The study room for girls will be started | मुलींसाठी अभ्यासिका सुरू करणार
मुलींसाठी अभ्यासिका सुरू करणार

ठळक मुद्देसुधीर मुनगंटीवार : मिशन सेवामध्ये मुलींनो सहभागी व्हा

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : कुशाग्र बुद्धिमत्ता, सहनशीलता, एकाग्रता ही नैसर्गिक देणगी मुलींना मिळाली आहे. मुलींनी संशोधन व नावीन्यपूर्ण प्रयोगामध्ये स्वत:ला झोकून द्यावे. गुणवत्तेचा उपयोग समाजाच्या भल्याकरिता करण्यासाठी शैक्षणिक संस्थांनी पुढे यावे, या हेतूने मुलींसाठी जिल्ह्यात प्रायोगिक स्तरावर अभ्यासिका सुरू करणार, अशी घोषणा पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी शुक्रवारी केली. एफईएस गर्ल्स कॉलेजच्या स्नेहसंमेलनाच्या उद्घाटनाप्रसंगी केली.
मंचावर फिमेल एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष अ‍ॅड. विजय मोगरे, संस्थेचे सचिव अ‍ॅड. पुरूषोत्तम सातपुते, प्राचार्य डॉ. सरोज झंझाळ, सुमन उमाटे, प्रभाकर बनकर, देवानंद खोब्रागडे, राहुल बनकर, इको -प्रोचे बंडू धोत्रे उपस्थित होते.
ना. सुधीर मुनगंटीवार म्हणाले, सर्व क्षेत्रात मुलींच्या गुणवत्तेचा आज दबदबा निर्माण झाला आहे. त्यामुळे समाजाचे नेतृत्व करण्यासाठी आता मुलींनी पुढे यावे. चंद्रपूरमध्ये सुरू करण्यात आलेल्या मिशन सेवा या अभियानात सहभागी व्हावे. मिशन शौर्यच्या माध्यमातून ५ आदिवासी मुलांनी एव्हरेस्ट सर करून चंद्रपूरचे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर नेले. पायाभूत सुविधांच्या माध्यमातून जिल्ह्यातून क्रीडा क्षेत्रामध्ये क्रांती घडावी, असा प्रयत्न आहे. विद्यार्थिनीने आॅलम्पिकमध्ये देशाचे प्रतिनिधित्व करावे. मनात हजारदा यशाचा विचार करा, यश तुम्हाला निश्चित मिळेल, असा मंत्रही ना. मुनगंटीवार यांनी यावेळी सांगितला. यावेळी मेघा डुकरे, रूक्षाली दुबे, रूपाली कटकमवार, सीमा कोवे, रिमा कुशवाह, पायल ब्रह्मया, स्वाती संतपुरीवार, पुष्पा बावणे, सोनी सेगम आदी विद्यार्थिंनीचा पालकमंत्र्यांच्या सत्कार करण्यात आला.
बल्लारपुरात जागतिक दर्जाचे क्रीडा संकूल
२०२४ मध्ये होणाऱ्या आॅलम्पिकमध्ये जिल्ह्यातील मुलांनी भारतासाठी पदक मिळवावे, यासाठी बल्लारपूरात जागतिक दर्जाचे क्रीडा संकुल उभारले जात आहे. प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी क्रीडा संकुल उभारण्यात येणार आहे. जिल्हा क्रीडा स्टेडियमसह ज्युबिली हायस्कूलच्या मागे २५ कोटींचे शहीद बाबुराव शेडमाके क्रीडा संकुल उभारल्या जात आहे.
स्पर्धा परीक्षेतील टक्का वाढणार
जिल्ह्यातील मुलांचा सरकारी नोकरीमध्ये टक्का वाढावा, यासाठी मिशन सेवा सुरू आहे. यातून जिल्ह्यातील मुला- मुलींनी जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक व अन्य पदांवर पोहचावे, अशी अपेक्षा ना. मुनगंटीवार यांनी यावेळी व्यक्त केली.


Web Title: The study room for girls will be started
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.