नागभीड-नागपूर रेल्वेमार्ग अधांतरीच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2019 10:13 PM2019-01-18T22:13:52+5:302019-01-18T22:15:03+5:30

नागभीड - नागपूर रेल्वे मार्ग अधांतरीच आहे. शासकीय पातळीवर या ब्राडगेज संदर्भात कोणत्याही हालचाली नसल्याने या परिसरात तीव्र संताप व्यक्त होत आहे.

Nagbhid-Nagpur railway line halts | नागभीड-नागपूर रेल्वेमार्ग अधांतरीच

नागभीड-नागपूर रेल्वेमार्ग अधांतरीच

Next

घनश्याम नवघडे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागभीड : नागभीड - नागपूर रेल्वे मार्ग अधांतरीच आहे. शासकीय पातळीवर या ब्राडगेज संदर्भात कोणत्याही हालचाली नसल्याने या परिसरात तीव्र संताप व्यक्त होत आहे.
खरे तर ममता बॅनर्जी रेल्वे मंत्री असताना १०६ कीमी लांबीच्या या नॅरोगेज मार्गास ब्रॉडगेजमध्ये रूपांतर करण्याची परवानगी देण्यात आली होती. पण प्रत्येक वेळेस अर्थसंकल्पात तरतूदच करण्यात येत नसल्याने हा मार्ग उपेक्षेचा बळी ठरत आला आहे.
दरम्यान, केंद्रात भाजपचे सरकार सत्तेवर आल्याने या सरकारकडून या मार्गाविषयी या भागातील लोकांच्या खूप अपेक्षा वाढल्या होत्या. या लोकसभा क्षेत्राचे खासदार अशोक नेते यांनी निवडून आल्यावर काही दिवसातच नागभीड येथे रेल्वेच्या प्रमुख अधिकाऱ्यांची बैठक घेऊन या मार्गातील अडचणी दूर करण्याचे निर्देश दिले होते. त्यामुळे या अपेक्षेत आणखीच भर पडली होती. या बाबीस आता साडे चार वर्षांचा कालावधी होत असला तरी या मार्गासाठी कोणतीही तरतूद होत नसल्याने लोकांच्या अपेक्षेवर पाणी फेरल्या जात आहे. या मार्गास ७०८ कोटी ११ लाख रुपये खर्च असून यातील निम्मा वाटा राज्य सरकारने उचलायचा आहे. आणि राज्य सरकारने तशी कबुलीही दिली आहे.
खरे तर हा मार्ग केवळ गडचिरोली - चिमूर लोकसभा क्षेत्राशीच सबंधित नाही तर नागपूर, रामटेक व भंडारा या लोकसभा क्षेत्रांशीही सबंधित आहे. याचा अर्थ नागपूरचे खासदार व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचाही या मार्गाशी संबंध आहे.
ना. गडकरी यांनी आपले वजन खर्च केले तर अर्थसंकल्पात निश्चितच भरीव तरतूद होण्यास वेळ लागणार नाही, असे यासंदर्भात बोलले जात आहे.
एकमेव मार्ग
मध्य रेल्वे विभागात जे काही रेल्वे मार्ग आहेत, त्या सर्व रेल्वे मार्गांचे ब्रॉडगेजमध्ये रूपांतर झाले आहे. केवळ नागभीड - नागपूर हाच एकमेव मार्ग नॅरोगेज उरलेला आहे. १०६ कीमी लांबीच्या या रेल्वे मार्गाचे ब्रॉडगेजमध्ये रूपांतर झाल्यास चंद्रपूर जिल्ह्यातील मूल, सिंदेवाही, नागभीड, ब्रम्हपुरी, गडचिरोली जिल्ह्यातील वडसा, कुरखेडा ,आरमोरी, गडचिरोली, भंडारा जिल्ह्यातील पवनी व लाखांदूर या तालुक्यांना नागपूरसाठी अतिशय सोयीचा मार्ग ठरू शकतो. एवढेच नाही तर या भागातील कृषी उत्पादनासाठी या मार्गाच्या रूपाने नागपूरसारखी बाजारपेठ उपलब्ध होऊ शकते .
महाप्रबंधकही संदिग्ध
द.पू.म.रेल्वेच्या बिलासपूर झोनचे महाप्रबंधक सुनीलसिंह सोहीन यांनी गुरूवारी नागभीड स्टेशनला भेट दिली असता माध्यमांनी त्यांना यासंदर्भात छेडले असता तेही याबाबत स्पष्ट उत्तर देऊ शकले नाही. त्यामुळे या रेल्वे मागाबाबत, शंकाच आहे.

Web Title: Nagbhid-Nagpur railway line halts

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.