चंद्रपुरात डासांचा प्रादुर्भाव वाढला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2018 11:21 PM2018-07-18T23:21:21+5:302018-07-18T23:22:34+5:30

सध्या पावसाळ्याचे दिवस सुरू आहेत. तुंबलेल्या नाल्या, साचलेले पाणी, रस्त्यावरील सांडपाणी, यामुळे मागील काही दिवसांपासून चंद्रपुरात डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. घराघरात डासांचा शिरकाव झाला असल्याने चंद्रपूरकर त्रस्त झाले आहेत.

There was increased incidence of mosquitoes in Chandrapur | चंद्रपुरात डासांचा प्रादुर्भाव वाढला

चंद्रपुरात डासांचा प्रादुर्भाव वाढला

Next
ठळक मुद्देडेंग्यूचीही लागण होण्याची शक्यता : रुग्णालयात हिवतापाचे रुग्ण वाढले

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : सध्या पावसाळ्याचे दिवस सुरू आहेत. तुंबलेल्या नाल्या, साचलेले पाणी, रस्त्यावरील सांडपाणी, यामुळे मागील काही दिवसांपासून चंद्रपुरात डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. घराघरात डासांचा शिरकाव झाला असल्याने चंद्रपूरकर त्रस्त झाले आहेत. याशिवाय ताप, मलेरिया यासारख्या रुग्णातही वाढ झाली आहे. सावली शहरात दोन दिवसांपूर्वी दोन डेंग्यूचे रुग्ण आढळले. त्यामुळे यावर वेळीच उपाययोजना केली नाही तर चंद्रपुरातही डेंग्यूसारख्या तापाचे रुग्ण वाढविण्याची शक्यता आहे.
जुलै महिन्यात चंद्रपुरात बऱ्यापैकी पाऊस झाला आहे. मागील सात दिवसांपासून दररोज पावसाची रिपरिप सुरू होती. या सात दिवसात सूर्याचेही दर्शन झाले नाही. पावसामुळे शहरात ठिकठिकाणी पाणी साचले आहे. काही प्रभागात तर सांडपाणीही रस्त्यावर वाहत असल्याने तिथे डबके साचले आहे. प्लास्टिक बंदी असली तर चंद्रपूरच्या अनेक सांडपाणी वाहून नेणाºया नाल्यांमध्ये प्लास्टिक तुंबून पाणी वाहणे बंद झाले आहे. या प्रकारामुळे डासांची उत्पत्ती वाढत असून चंद्रपुरातील सर्वच प्रभागात डासांचा प्रादुर्भाव झाला आहे. प्रत्येक घरी डासांमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत.
अष्टभूजा प्रभाग, जगन्नाथ बाबा नगर परिसर, नगिनाबाग, वडगाव प्रभाग, दे.गो. तुकूम प्रभाग, डॉ. आंबेडकर प्रभाग, गोपालपुरी परिसर, पठाणपुरा प्रभाग, इंदिरानगर प्रभाग, बंगाली कॅम्प प्रभाग आदी प्रभागात तर डासांचा प्रकोप झाला आहे. डासांची उत्पत्ती सातत्याने वाढत असल्याने ताप, मलेरिया यासारख्या रुग्णांत वाढ झाली आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयातही हिवतापाचे रुग्ण वाढल्याचे तेथील निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. यू. व्ही. मुनघाटे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. याशिवाय खासगी रुग्णालयातही मलेरियाच्या रुग्णांची गर्दी दिसून येत आहे.
डासांचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी महानगरपालिका व आरोग्य विभागाने आताच उपाययोजना करण्याची गरज आहे. अन्यथा डेंग्यूच्या रुग्णातही वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

डेंग्यूची लक्षणे
ताप येतो, मळमळ वाटते, उलटी होते, डोके दुखते, शरिरातील ज्वार्इंडमध्ये दुखणे सुरू होते. प्रारंभी रुग्णांमध्ये आढळलेली ही लक्षणे मलेरिया आणि डेंग्यूच्या रुग्णात सारखी आढळतात. मात्र डेग्यू असला तर थंडी वाजत नाही. मलेरियात मात्र थंडी वाजून ताप येतो. यावेळी रुग्णांची रक्तचाचणी करून उपचार केला नाही तर गंभीर लक्षणे आढळतात. त्यात रक्तातील पांढºया पेशी कमी होतात, रक्तदाब कमी होतो, अंग थंड पडते, रुग्ण बेशुध्द होतो, त्वतेच्या आत रक्तस्त्राव होतो, अंगावर लाल चट्टे पडतात.
मनपाने मोहीम राबवावी
सांडपाणी व शहरातील घाण पाण्याच्या डबक्यांमुळे डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. हिवतापाचे रुग्ण वाढत आहेत. डेंग्यूचीही लागण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे महानगरपालिकेने यावर वेळीच उपाययोजना करण्याची गरज आहे. महापालिकेने हिवताप विभागाला सोबत घेऊन शहरात डास निर्मूलनासाठी किंवा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी विशेष मोहीम राबवावी, अशी मागणी केली जात आहे.
असा करावा उपचार
सध्या जिल्ह्यात साथ सुरू असल्याने डेंग्यूचे प्राथमिक लक्षणे आढळले की ताप येण्याच्या दुसऱ्या-तिसऱ्या दिवशीच रक्ताची चाचणी करून घ्यावी. त्यानंतर घरी आराम आणि नियमित औषधोपचार घ्यावा. बेशुध्द होणे व पांढऱ्या पेशी कमी होणे अशी गंभीर लक्षणे दिसली की मात्र डॉक्टरांच्या देखरेखीखालीच उपचार घ्यावा लागतो. रुग्णांच्या रक्तात पांढऱ्या पेशी टाकाव्या लागतात व नियमित रक्त द्यावे लागते.
डेंग्यूचा डास दिवसा चावतो
मलेरिया पसरविणारे डास रात्री चावा घेतात. मात्र डेंग्यूचे डास नेहमी सकाळी व दिवसाच मनुष्याला चावतात. त्यामुळे सकाळी व सायंकाळ होण्याआधी विशेष काळजी घेणे गरजेचे आहे.
या आहेत प्रतिबंधात्मक उपाययोजना
सर्वांनी आठवड्यातून एक कोरडा दिवस पाळावा (भांडे, गंगाळ, टाके रिकामे करून कोरडे ठेवावे)
आजुबाजुच्या परिसरात टायर, कप यासारख्या वस्तूंमध्ये पाणी साचून असेल तर फेकून वस्तू कोरड्या कराव्या
साचलेल्या पाण्यात ‘टेमीफास्ट’ या औषधांची फवारणी करावी.
साचलेल्या पाण्यात गप्पी मासे सोडावे. (गप्पी मासे डासांच्या अळ्यांना खाऊन टाकतात व डासांची उत्पत्ती होत नाही)
साथीच्या दिवसात नेहमी मच्छरदाणीचा वापर करावा.

मागील काही दिवसात मलेरियाचे रुग्ण वाढले आहे. या दिवसात या आजाराचे रुग्ण अधिक येतात. मात्र अद्याप डेंग्यूचा रुग्ण आढळलेला नाही. मात्र पावसाळ्याचे दिवस असल्याने आरोग्य यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे.
-डॉ. यू. व्ही. मुनघाटे,
निवासी वैद्यकीय अधिकारी,
जिल्हा सामान्य रुग्णालय, चंद्रपूर.

Web Title: There was increased incidence of mosquitoes in Chandrapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.