शेकडो हेक्टरवरील धानपीक नष्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2017 11:54 PM2017-11-23T23:54:18+5:302017-11-23T23:54:37+5:30

परिसरातील धानपिकांवर यावर्षी मोठ्या प्रमाणात मावा- तुडतुडा व इतर विविध रोगांचा प्रादुर्भाव झाल्याने धान उत्पादक शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे.

Paddy pockets destroyed on hundreds of hectares | शेकडो हेक्टरवरील धानपीक नष्ट

शेकडो हेक्टरवरील धानपीक नष्ट

Next
ठळक मुद्देनुकसान भरपाईची आशा : पोंभुर्णा तालुक्यातील शेतकरी संकटात

लोकमत न्यूज नेटवर्क
पोंभुर्णा : परिसरातील धानपिकांवर यावर्षी मोठ्या प्रमाणात मावा- तुडतुडा व इतर विविध रोगांचा प्रादुर्भाव झाल्याने धान उत्पादक शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. पोंभुर्णा तालुक्यातील शेकडो हेक्टरमधील धानपीक न कापताच शेतात उभे आहे. रोगग्रस्त धानाची कापणी करूनही त्या तणसाला जनावरेही खावू शकत नसल्याने अनेक शेतकऱ्यांनी उभे पीक जाळून टाकले आहे. त्यामुळे परिसरामध्ये जनावरांच्या चाºयाचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.
चंद्रपूर जिल्ह्यात धान उत्पादक व सिंचन विरहीत मागास तालुका म्हणून ओळख असलेल्या पोंभुर्णा तालुका परिसरामध्ये यावर्षी तुरळक पाऊस पडला तरी धानिपक चांगल्या स्थितीमध्ये होते. मात्र धानपिक गर्भाशयात असतानाच विविध प्रकारच्या रोगांनी हल्ला चढविल्याने यावर नियंत्रण मिळविण्यासाठी परिसरातील शेतकºयांनी विविध प्रकारची महागडी औषधी घेऊन फवारणी केली.
त्यांच्या या परिश्रमाला काही प्रमाणात यशसुद्धा आले. त्यामुळे बेरड, लाल्या, पिवळा करपा आदी रोग नियंत्रणात आणता आले. काही प्रमाणात तग धरुन असलेले धानपिक हाती येण्याची शक्यता होती.
परंतु तग धरुन असलेल्या धानपिकावर परत मावा-तुडतुडा या रोगाने ग्रासल्याने धान परिपक्व होण्याच्या उंबरठ्यावर असतानाच त्याचे तणसामध्ये रुपांतर झाले. औषधांची वारंवार फवारणी आणि रोगाची प्रचंड प्रतिकार शक्ती, यामुळे जनावरेसुद्धा या तणसाला तोंड लावत नाही.
शेतकऱ्यांनी अशा पिकांची कापणी न करताच शेतातच उभे ठेवले असून काहीजण याचा जनावरांवर विपरीत परिणाम होवू नये, यासाठी पीक जाळून टाकत आहेत. शासनाने याची दखल घेवून मदत देण्याची मागणी शेतकºयांची आहे.
काँग्रेसच्या शिष्टमंडळाकडून धानपिकाची पाहणी
धान नष्ट झाल्याची तक्रार परिसरातील काही शेतकºयांनी चंद्रपूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष प्रकाश देवतळे यांच्याकडे केली. त्यामुळे देवतळे यांनी बुधवारी पोंभुर्णा तालुक्यातील देवाडा खुर्द येथील शेतकरी बंडू सोमा टिकले यांच्या शेतामध्ये जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली. त्यांच्या सोबत बल्लारपूर येथील नगरसेवक अब्दुल करीमभाई, जिल्हा महासचिव अरविंद मडावी, फाखभाई, कुनाल गाडगे, राकेश नैताम, राजू बुरांडे, निलकंठ नैताम, विनोद बुरांडे, ज्ञानेश्वर घुग्घुस्कार आदी उपस्थित होते. यावेळी देवतळे यांनी शेतकºयांच्या या गंभीर प्रश्नावर आपण अधिवेनात दाद मागणार असून शेतकºयांना नुकसान भरपाई व चाऱ्याचा प्रश्न सोडवण्याची प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.
तूर पिकावरही रोगांचा प्रादुर्भाव
पेंढरी : वडसी, खातोडा, गोंदोडा, केवाडा, पेंढरी (कोके), आलेसुर, नैनपूर, मोटेगाव, महादवाडी, पेठ, खुटाळा, काजळसर भागात धान, तूर, वेलवर्गीय पिकांवर मावा-तुरतुडा रोगाचा प्रार्दुभाव असल्याने सर्व पीक नष्ट झाले आहेत. यावर्षी या भागात कमी पाऊस झाल्यामुळे धानाची रोवणी आटोपली. मात्र गर्भाशयात असलेल्या धानावर तसेच तूर, भोपळा, दुधी व इतर पिकांवर मावा तुडतुडा व इतर रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने सर्व पीक नष्ट झाले आहेत. त्यामुळे बळीराजा मोठ्या आर्थिक विवंचनेत सापडला आहे. कर्ज काढून कसेतरी धान पिकाची रोवणी केली. परंतु निसर्गाने ते हिरावल्यामुळे बळीराजा चिंतेत आहे. या भागात जिल्हा प्रशासनाने सर्वेक्षण करुन नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना जास्तीत जास्त आर्थिक मदत करावी, अशी मागणी शेतकºयांनी केली आहे.

कर्ज काढून कशीतरी रोवणी केली. परंतु तेही पीक रोगाने नष्ट झाले. शासनाने नुकसान भरपाई देवून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा.
- सुनील चांदेकर, शेतकरी वडसी (खातोडा)

Web Title: Paddy pockets destroyed on hundreds of hectares

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Farmerशेतकरी