निसर्गाने नटलेले गाव समस्यांनी वेढले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2018 11:22 PM2018-10-15T23:22:02+5:302018-10-15T23:22:55+5:30

जिवती पंचायत समिती अंतर्गत येणारी धनकदेवी ग्रामपंचायत ही शंभर टक्के आदिवासी ग्राम पंचायत असून याअंतर्गत सहा गावांचा समावेश होतो. धनकदेवी, मरकागोंदी, कारगाव बु., कारगाव खु. पाटागुडा आणि जांभूळधरा ही सहा गावे जंगलात असून निसर्ग सानिध्यात आहेत. यापैकी २५ घरांची वस्ती असलेले पाटागुडा गाव डोंगराच्या पायथ्याशी तसेच दुसऱ्या बाजुला पकडीगुडम तलावाला लागूनच वसले आहे. ही गावे मागील अनेक वर्षांपासून विविध समस्यांनी ग्रस्त आहेत.

Nature-filled villages are surrounded by problems | निसर्गाने नटलेले गाव समस्यांनी वेढले

निसर्गाने नटलेले गाव समस्यांनी वेढले

Next
ठळक मुद्देशासनाचे दुर्लक्ष :पावसाळ्यात गावाचा तुटतो संपर्क

संघरक्षित तावाडे।
लोकमत न्यूज नेटवर्क
जिवती : जिवती पंचायत समिती अंतर्गत येणारी धनकदेवी ग्रामपंचायत ही शंभर टक्के आदिवासी ग्राम पंचायत असून याअंतर्गत सहा गावांचा समावेश होतो. धनकदेवी, मरकागोंदी, कारगाव बु., कारगाव खु. पाटागुडा आणि जांभूळधरा ही सहा गावे जंगलात असून निसर्ग सानिध्यात आहेत. यापैकी २५ घरांची वस्ती असलेले पाटागुडा गाव डोंगराच्या पायथ्याशी तसेच दुसऱ्या बाजुला पकडीगुडम तलावाला लागूनच वसले आहे. ही गावे मागील अनेक वर्षांपासून विविध समस्यांनी ग्रस्त आहेत.
पाटागुडा गाव शंभर टक्के आदिवासी असून या गावात शासनाच्या योजना पोहचल्याच नाही. रस्ते, आरोग्य, शिक्षण, पाणी या समस्यांनी एकप्रकारे गावाला वेढलेले दिसून येते. या गावात जातो म्हटले तर पक्का रस्ता नाही. कच्चा रस्ता असून रस्त्यावर जागोजागी खड्डे पडले आहेत. जाणाऱ्या रस्त्यावर छोटे - छोटे नाले असून आजही नाल्यातून पाणी वाहत आहे.
एवढेच नाही तर पावसाळ्यात या गावाचाच संपर्क तुटतो, ही वास्तविकता आहे. गावाच्या बाहेर लागूनच एक विहीर आहे. पण पाणी मात्र गढूळ आहे. यात ब्लिचींग पावडरसुद्धा टाकत नसून याच खराब पाण्यावर गावकºयांना तहान भागवावी लागत असल्याचे गावकºयांनी प्रस्तुत प्रतिनिधीजवळ व्यथा मांडली. गावात आरोग्य सेवक आरोग्याची तपासणी करायला येत नाही. एवढेच काय तर पावसाच्या दिवसात गावात आरोग्याची तसेच रूग्णाची बिकट परिस्थिती असल्याचे गावकऱ्यांनी सांगितले.
गावाला रस्ता नसल्याने आमच्या लहान - लहान मुलांना प्राथमिक शिक्षणापासूनच बाहेरगावला शाळेत शिकायला ठेवावे लागते, अशी खंतही गावकऱ्यांनी लोकमतशी बोलताना व्यक्त केली.
धणकदेवी ग्रामपंचायत मुख्यमंत्र्यांनी दत्तक घेतले असले तरी याच अंतर्गत येणाऱ्या पाटागुड्यात मात्र समस्या पाहायला मिळतात. आॅगस्ट महिन्यात झालेल्या ग्रामसभेत या गावासाठी रस्त्याचा ठराव मंजूर करण्यात आल्याचे कळले. या क्षेत्राच्या पंचायत समिती सदस्य अनिता सुग्रिव गोतावळे यांनी पाटागुडा गावासाठी दीड किमी रस्ता बांधकामासाठी सतत अधिकाऱ्यांकडे पाठपुरावा केला.
परंतु, निधीची उपलब्धता नसल्याचे कारण सांगत आजपर्यंत हा रस्ता मंजूर करण्यात आलेला नाही. एकंदरीत निसर्गाने नटलेले हे गाव समस्येने वेढले आहे, असेच म्हणावे लागेल.
चिमुकल्यांच्या शिक्षणाची काळजी कोण घेणार?
गावात शाळा नसली तरी मुलांना जवळच्या गावात जाऊन शिकायला पाठवितो म्हटल्यास चांगला रस्ता नाही. रस्त्यावरून पावसाच्या दिवसात पाणी वाहत असते. मग मुलांना कसे पाठवावे, हा पालकांचा प्रश्न आहे. शासन शिक्षणावर भर देत असले तरी पाटागुड्यासारख्या गावातील आदिवासी चिमुकल्यांच्या शिक्षणाचे काय, हा प्रश्न पडतो. प्राथमिक शिक्षणापासूनच चिमुकल्या मुलांना बाहेरगावी शिक्षणासाठी पाठवावे लागते, ही मोठी शोकांतिका आहे.

गावात अनेक समस्या असून यासाठी शासनाकडे सतत पाठपुरावा सुरू आहे. रस्त्याची समस्या मुख्य असून ही समस्या सोडविण्यासाठी लोकप्रतिनिधी व शासनाने पावले उचलावी.
-अविनाश मडावी, ग्रामस्थ, पाटागुडा

Web Title: Nature-filled villages are surrounded by problems

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.