लोकसंख्या पाच लाख, टँकर अकराच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2019 11:29 PM2019-06-17T23:29:21+5:302019-06-17T23:30:18+5:30

चंद्रपूर शहराची लोकसंख्या पाच लाखांच्या घरात पोहचली आहे. या संपूर्ण शहरात सध्या भीषण पाणी टंचाई आहे. नळाद्वारे पाणी येत असले तरी खासगी पाण्याचे स्रोत ड्राय झाले आहे. अशावेळी नागरिकांना मनपाच्या टँकरचाच मोठा आधार आहे. मात्र एवढ्या मोठ्या शहराला पाणी देण्यासाठी मनपाकडे केवळ आठच टँकर आहे.

Population five lakh, tanker eleven | लोकसंख्या पाच लाख, टँकर अकराच

लोकसंख्या पाच लाख, टँकर अकराच

Next
ठळक मुद्देपाण्यातही राजकारण : पाणी वाटपातील मनमानीमुळे अनेकांचे घसे कोरडे

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : चंद्रपूर शहराची लोकसंख्या पाच लाखांच्या घरात पोहचली आहे. या संपूर्ण शहरात सध्या भीषण पाणी टंचाई आहे. नळाद्वारे पाणी येत असले तरी खासगी पाण्याचे स्रोत ड्राय झाले आहे. अशावेळी नागरिकांना मनपाच्या टँकरचाच मोठा आधार आहे. मात्र एवढ्या मोठ्या शहराला पाणी देण्यासाठी मनपाकडे केवळ आठच टँकर आहे. तीन टँकर भाड्याने घेतले आहे. म्हणजे केवळ ११ टँकरच उपलब्ध असल्याने शहरातील अनेक भाग तहानलेला राहत आहे. यातही टँकर पुरवठा करतानाही राजकारण केले जात असल्याने संताप व्यक्त केला जात आहे.
चंद्रपूर शहरात सध्या भिषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे. मागील वर्षी अत्यल्प पाऊस झाला. त्यामुळे जलसाठ्या मुबलक पाणी जमा होऊ शकले नाही. मार्च महिन्यातच चंद्रपुरातील इरई व झरपट नदीपात्रात अत्यल्प पाणी होते. त्यानंतर होळी आटोपताच सूर्याने आग ओकणे सुरू केले. चार-पाच दिवसांचा अपवाद वगळला तर मार्चपासून जूनच्या १५ तारखेपर्यंत सूर्याचे आग ओकणे अविरत सुरू राहिले. यामुळे चंद्रपुरातील खासगी जलस्रोत म्हणजेच विहिरी, बोअरवेल, हातपंप आटले आहेत. चंद्रपुरातील बहुतांश नागरिकांकडे नळ कनेक्श्न नाही. खासगी जलस्रोत आटल्याने अनेक वार्डात भिषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे.
सध्या अनेक भागात दररोज टँकरची गरज आहे. मनपाद्वारे ११ पाण्याच्या टँकरने शहरात पाणी पुरवठा केला जात आहे. मात्र हा पाणी पुरवठा करताना आता यात राजकारण आड येत आहे. अनेक भागातील नागरिक स्वत: मनपाकडे जाऊन टँकरची मागणी करतात. काही नागरिक नगरसेवकांकडे पाण्याची मागणी करतात. नगरसेवक मग मनपाकडे संपर्क साधतात. मात्र पाणी पुरवठा करताना वजनदार नगरसेवकांचे आधी ऐकले जाते.
केवळ याच नगरसेवकांच्या वार्डात टँकरने पाणी पुरवठा होतो. त्यामुळे इतर भागातील नागरिकांना पाण्यासाठी टाहोच फोडत रहावे लागते. सध्या महानगरपालिकेत भाजपाची सत्ता आहे. त्यामुळे भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी टँकरची मागणी केली तर ती तत्काळ पूर्ण केली जाते. इतर नगरसेवकांना वारंवार टँकरसाठी पाठपुरावा करावा लागतो. याचा परिणाम असा होतो की नागरिकांना पाणी मिळत नाही. त्यामुळे सर्वत्र पाण्याची बोंब होत आहे. महिलांना पाण्यासाठी खासगी विहिरींवर जावे लागत आहे.
इरई धरणात बऱ्यापैकी पाणी
चंद्रपूरला पाणी पुरवठा करणाऱ्या इरई धरणात बºयापैकी पाणी शिल्लक आहे. त्यामुळे चंद्रपुरात नळाद्वारे पाणी येत आहे. मात्र अनेक नागरिकांकडे नळ कनेक्शन नाही. ज्यांच्याकडे आहे, त्यांना पाणी मिळते पण मुबलक नाही. त्यामुळे आता त्यांनी आपल्या नळाचे पाणी इतरांना देणे बंद केले आहे. दुसरीकडे घराघरातील विहिरी, बोअरवेल, हातपंप याचे पाणी आटल्यामुळे नळ येऊनही शहरात भिषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे.
टँकर पुरवठ्याची पद्धत
महानगरपालिकेकडे सध्या केवळ सहा पाण्याचे टँकर उपलब्ध आहेत. भीषण पाणी टंचाई बघता मनपाने दोन ४०७ वाहनांमध्ये पाण्याची टाकी बसवून त्याचे टँकर केले आहे. काही दिवसांपूर्वी मनपाने आणखी तीन टँकर भाड्याने घेतले आहे. एवढ्या मोठ्या शहरात आता केवळ ११ टँकरने पाणी पुरवठा केला जात आहे. नागरिकांच्या मागण्यांवरून मनपाकडे एक यादी तयार केली जाते. दुसºया दिवशी या यादीनुसार पाणी वाटप करण्यात येते. मात्र मध्येच आयुक्त किंवा महापौर किंवा एखाद्या वजनदार नगरसेवकांचा भ्रमणध्वनी संबंधित कर्मचाऱ्यांकडे येतो. अमुकअमुक वार्डात तत्काळ टँकर पाठवा असे सांगितले जाते. त्यामुळे नाईलाजाने संबंधित कर्मचारी यादी बाजूला ठेवून त्या भागात टँकर पाठवितो. त्यामुळे पाण्यासाठी नंबर लावून असलेल्या नागरिकांना टँकरची प्रतीक्षाच करावी लागते.
११४ पैकी २९ गावांमध्येच नळयोजना
नागरिकांचे हाल : प्रशासन म्हणते टंचाई नाही

