पाणी नाही तर करही नाही !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2019 12:28 AM2019-04-22T00:28:19+5:302019-04-22T00:29:15+5:30

कधी नव्हे एवढे भीषण पाणी टंचाईचे सावट चंद्रपूरकरांवर कोसळले आहे. इरई धरणात पुरेसा पाणीसाठा उपलब्ध असूनही पाणी कपात चंद्रपूरकरांवर लादल्या जात आहे. यामुळे कृत्रिम पाणीटंचाई निर्माण होऊन चंद्रपूरकरांचे हाल होत आहे. पाण्यासाठी नागरिकांना रस्त्यावर उतरावे लागत आहे.

Not even water! | पाणी नाही तर करही नाही !

पाणी नाही तर करही नाही !

googlenewsNext
ठळक मुद्दे३० एप्रिलला तीव्र आंदोलन : पाण्यामुळे चंद्रपूरकरांचे हाल

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : कधी नव्हे एवढे भीषण पाणी टंचाईचे सावट चंद्रपूरकरांवर कोसळले आहे. इरई धरणात पुरेसा पाणीसाठा उपलब्ध असूनही पाणी कपात चंद्रपूरकरांवर लादल्या जात आहे. यामुळे कृत्रिम पाणीटंचाई निर्माण होऊन चंद्रपूरकरांचे हाल होत आहे. पाण्यासाठी नागरिकांना रस्त्यावर उतरावे लागत आहे. महापालिकेच्या नियोजनशून्य कारभारामुळे नागरिकांवर ही वेळ आली आहे. मात्र आता नागरिकांचा संयम सुटला आहे. पाणी नाही तर नागरिक करही भरणार नाही, असा इशारा यंग चांदा ब्रिगेडचे संस्थापक अध्यक्ष किशोर जोरगेवार यांनी पत्रकार परिषदेतून दिला.
चंद्रपूर हे शांतीप्रिय शहर आहे. याचाच फायदा महानगरपालिका घेत असून आर्थिक जुळवा - जुळव करण्यासाठी उज्ज्वल कन्स्ट्रक्शनला हाताशी धरुन शहरात पाणी टंचाई निर्माण केली जात आहे. शहरातील अनेक भागात १० दिवसांपासून पाणी पूरवठा ठप्प आहे. त्यामुळे ऐन उन्हाळयात नागरिकांना उन्हाचे चटके सोसत पाण्यासाठी भटकावे लागत आहे. शहरातील बाबूपेठ, भिवापूर वार्ड, विठ्ठल मंदिर वार्ड, घुटकाळा वार्ड, इंदिरा नगर, बालाजी वार्ड, नेहरू नगर, तुकूम, रामनगर, दादमहल वार्ड, भानापेठ वार्ड, म्हाडा कॉलनी या भागातील परिस्थिती अतिशय बिकट आहे. शहराला पाणी पूरवठा करण्याची जबाबदारी असलेल्या उज्ज्वल कंन्ट्रक्शनलाही महानगर पालिकेच्या काही मोठया पदाधिकाऱ्यांचा आशीर्वाद असल्याने त्याचा मुजोरीपणा कायम आहे, असे जोरगेवार यांनी यावेळी सांगितले.
एकीकडे नागरिक चरवीभर पाण्यासाठी इतरत्र भटकंती करीत आहेत तर दुसरीकडे महापालिका सुशोभिकरणाच्या नावावर हजारो लिटर पाण्याचा अपव्यय करीत आहे. अनेक ठिकाणी पाईप लाईन फुटली असल्याने पाणी रस्त्यावर वाहत असल्याचेही चित्र आहे. त्यामुळे ही पाणी कपात पाणी टंचाईमुळे जाणीवपूर्वक केली जात आहे.
येत्या ३० एप्रिलला पाणी द्या अन्यथा खुर्ची खाली करा, अशी मागणी करीत तिव्र आंदोलन करण्यात येणार असल्याची माहितीही जोरगेवार यांनी दिली. पाणी समस्या असलेल्या प्रत्येक प्रभागात यंग चांदा ब्रिगेडच्या माध्यमातून त्यांच्या हक्कासाठी जनजागृती करण्यात येणार आहे. नागरिकांनीही त्यांच्या भागात पाणी पूरवठा सुरळीत होत नसल्यास तशी लेखी तक्रार यंग चांदा ब्रिगेडकडे द्यावी, असेही जोरगेवार यांनी सांगितले.

इरई धरणाची केली पाहणी
रविवारी किशोर जोरगेवार यांनी शहराला पाणी पूरवठा करणाºया इरई धरणाची पहाणी केली असता धरणात मुबलक पाणीसाठा असल्याचे दिसून आले. धरणात पाणीसाठा असतानाही नागरिकांना पाण्यासाठी भटकावे लागणे हे नियोजनशून्य कारभारचे लक्षण असून यात मोठे आर्थिक समिकरण जुळविले जात आहे, असा आरोपही किशोर जोरगेवार यांनी केला आहे. पाणी कपातीबाबत मनपा आयुक्त बोलायला तयार नाही. मात्र आमचा संयम आता संपला आहे. आजवर आम्ही पाणी द्या, अशी वारंवार विनंती केली होती. परंतू यापुढे आम्ही विनंती करणार नाही तर आमच्या हक्काचे पाणी हिसकावून मिळवू. या लढाईत कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास याला मनपा प्रशासन जवाबदार असेल, असेही जोरगेवार यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.

Web Title: Not even water!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.