Resistance to field test 50 points | मैदानी चाचणी ५० गुणांची केल्याने नाराजी
मैदानी चाचणी ५० गुणांची केल्याने नाराजी

ठळक मुद्देपोलीस भरतीप्रक्रिया पूर्ववत राबवावी : बेरोजगार युवकांची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : गृह विभागाच्या नव्या आदेशाने पोलीस भरतीसाठी होणारी १०० गुणांची मैदानी चाचणी आता फक्त ५० गुणांची होणार आहे. त्यामुळे मागील अनेक वर्षांपासून मैदानी परीक्षेची तयारी करणाऱ्या युवकांमध्ये नाराजी पसरली आहे. तो निर्णय रद्द करावा, पूर्ववत नियमानुसार भरतीप्रकिया राबवावी, अशी मागणी होत आहे.
पोलीस भरतीमध्ये सहभागी होणारे युवक-युवती शारीरिकदृष्ट्या सक्षम असावे, यासाठी पाच प्रकारच्या शारीरिक स्पर्धा घेण्यात येत होत्या. त्यानंतर १०० गुणांची लेखी परीक्षा, मुलाखत, कागदपत्र पडताळणी केल्यानंतर पोलिसात सहभागी होत असते. मात्र गृहविभागाने आता शारीरिक क्षमता केवळ ५० गुणांची केली असून काही चाचण्या कमी करण्यात आल्या आहे. तसेच शारीरिक क्षमता चाचणीपूर्वीच पेपर घेण्याचा निर्णय घेतला आहे.
मात्र मागील अनेक वर्षांपासून बरेच युवक-युवती शारीरिक क्षमता चाचणीची तयारी करीत आहे. ज्या युवकांची शारीरिक क्षमता चाचणी योग्य आहे. अशा युवकांना या निर्णयाचा मोठा फटका बसणार आहे. त्यामुळे हा निर्णय रद्द करुन पूर्ववत भरतीप्रक्रिया राबवावी, अशी मागणी पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या युवकांकडून होत आहे.
पोलीस भरतीची प्रतीक्षा
गृहविभागाने पोलीस भरतीसंदर्भात शासननिर्णय जाहीर केला. मात्र पोलीस भरती केव्हा राबविण्यात येणार आहे. याबाबत कोणत्याच प्रकारचा उल्लेख केला नाही. परिणामी पोलीस भरती केव्हा होणार, असा प्रश्न युवकांना सतावत आहे. मागील वर्षी शासनाने मोठ्या प्रमाणात पोलीस भरती राबविण्याची घोषणा केली होती. मात्र अद्यापही त्यांची अमंलबजावणी झाली नाही. त्यामुळे युवकांमध्ये नैराश्य पसरत आहे.
शारीरिक क्षमतेकडे होणार दुर्लक्ष
पोलीस खात्यामध्ये शारीरिक व मानसिक तंदुरुस्तीची गरज असते. पोलिसांना काम करताना अनेक ताण-तणावातून सामोर जावे लागते, त्यामुळे शारीरिक सुदृढ व मानसिक आरोग्य सुदृढ असणे गरजेचे आहे. मात्र नव्या पद्धतीमुळे शारीरिक क्षमतेकडे दुर्लक्ष होणार आहे. त्यामुळे पोलीस खात्याचे आरोग्य आणि तंदुरुस्ती धोक्यात येणार आहे. म्हणून प्रथम शारीरिक चाचणी आणि नंतर लेखी परीक्षा घ्यावी अशी मागणी आहे.


Web Title: Resistance to field test 50 points
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.