अतिक्रमण बनली चंद्रपुरातील भीषण समस्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2018 11:20 PM2018-06-24T23:20:36+5:302018-06-24T23:21:07+5:30

चंद्रपूरचे भाग्य केव्हा उजळेल, या प्रश्नाला घेऊनच चंद्रपूरकर एकेक दिवस समोर रेटत आहे. भाग्य उजळेल, तेव्हा उजळो, पण जी वर्तमानातली देण आहे, तीदेखील टिकविणे स्थानिक राज्यकर्त्यांना जमलेले दिसत नाही.

The terrible problem that took place in the Chandrapur of encroachment | अतिक्रमण बनली चंद्रपुरातील भीषण समस्या

अतिक्रमण बनली चंद्रपुरातील भीषण समस्या

Next
ठळक मुद्देमनपा प्रशासनाची उदासीनता : अतिक्रमित इमारतींवर केव्हा चालणार बुलडोजर ?

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : चंद्रपूरचे भाग्य केव्हा उजळेल, या प्रश्नाला घेऊनच चंद्रपूरकर एकेक दिवस समोर रेटत आहे. भाग्य उजळेल, तेव्हा उजळो, पण जी वर्तमानातली देण आहे, तीदेखील टिकविणे स्थानिक राज्यकर्त्यांना जमलेले दिसत नाही. चंद्रपुरातील मोकळ्या जागा, सुमारे ६० टक्के रस्ते, पटांगण, बाजारपेठा आणि चक्क नद्यांवरही नागरिकांनी अतिक्रमण करून ठेवले आहे. सौंदर्यीकरणाचे प्रस्ताव तयार करणाऱ्यांच्या डोळ्यासमोरच शहराचे विद्रुपीकरण होत असल्याने चंद्रपूरकरांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.
चंद्रपूरकरांच्या समस्या सुटण्याऐवजी दिवसेंदिवस त्या वाढत जात आहेत. आता तर चक्क शहरालाच ग्रहण लागणे सुरू झाले आहे. शहर म्हटले की अतिक्रमण आलेच, हे कुणालाही पटण्यासारखे आहे. मात्र या अतिक्रमणाविरोधात स्थानिक प्रशासनाने कारवाईच करू नये, हे पटण्यासारखे नाही. अतिक्रमणाची समस्या चंद्रपूरला पूर्वीपासूनच चिकटली आहे. चंद्रपूरचे गौरी तलाव, घुटकाळा तलाव असेच अतिक्रमणाने गिळंकृत केले आहेत. आज या ठिकाणी पाण्याचा लवलेशही नाही. निव्वळ सिमेंट-काँक्रीटचे जंगल उभे झाले आहे. बाहेरची व्यक्ती सोडा; चंद्रपूरच्याच नव्या पिढीला या ठिकाणी तलाव होते असे सांगितले तर खरे वाटणार नाही.
नगर रचना विभागाने टाऊन प्लॉन तयार करताना चंद्रपुरातील मुख्य रस्ते किती फुटाचे असावे, याविषयी ठळकपणे नमूद केले आहे. मात्र एकही रस्ता टाऊन प्लॉनच्या आकडेवारीत ‘फिट’ बसत नाही. महात्मा गांधी मार्ग व कस्तुरबा मार्ग हे चंद्रपुरातील प्रमुख मार्ग आहेत. मात्र या मार्गावरही व्यावसायिकांनी व नागरिकांनी अतिक्रमण केले आहे. फेरीवाले, चारचाकीवाले, फुटपाथवर बसलेले किरकोळ व्यावसायिक यांनी केलेले अतिक्रमण केव्हाही काढता येईल. मात्र अनेक व्यावसायिकांनी रस्त्यावर पक्के बांधकाम केले आहे. ते अतिक्रमित आहे, हे माहित असतानाही प्रशासनाकडून कुठलीही कारवाई केली जात नाही. येथील गोलबाजाराला तर अतिक्रमणाने पार बरबटून टाकले आहे. फेरीवाल्यांचे व दुकानदारांच्या अतिक्रमणामुळे येथून ग्राहकांना पायदळही चालणे कठीण होते.
प्रमुख मार्गासह वॉर्डावॉर्डातील अंतर्गत रस्त्यावरही नागरिकांनी अतिक्रमण करून ठेवले आहे. एकीकडे लोकसंख्या वाढून वाहतूकही वाढली आहे.
मात्र दुसरीकडे रस्ते अतिक्रमणामुळे आकूंचन पावत आहेत. त्यामुळे वाहतुकीची मोठी समस्या उभी ठाकली आहे. आधी रस्त्यालगत घराचे बांधकाम केले जाते. त्यानंतर रस्त्यावर अतिक्रमण करून घराला लागूनच दुकान थाटले जाते. असा प्रकार अनेक ठिकाणी दिसून येतो.
मनपा प्रशासनाला ही बाब माहित नाही, असे नाही. मात्र कारवाईचा बडगा उगारण्यात प्रशासन अपयशी ठरले असावे वा मला काय त्याचे, असे म्हणत हात झटकण्याचा प्रकार असावा, असेच परिस्थितीवरून दिसून येते. काही वर्षांपूर्वी तत्कालीन जिल्हाधिकारी संजिव जयस्वाल यांनी तत्कालीन जिल्हा पोलीस अधीक्षक अब्दूर रहमान यांच्या सहकार्याने अतिक्रमित इमारतींवर बुलडोजर चालविला होता. त्यावेळी अतिक्रमणधारकांचे चांगलेच धाबे दणाणले होते. मात्र त्यानंतर अशी ठळक कारवाई कधीच होऊ शकली नाही.
नद्यांवरही अतिक्रमण
चंद्रपूरकरांची जीवनदायिनी असलेल्या इरई नदीवरही वेकोलिने अतिक्रमण केले आहे. मोठमोठे ओव्हरबर्डन इरई नदीच्या पात्रात दिमाखाने उभे असलेले दिसते. खुद्द मनपा प्रशासनानेच भूमिगत मलनिस्सारण योजनेसाठी इरई पात्रात इमारत बांधून ठेवली आहे. झरपट नदीच्या पात्रात तर रहिवासी वस्त्या तयार झाल्या आहेत. पूर परिस्थिती निर्माण झाली की या वस्त्यातील नागरिकांना इतरत्र हलविले जाते. मात्र अतिक्रमण काढण्याचे धाडस दाखविले जात नाही.
मोठे नालेही इमारतीखाली
रस्त्यावर, मोकळ्या जागेवर तर अतिक्रमण होत आहेच. शहरातून वाहणाºया मोठ्या नाल्यांनाही अतिक्रमणधारकांनी सोडले नाही. अनेक ठिकाणी या नाल्यांवर नागरिकांनी पक्के बांधकाम केले आहे. एका महाविद्यालयाने तर हा नालाच आपल्या प्रिमायसेसमध्ये गडप केला आहे. त्यामुळे जेसीबी लावूनही या नाला पूर्णत: साफ केला जात नाही. परिणामी शहराला बॅक वॉटरचा दरवर्षी सामना करावा लागतो.

Web Title: The terrible problem that took place in the Chandrapur of encroachment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.