शाळांमध्ये सुरू झाली पुन्हा बालकांची किलबिल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2019 11:08 PM2019-06-26T23:08:41+5:302019-06-26T23:09:09+5:30

रांगोळ्याचा सडा, रंगीबेरंगी पताका, फुग्यांची तोरणं, छोटा भीम मोगली अन इतर कार्टूनची कटआऊटस, बालगोपालाची बैल बंडी, ट्रक्टर वर गावातून मिरवणूक व जोडीला बालगोपालांचा किलबिलाट अशा उत्साहपूर्ण वातावरणात जिल्ह्यातील विविध गावांमध्ये शाळांचा पहिला दिवस सुरू झाला. यावेळी सर्व शाळांनी विविध उपक्रम राबवून नवागतांचे स्वागत केले. काही विद्यार्थ्यांना पुस्तकाचे वाटपही करण्यात आले.

Schools started in chatter again | शाळांमध्ये सुरू झाली पुन्हा बालकांची किलबिल

शाळांमध्ये सुरू झाली पुन्हा बालकांची किलबिल

Next
ठळक मुद्देजिल्हाभर विविध उपक्रम : पहिल्या दिवशी नवागतांचे स्वागत

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : रांगोळ्याचा सडा, रंगीबेरंगी पताका, फुग्यांची तोरणं, छोटा भीम मोगली अन इतर कार्टूनची कटआऊटस, बालगोपालाची बैल बंडी, ट्रक्टर वर गावातून मिरवणूक व जोडीला बालगोपालांचा किलबिलाट अशा उत्साहपूर्ण वातावरणात जिल्ह्यातील विविध गावांमध्ये शाळांचा पहिला दिवस सुरू झाला. यावेळी सर्व शाळांनी विविध उपक्रम राबवून नवागतांचे स्वागत केले. काही विद्यार्थ्यांना पुस्तकाचे वाटपही करण्यात आले.
चिमूर पंचायत समिती मधील शंकरपूर, नेरी, खडसंगी, भिशी, जांभूळघाट बिटातील शाळांत सकाळपासून विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी आकर्षक रांगोळी काढण्यात आली होती. सावित्रीबाई फुले व शाहू महाराज यांच्या फोटोचे पूजन करून शाळेचा पहिला दिवस सुरू झाला.
शहरातील इतर शाळांमध्ये ही अशाच उत्साहपूर्ण वातावरणात विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. तर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खांबाडा येथे उपविभागीय अधिकारी भैयासाहेब बेहरे, गटशिक्षणाधिकारी किशोर पिसे यांच्या हस्ते पुस्तके वाटून नावागताचे स्वागत करण्यात आले.
नागभीड, ब्रह्मपुरी, सिंदेवाही यासह जवळजवळ सर्वच तालुक्यांमधील जि.प. शाळेत आज विविध उपक्रम राबविण्यात आले. सकाळी घरातून निघताना शाळेत पोहोचेपर्यंत विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद होता. प्रत्येक विद्यार्थी उत्साहात शाळेत आले होते. काही विद्यार्थ्यांसोबत त्याचे पालकही सोबत आले होते.
नवागतांना सांभाळताना कसरत
ज्यांना पहिल्यांदाच शाळेत टाकले आहे, अशा चिमुकल्यांनी शाळेत सोडल्यानंतर रडणे सुरू केले. एकाचे पाहून अनेक विद्यार्थी रडताना दिसत होते. चंद्रपुरातील इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्येही नर्सरीच्या बालकांबाबत असाच प्रकार घडत होता. त्यांना संभाळताना शिक्षक, शिक्षिकांना मोठी कसरत करावी लागली. आपली मुलं रडताना पाहून परिसरात उभ्या असलेल्या पालकांचाही जीव खालीवर होत होता. अनेक पालक वर्गांच्या दारा खिडक्यांमधून डोकावून पाहत होते.
शिक्षकाच्या मागणीसाठी पहिल्याच दिवशी शाळा बंद
वढोली : गोंडपिपरी पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या तारसा बुज येथील जिल्हा परिषद शाळा याला अपवाद ठरली. गेल्या एक वर्षांपासून येथील कार्यरत शिक्षक अनधिकृत गैरहजर राहत असल्याने मागील सत्रात विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान झाले. यावर्षी तरी कायमस्वरूपी शिक्षक द्या, या मागणीसाठी पालकांनी आपल्या मुलांना शाळेत न पाठविण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे तारसा बूज येथील शाळा आज पहिल्याच दिवशी बंद होती. येथील कार्यरत शिक्षक गावळे हे डिसेंबर २०१८ पासून सतत अनधिकृत गैरहजर असताना त्यांच्यावर कारवाई का करण्यात आली नाही, असा सवाल गावातील नागरिक करीत आहेत. त्या शिक्षकाच्या अशा वागण्यामुळे गेल्यावर्षी विध्यार्थ्यांचे फार मोठे नुकसान झाले. याची तक्रार वारंवार केंद्र प्रमुख महल्ले यांना देण्यात आली होती. मात्र केंद्रप्रमुख यांनी या गंभीर बाबीकडे कानाडोळा करीत त्या शिक्षकाला नेहमी पाठिशीच घालत आले. आज शाळेचा पहिला दिवस. आजतरी गैरहजर असणारे शिक्षक शाळेत येथील, अशी आशा पालकांना होती. मात्र ते शिक्षक आजही शाळेत न आल्याने संतप्त पालकांनी व गावकऱ्यांनी आपापल्या पाल्यांना शाळेत न पाठविण्याचा निर्णय घेऊन शाळा बंद पाडली. कायमस्वरूपी शिक्षक मिळणार नाही, तोपर्यंत मुलांना शाळेत पाठवणार नाही असा निर्णय पालकांनी घेतला आहे. यावेळी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष किशोर अलोने, उपाध्यक्ष पौर्णिमा चेंदे, बंडू झाडे, गुरुदास कस्तुरे यांच्यासह गावकरी उपस्थित होते.

मी तारसा बूज येथील जिल्हा परिषद शाळेत भेट दिली असता शिक्षकांच्या मागणीसाठी पालकांनी पाल्याला शाळेत पाठवले नाही, असे दिसून आले. पालकांसोबत चर्चा करून कायमस्वरूपी शिक्षकांसाठी तत्काळ आदेश काढू. शिक्षक रुजू होण्यासाठी किमान तीन ते चार दिवस लागतील
- धनराज आवारी,
गट शिक्षण अधिकारी पं.स. गोंडपिपरी

Web Title: Schools started in chatter again

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.