवादी बल्लारपुरात असल्याची गोपनीय माहिती नक्षल सेलच्या पथकाला मिळाली. या माहितीवरून जिल्हा पोलीस अधीक्षक नियती ठाकर यांच्या मार्गदर्शनाखाली नक्षल सेलचे पोलीस उपनिरीक्षक धर्मेंद्र मडावी यांनी आपल्या ताफ्यासह सर्च मोहीम राबविली. दरम्यान बल्लारपूर रेल्वे स्टेशन परिसरात रामन्ना आणि पद्मा संशयितरीत्या फिरताना आढळले. दोघांनाही ताब्यात घेण्यात आले. चौकशी केली असता दोघांनीही गुन्ह्यााची कबुली दिली. दरम्यान, हे दोन्ही नक्षली गडचिरोली पोलिसांना हवे असल्याने त्यांना याबाबत माहिती देण्यात आली. दुपारी ४ वाजताच्या सुमारास दोन्ही नक्षलवाद्यांना गडचिरोली पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले.
राजनांदगाव जिल्ह्यातील गातापार पोलीस ठाण्यांतर्गत आयटीबीपी व मध्य प्रदेशच्या हॉक फोर्सने संयुक्त कारवाई केली. विनोद कोरेटी याच्यावर आठ लाखाचे तर सागरवर दोन लाखाचे बक्षीस होते. या चकमकीत दोन शस्त्र राजनांदगाव पोलिसांनी जप्त केले.
विशेष म्हणजे राजनांदगाव आणि मध्य प्रदेश पोलिसांनी या नक्षलवाद्यांचा खात्मा केल्यानंतर त्यांची ओळख पटली नव्हती. परंतु गोंदिया पोलिसांच्या मदतीने ही ओळख पटविण्यात आली. १२ एप्रिल २०१७ रोजी गोंदिया पोलिसांनी नक्षलवाद्यांच्या क्षेत्र विस्तार कमिटीचा उच्चस्टॉपमधील रमेश कोसा टेकाम ऊर्फ बामन कोसा माडवी (१९) रा. सूरनार, ता. नकूलनार, जि. दंतेवाडा याला सालेकसा पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या मुरकुटडोह येथे अटक करण्यात आली होती. त्याने या मृत नक्षलवाद्यांची माहिती व फोटो गोंदिया पोलिसांना उपलब्ध करवून दिली होती. त्यामुळे या मृत नक्षलवाद्यांची ओळख पटविण्यात गोंदिया पोलिसांची कामगिरी महत्वाची ठरली.

रामन्नावर होते २५ लाखांचे बक्षीस
रामन्ना हा दंडकारण्य स्पेशल झोनल कमिटीचा मेंबर असून त्याला पकडून देण्यासाठी २५ लाखांचे बक्षीस जाहीर करण्यात आले आहे. तर पद्मा ही एरिया कमिटीची मेंबर आहे. तिच्यावर सहा लाखांचे बक्षीस जाहीर करण्यात आले. रामन्ना हा मूळचा हैदराबाद राज्यातील असून तो छत्तीसगड, मध्य प्रदेश व महाराष्ट्र राज्यातील नक्षल चळवळीत सक्रिय होता. नक्षल चळवळीत तो तांत्रिक बाबी सांभाळायचा, अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक नियती ठाकर यांनी दिली.

Web Title: Two naxal arrested and two dead in two separate anti-Naxal operations

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.