‘ती’ वाघीण वनकर्मचाऱ्यांच्या नजरकैदेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2018 11:15 PM2018-03-20T23:15:50+5:302018-03-20T23:15:50+5:30

चार पिल्लांसह गिरगाव परिसरात ठाण मांडून असलेली ‘ती’ वाघीण वन कर्मचाऱ्यांच्या नजरकैदेत आहे. यासाठी आठ ते दहा वनकर्मचारी तैनात करण्यात आले आहेत.

'She' on the lookout for Waghin's funeral | ‘ती’ वाघीण वनकर्मचाऱ्यांच्या नजरकैदेत

‘ती’ वाघीण वनकर्मचाऱ्यांच्या नजरकैदेत

Next
ठळक मुद्देगिरगाव परिसरातील गावकऱ्यांत दहशत : बेशुद्ध करून पकडण्याची परवानगी देण्याला नागपूर कार्यालयाकडून विलंब

आॅनलाईन लोकमत
नागभीड : चार पिल्लांसह गिरगाव परिसरात ठाण मांडून असलेली ‘ती’ वाघीण वन कर्मचाऱ्यांच्या नजरकैदेत आहे. यासाठी आठ ते दहा वनकर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. तिला हुसकावण्यासाठी अनेक प्रयत्न कर्मचाऱ्यांकडून केले जात असले तरी ती हलत नसल्याने वनकर्मचाऱ्यांना सतत पहारा द्यावा लागत आहे.
गेल्या पंधरा दिवसांपासून गिरगावजवळ एका वाघिणीने तिच्या ४ पिलांसह ठाण मांडले आहे. तिने या परिसरातील दोन गोऱ्यांना ठार करून दोन शेतकऱ्यांवरही हल्ल्याचा प्रयत्न केला. त्यामुळे शेतकऱ्यांत चांगलीच दहशत निर्माण झाली आहे.
जंगलानजिकच्या शेतकऱ्यांना शेतावर जाणे कठीण झाले आहे. ही बाब लक्षात घेता वाघिणीचा त्वरित बंदोबस्त करावा, अशी मागणी गावकऱ्यांनी केली. त्यानंतर वनमंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनीही वाघिणीचा बंदोबस्त करा, असे निर्देश वनाधिकाऱ्यांना दिले.
वाघिणीच्या बंदोबस्तासाठी तळोधी वनपरिक्षेत्र कार्यालयाने बेशुद्ध करून तिला पकडण्याची परवानगी नागपूर कार्यालयाकडून मागितली आहे. मात्र परवानगी अद्यापही मिळालेली नसल्याने वाघिणीला वनकर्मचाºयांच्या नजरकैदेत ठेवण्यात आले आहे. यासाठी वाघिणीने ज्या परिसरात ठाण मांडले आहे, त्या परिसरात आठ ते दहा कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत.
तैनात कर्मचाऱ्यांच्या तुकड्या पाडण्यात आल्या असून यापैकी काही कर्मचारी दिवसा तर काही रात्रपाळीत तैणात असतात. वनपरिक्षेत्रधिकारी अभिलाषा सोनटक्के यांचीही नजर असून वाघिण गावाच्या दिशेने येऊ नये, यासाठी कर्मचाऱ्यांकडून फटाकेही फोडण्यात येत आहेत. मात्र वाघिण आपल्या जागेवरच पिल्ल्यांसह ठाण मांडून आहे.
तहसीलदारांच्या उपस्थितीत बैठक
गिरगाव : ठाण मांडून बसलेल्या वाघिणीच्या बंदोबस्तासाठी मंगळवारी गिरगाव ग्रामपंचायत भवनात नागभीडचे तहसीलदार समीर माने व ठाणेदार श्रीकांत पांढरे, पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र ठाकूर यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली. या बैठकीला सरपंच प्रशांत गायकवाड, उपसरपंच शरद सोनवाने, पोलीस पाटील जीवन बोरकर, उमेश बोरकर आदी उपस्थित होते. यावेळी तहसीलदारांनी कायदा व सुव्यवस्था कायम ठेवण्यासाठी गावकऱ्यांनी सहकार्य करावे, वाघिणीच्या बंदोबस्तासाठी प्रयत्न सुरू असून लवकरच बंदोबस्त केला जाईल, असे आश्वासन बैठकीला उपस्थित गावकºयांना दिले.
घटनास्थळावर बघ्यांची गर्दी
वाघिण चार पिल्लांसह ठाण मांडून आहे, ही माहिती सर्वदूर पसरली. त्यामुळे वाघिणीला बघण्याच्या हेतूने अनेक नागरिक येथे गर्दी करू लागले आहेत. ही बाबही अडचणीची ठरत आहे.
वनतस्करांची भीती
संपूर्ण तळोधी वनपरिक्षेत्रातील वन कर्मचाऱ्यांचे लक्ष वाघिण व तिच्या पिल्लांकडे केंद्रीत झाले आहे. परिणामी कर्मचाऱ्यांचे त्यांच्या दैनंदिन कामाकडे दुर्लक्ष होऊ शकते. याचा फायदा वनतस्कर घेण्याची भीतीही व्यक्त केली जात आहे.

Web Title: 'She' on the lookout for Waghin's funeral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.