चंद्रपुरातील बाराही इच्छुक अपात्र; बाहेरचा उमेदवार येणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2019 10:49 PM2019-03-19T22:49:33+5:302019-03-19T22:50:03+5:30

चंद्रपूर लोकसभा मतदार संघात काँग्रेसकडून तब्बल १२ जण इच्छुक असताना पक्षश्रेष्ठींनी नागपूरचे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी केंद्रीय मंत्री विलास मुत्तेमवार यांचे चिरंजीव विशाल मुत्तेमवार यांची उमेदवारी जवळजवळ निश्चित केल्याची चर्चा सर्वत्र सुरू झाली आहे. पक्षश्रेष्ठींनी यामागे नक्कीच मोठे गणित जुळविले असावे, असा तर्क लावला जात असला तरी अचानक पुढे आलेला हा नवा व बाहेरचा चेहरा काय जादू करतो हे बघण्यासारखे आहे.

Twelve people in Chanderpur are ineligible; Outgoing candidate will come | चंद्रपुरातील बाराही इच्छुक अपात्र; बाहेरचा उमेदवार येणार

चंद्रपुरातील बाराही इच्छुक अपात्र; बाहेरचा उमेदवार येणार

Next
ठळक मुद्देअधिकृत घोषणा बाकी : काँग्रेस बालेकिल्ला परत मिळविणार?

राजेश भोजेकर।
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : चंद्रपूर लोकसभा मतदार संघात काँग्रेसकडून तब्बल १२ जण इच्छुक असताना पक्षश्रेष्ठींनी नागपूरचे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी केंद्रीय मंत्री विलास मुत्तेमवार यांचे चिरंजीव विशाल मुत्तेमवार यांची उमेदवारी जवळजवळ निश्चित केल्याची चर्चा सर्वत्र सुरू झाली आहे. पक्षश्रेष्ठींनी यामागे नक्कीच मोठे गणित जुळविले असावे, असा तर्क लावला जात असला तरी अचानक पुढे आलेला हा नवा व बाहेरचा चेहरा काय जादू करतो हे बघण्यासारखे आहे.
विलास मुत्तेमवार हे चिमूर लोकसभा मतदार संघात तीनदा खासदार होते. यानंतर त्यांनी आपला मोर्चा नागपूरकडे वळविला होता. त्यांचे चंद्रपूर जिल्ह्याशी असलेले हेच नाते त्यांचे चिरंजीव विशाल मुत्तेमवारांसाठी चंद्रपूर लोकसभा मतदार संघात उमेदवारी बहाल करण्याला कारणीभूत असल्याचेही बोलले जात आहे. विशाल मुत्तेमवार हे तरुण आहेत. त्यांचा चारदा व लागोपाठ तीनदा चंद्रपूर लोकसभा मतदार संघाचे नेतृत्त्व करीत असलेले हंसराज अहीर यांच्याशी सामना आहे. एकीकडे राजकारणाचा दिर्घ अनुभव असलेला उमेदवार आणि दुसरीकडे दीर्घ अनुभव असलेल्या कुटुंबातील उमेदवार अशी ही लढत चंद्रपूरकरांना बघायला मिळण्याची शक्यता आहे.
लोकसभा निवडणुकीची चाहुल लागल्यापासूनच चंद्रपूरचा काँग्रेसचा उमेदवार कोण? या प्रश्नाचे उत्तर अन्य राजकीय पक्षांसह मतदारही शोधत होते. तब्बल १२ जण इच्छुक असल्याचे पक्षाने घेतलेल्या मुलाखतीतून पुढे आले होते. ही सर्व नावे चंद्रपूर लोकसभा मतदार संघातीलच होती. यापैकी एकाला तिकीट मिळेल असे बोलले जात आहे. अशातच शिवसेनेचे वरोरा-भद्रावतीचे आमदार बाळू धानोरकर यांना काँग्रेसश्रेष्ठींनी तिकीट द्यावी, अशी गळ पक्षाचे स्थानिक नेते दिल्लीत घालत होते. हे नाव सुरु असतानाच नागपूरचे माजी आमदार डॉ. आशिष देशमुख यांचेही नाव पुढे आले. मात्र कुणाच्याही ध्यानीमनी नसताना अचानक नागपूरचे विशाल मुत्तेमवार यांचे नाव पुढे आले. बाहेरचा उमेदवार असल्यामुळे स्थानिक नेत्यांसह काँग्रेस कार्यकर्तेही विचारात पडले आहेत.
काँग्रेसचे मोठे गणित
पक्षश्रेष्ठींनी विशाल मुत्तेमवार यांना चंद्रपूरमध्ये उमेदवारी देण्यामागे असामान्य कारण असल्याचेही बोलले जात आहे. चंद्रपूर जिल्हा आधीच अंतर्गत गटबाजीने पोखरलेला आहे. आपसातील गटबाजी संपुष्टात आणण्यासाठी काँग्रेसने ही खेळी खेळली असावी. जिल्ह्यातील काँग्रेस नेत्यांना आता एकमेकांचे पाय ओढायला संधी नसेल. तरुण चेहरा असल्यामुळे तरुण कार्यकर्ते आणि तरुण मतदार त्यांच्याकडे आकर्षिले जातील, हे राजकीय गणित पक्षश्रेष्ठींनी यामागे मांडले असल्याचेही बोलले जात आहे.
धानोरकरांच्या भूमिकेकडे लक्ष
काँग्रेसचे स्थानिक नेते शिवसेना आमदार बाळू धानोरकर यांना काँग्रेसमध्ये प्रवेश देऊन चंद्रपूर लोकसभा मतदार संघातून उमेदवारी द्यावी. यासाठी आठ दिवसांपासून दिल्लीत तळ ठोकून होते. मात्र पक्षश्रेष्ठींनी आमदार विजय वडेट्टीवार यांना उमेदवारी देऊ केली होती. आ. वडेट्टीवारांनी अखेरच्या क्षणापर्यंत नन्नाचा पाढा कायम ठेवला. पक्षश्रेष्ठींनी आ. धानोरकर यांनाही तिकीट नाकारून नवा चेहरा पुढे आणला. आता शिवसेना आणि काँग्रेसच्या पेचात अडकलेले आ. धानोरकर कोणती भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहेत.
नऊ वेळा काँग्रेसचा खासदार
१९५१ पासून झालेल्या १६ लोकसभांपैकी तब्बल नऊवेळा या मतदार संघात काँग्रेसचा उमेदवार निवडून आला आहे. १९५१ मध्ये मुल्ला अब्दुलभाई ताहेर अली (भाराकाँ), १९५७ व्ही.एन. स्वामी (भाराकाँ), १९७१ अब्दुल शफी (भाराकाँ), १९८०, १९८४, १९८९ व १९९१ शांताराम (भाराकाँ) व १९९८ व १९९९ नरेश पुगलिया यांचा समावेश आहे. गेल्या १५ वर्षांपासून हा मतदार संघा भाजपच्या ताब्यात आहे. १७ व्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने पहिल्यांदाच मतदार संघाबाहेरचा उमेदवार निवडणूक रिंगणात उतरविण्याच्या हालचाली झाल्या आहेत. ही खेळी काँग्रेसला बालेकिल्ला परत मिळवून देतील काय, हे बघण्यासारखे आहे.

Web Title: Twelve people in Chanderpur are ineligible; Outgoing candidate will come

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.