तथागत गौतम बुद्धांचा एक शांतीदूत हरपला!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2018 12:18 AM2018-12-13T00:18:07+5:302018-12-13T00:21:42+5:30

साऱ्या विश्वाला शांतीचा संदेश देणाऱ्या तथागत गौतम बुद्धांचा बौद्ध धम्म तब्बल अडीच हजार वर्षांनंतरही जगातील अनेक देशात मोठ्या दिमाखाने जिवंत आहे. त्या धर्माचा प्रचार व पसार करण्याचे काम भन्तेजीच्या माध्यमातून सुरू आहे.

Tathagata Gautam Buddha's peace hunter! | तथागत गौतम बुद्धांचा एक शांतीदूत हरपला!

तथागत गौतम बुद्धांचा एक शांतीदूत हरपला!

googlenewsNext
ठळक मुद्देभन्ते राहुल बोधी यांच्यावर अंत्यसंस्कार : अधिष्ठान करताना भंन्तेवर बिबट्याच्या हल्ला

राजकुमार चुनारकर ।
लोकमत न्यूज नेटवर्क
चिमूर : साऱ्या विश्वाला शांतीचा संदेश देणाऱ्या तथागत गौतम बुद्धांचा बौद्ध धम्म तब्बल अडीच हजार वर्षांनंतरही जगातील अनेक देशात मोठ्या दिमाखाने जिवंत आहे. त्या धर्माचा प्रचार व पसार करण्याचे काम भन्तेजीच्या माध्यमातून सुरू आहे. हाच प्रचार करण्यासाठी तीन वर्षांपूर्वी चिवर धारण केलेल्या व तथागत गौतम बुद्धांच्या विचाराची पेरणी करण्यासाठी निघालेल्या भन्ते राहुलबोधी यांचा ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या शेजारी असलेल्या संघरामगिरी येथे ४० दिवसांचे अधिष्ठान करीत असताना मैत्री भावना विसरलेल्या बिबट्याने केलेल्या हल्ल्यात शांतीदूताचा करूण अंत झाला.
स्वतंत्र लढ्यासाठी प्रसिद्ध असलेल्या चिमूरक्रांती नगरी शहरापासून १५ किलोमीटर अंतरावर वसलेल्या सोनेगाव वन येथे महादेव वाळके यांच्या परिवारात राहुल यांचा जन्म झाला. त्याचे प्राथमिक शिक्षण गावात तर पुढील शिक्षण ग्रामदर्शन विद्यालय खडसंगी, पदवीपर्यंतचे शिक्षण चिमूरमध्ये झाले. शिक्षणानंतर राहुलने परिवाराला हातभार लावण्यासाठी गावात छोटे किराणा दुकान सुरू केले. मात्र त्यांना बुद्ध धम्माविषयीची तळमळ स्वस्थ्य बसू देत नव्हती. याचदरम्यान संघारामगीरी येथील काही भन्तेजीच्या संपर्कात आल्याने त्याने ध्यान-साधना सुरु केली. तसेच अनेक युवकांनाही धम्म शिबिर करायला लावले. दरम्यान राहुल तथागत गौतम बुद्धांच्या विचाराने प्रेरित झाल्याने तीन वर्षाअगोदर बौद्ध धम्माचे २२७ नियम ग्रहण करून विधिवत सदस्य झाले. तसचे बौद्धगया येथे धम्माची उपसंपदा घेतली. त्यामुळे राहुल हा भंते राहुलबोधी मध्ये परिवर्तीत झाले. यादरम्यान त्यांनी अरुणाचल प्रदेश, बांग्लादेश येथून बौद्ध धम्माचे ज्ञान प्राप्त केले.
शिवणी येथे वर्षावास संपवून १३ धुतानग अधिष्ठानांपैकी दोन अधिष्ठान पूर्ण करण्याच्या दृष्टीने मागील दहा ते पंधरा दिवसांपासून पहाडावरील बौद्ध विहारापासून एक किमी अंतरावर अरण्यकांक व वृक्षमुलिकांक अधिष्ठान करीत होते.
दरम्यान सुष्टीतील प्राणी मत्रांवर मैत्रीची शिकवण देणाऱ्या भन्तेवर बिबट्याने हल्ला केला. त्यामध्ये त्यांचा करूण अंत झाला. ध्यान साधनेत अधिष्ठान सुरू असताना मृत्यू ओढावल्यास बौद्ध शासनात पवित्र मानल्या जात असले, तरी त्यांच्या जाण्याने तथागत गौतम बुद्धाचा शांतीदूत हरपला आहे. तर संघारामगिरीचे जनक महाथेरो भदंत ज्ञानज्योती यांच्या संघात एक न भरून निघणारी पोकळी निर्माण झाली आहे.

परिसरातील बौद्ध बांधवांनी घेतले अंत्यदर्शन
खडसंगी : बिबट्याच्या हल्ल्यात ठार झालेल्या बौद्ध भिक्खू राहुलबोधी यांच्यावर खडसंगी येथील स्मशानभूमीत मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास अंत्यसंस्कार करण्यात आला. भंन्ते राहुलबोधी यांना अखेरचा निरोप देण्याकरिता अनेक धम्मबांधव सश्रुनयानांनी सहभागी झाले होते. पोलिसांनी मंगळवारी रात्री उशिरा पार्थिव भिक्खू संघाच्या स्वाधीन केले. दरम्यान बौध्द भिक्खू संघ महाप्रज्ञा साधनभूमी, संघरामगिरीच्या व्यवस्थापनाने त्यांच्यावर अंत्यविधी खडसंगी येथील स्मशानभूमीत करण्याचा निर्णय घेतला. परिसरातील गावा-गावांतून धम्मबांधवांचे जत्थे रात्री उशिरापर्यंत स्थानिक सम्राट अशोक बुद्धविहारात दाखल होऊन त्यांना वंदन केले. कडाक्याच्या थंडीतही मोठ्या संख्यने धम्मबांधव साश्रूनयनांने अंतयात्रेत सहभागी झाले होते. संघनायक महाथेरो भदंत ज्ञानज्योती व त्यांच्या भिक्खू संघाच्या उपस्थितीत अंत्यविधी पार पडला.

Web Title: Tathagata Gautam Buddha's peace hunter!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.