नवरगाव : सिंदेवाही तालुक्यात ११४ गावे आहेत. परंतु, केवळ २९ गावातच नळयोजना असल्याने ३२ गावांतील नागरिकांना पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे. तर दुसरीकडे प्रशासने सिंदेवाही तालुका पाणी टंचाईग्रस्त नसल्याचे कागदोपत्री नोंदविल्याने संताप व्यक्त केला जात आहे.
तालुक्यातील विहिरी, तलाव व नाले कोरडे झाले. ज्या गावातील नदी व नाल्यावरून नळयोजनेचे पाणी मोटारपंपाच्या सहाय्याने पोहचत होते. त्या नदीत नाल्यात पाणीच नसल्याने नळयोजना ठप्प पडल्या. त्याचा भार विहिरी व हातपंपावर पडला आहे. गावातील विहिरीवर कोरड्या पडल्याने महिलांना एक ते दोन किमी अंतरावील शेतातून पाणी आणावे लागत आहे. ११४ पैकी केवळ २९ गावांमध्ये नळयोजना कार्यान्वित आहे. परंतु, १० ते १५ नळयोजना ठप्प असल्याची माहिती गावकऱ्यांनी दिली. ३२ गावे टंचाईग्रस्त आहेत. काही दिवसांपूर्वीच नगरपंचायतवर महिलांनी मोर्चा काढला होता.
टँकरमुक्त तालुका कागदावरच
रत्नापुरात पाच दिवसातून एकदा नळ येतो. ग्रामपंचायतने वरिष्ठांना निवेदन दिले. मात्र उपाययोजना केली नाही. पळसगाव जाट जाट येथे पाण्याची समस्या बिकट आहे. मेंढा माल येथील नळयोजनेला पाणी नाही. लोनखैरी व लोणवाही येथील नळयोजनेचे विद्युत बिल भरले नसल्याने पााणी पुरवठा बंद आहे. लोणवाही येथेही वीज बिल भरणा न केल्याने नळयोजना ठप्प असल्याची माहिती आहे. दरवर्षी जिल्हास्तरावर नियोजन नोव्हेंबर व डिसेंबर महिण्यातच होते. मात्र सिंदेवाही तालुक्याला याचा फायदा मिळत नाही. केवळ कागदावरच टँकरमुक्त तालुका म्हणून दरवर्षी नोंद होते.

Web Title: Population five lakh, tanker eleven

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.