प्रधानमंत्री आवास योजनेतील अटी शिथिल करा

By admin | Published: January 4, 2017 12:55 AM2017-01-04T00:55:25+5:302017-01-04T00:55:25+5:30

प्रधानमंत्री आवास योजनेतील जाचक अटी शिथिल करण्याची मागणी नगरसेवक संजय वैद्य यांनी एका निवेदनाद्वारे केंद्रीय गृहराज्यमंत्र्यांकडे केली आहे.

Relax the terms of the Prime Minister's Accommodation Scheme | प्रधानमंत्री आवास योजनेतील अटी शिथिल करा

प्रधानमंत्री आवास योजनेतील अटी शिथिल करा

Next

संजय वैद्य : केंद्रीय गृहराज्यमंत्र्यांना निवेदनातून मागणी
चंद्रपूर : प्रधानमंत्री आवास योजनेतील जाचक अटी शिथिल करण्याची मागणी नगरसेवक संजय वैद्य यांनी एका निवेदनाद्वारे केंद्रीय गृहराज्यमंत्र्यांकडे केली आहे.
केंद्र शासनाने प्रधानमंत्री आवास योजना सुरू केली असून त्यात घरकूल मंजुरीसाठी चार टप्पे करण्यात आले आहेत. या योजनेत विशेषत: कच्च्या घराचा पक्क्या घरात बदल करण्यापासून तर कुठेही, कोणतेही स्वत:चे घर नसलेल्या भाडेकरू नागरिकांना स्वमालकीचे घर देण्यापर्यंत समावेश आहे. याशिवाय दोन लाख रुपयांच्या अनुदानापासून ते बँकेमार्फत कर्ज रूपाने ६.३० टक्के व्याज दराने देण्यात येणाऱ्या ६ लाख रुपयांपर्यंतच्या निधीचाही योजनेत समावेश आहे. या योजनेची अंमलबजावणी मनपा करीत असून घरकुलासाठी मागणी अर्ज करण्यास नागरिकांची झुंबड उडत आहे. पण योजनेतील काही अटींमुळे महानगरातील ७० टक्के नागरिक या योजनेपासून वंचित राहण्याची शक्यता वैद्य यांनी वर्तविली आहे.
योजनेतील घटक क्रमांक १ व ३ मध्ये जागा मालकीची, कागदपत्रांची आवश्यकता नसल्याचे म्हटले आहे. पण, घटक क्रमांक १ साठी मनपा हद्दीतील घोषित झोपडपट्टी भागात कच्चे घर असणे आवश्यक आहे. घटक क्रमांक ३ मध्ये घरकूल बांधण्यासाठी बँकेद्वारे कर्जपुरवठा केला जाणार आहे. शहरातील ६० ते ७० टक्के रहिवासी वस्ती नझूल जागेवर आहे. अद्याप त्यांना कायमस्वरूपी पट्टे मिळाले नाहीत. शिवाय खासगी मालकीच्या लेआऊटमध्ये ज्या नागरिकांची घरे आहेत. त्यामध्ये रहेमतनगर, सिस्टर कॉलनी, स्वावलंबीनगर, पठाणपुरा गेट वस्तीचा समावेश आहे. पण, हा भाग पूरग्रस्त क्षेत्रात असल्यामुळे नगररचना विभागाच्या नियमानुसार ही जागा बांधकाम मंजुरीसाठी अधिकृत ठरणार नाही.
यासोबतच बंगाली कॅम्प ते बल्लारपूर वळणमार्गापर्यंतच्या परिसरातील खासगी लेआऊटमधील वस्ती ही वेकोलिच्या कोल बेल्ट क्षेत्रात येत असल्यामुळे हा परिसरसुद्धा बांधकाम मंजुरीसाठी अनधिकृत ठरणार असल्याचे वैद्य यांचे म्हणणे आहे.
भाडेकरूंसाठी असलेल्या घटकात शहरात किंवा शहराबाहेर घरकुलाचे बांधकाम करण्यास स्वस्त दराची खासगी किंवा शासकीय जागा उपलब्ध नाही. त्यामुळे या घटकातील नागरिकही योजनेपासून वंचित राहण्याची शक्यता आहे.
सदर योजना मुंबई, पुणे यासारख्या महानगरासारखी लागू केली आहे. ते निकष चंद्रपूर महानगरात लागू होत नाही. चंद्रपुरात घरकुलांची अपेक्षा करणाऱ्या नागरिकांची संख्या मोठी आहे. त्यामुळे घरकुलाची मागणी व निकष लक्षात घेऊन या योजनेची अंमलबजावणी करावी.
सदर अटींचा ताळमेळ बसवावा यासाठी प्रयत्न करण्यात यावे, असे नगरसेवक संजय वैद्य यांनी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. (नगर प्रतिनिधी)

Web Title: Relax the terms of the Prime Minister's Accommodation Scheme

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.