चंद्रपूर जिल्ह्यातील लॉयड्सला लागणार ४८ तासात टाळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 8, 2018 09:33 AM2018-02-08T09:33:03+5:302018-02-08T09:36:14+5:30

सातत्याने प्रदूषण ओकणाऱ्या घुग्घुस येथील लॉयड्स स्टील मेटल्स कंपनीला येत्या ४८ तासात बंद करण्याचा आदेश मुंबईच्या महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने बुधवारी बजावला आहे.

Lloyd's in Chandrapur district will have to locked within 48 hours | चंद्रपूर जिल्ह्यातील लॉयड्सला लागणार ४८ तासात टाळे

चंद्रपूर जिल्ह्यातील लॉयड्सला लागणार ४८ तासात टाळे

Next
ठळक मुद्देमहाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने बजावले आदेश प्रदूषण रोखण्यात व्यवस्थापन अपयशी

राजेश भोजेकर ।
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : सातत्याने प्रदूषण ओकणाऱ्या घुग्घुस येथील लॉयड्स स्टील मेटल्स कंपनीला येत्या ४८ तासात बंद करण्याचा आदेश मुंबईच्या महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने बुधवारी बजावला आहे. चंद्रपूर जिल्ह्यात प्रदूषण सोडणाऱ्या कारखान्यांची संख्या मोठी आहे. लॉयड्स स्टील मेटल्स कंपनीला मिळालेल्या बंदच्या आदेशाने प्रदूषण ओकणाऱ्या चंद्रपूर जिल्ह्यातील अन्य कंपन्यांना मोठी चपराक बसली आहे.
चंद्रपूरपासून २६ कि.मी.वर घुग्घुस येथे हा कारखाना आहे. या कारखान्यात प्रदूषण नियंत्रणासाठी असलेली यंत्रणा निकामी आहे. परिणामी कंपनीद्वारे होणाऱ्या प्रदूषणामुळे नागरिकांना विविध आजार जडले असून परिसरातील शेतपिकांचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. कंपनीद्वारे सोडण्यात येणारे पाणीही घातक असल्याची तक्रार चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे सचिव व २०१४ मधील चंद्रपूर विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेसचे उमेदवार महेश मेंढे यांनी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ व जिल्हाधिकारी यांच्याकडे केली होती. मात्र या तक्रारीवर कोणत्याही हालचाली न झाल्याने महेश मेंढे यांनी विधान परिषदेचे उपसभापती माणिकराव ठाकरे यांच्याकडे धाव घेऊन प्रदूषणाची गांभिर्यता त्यांच्या निदर्शनास आणून दिली. यानंतर उपसभापती ठाकरे यांनी चंद्रपूर येथील महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या विभागीय कार्यालयाला चौकशीचे आदेश बजावले होते. या चौकशी अहवालात धक्कादायक वास्तव पुढे आले. यानंतर नीरीच्या माध्यमातूनही मोका चौकशी करण्यात आली. हा अहवालही आज दि. ७ फेब्रुवारी रोजी सादर करण्यात आला. यामध्येही कंपनीवर गंभीर ठपका ठेवण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. तक्रारकर्ते महेश मेंढे यांचा सातत्याने पाठपुरावा सुरूच होता. यासोबतच विविध पातळीवर सदर कारखान्याद्वारे होणाऱ्या प्रदूषणाच्या तक्रारीचा आधार घेऊन अखेर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला कंपनीला बंद करण्याचे आदेश काढावे लागले.

तरच कंपनी सुरू करता येणार
बंददरम्यान कंपनी व्यवस्थापनाने प्रदूषण रोखण्याबाबत आवश्यक त्या उपाययोजना करणे गरजेचे आहे. त्या उपायोजना केल्यानंतर कंपनी सुरू करण्याबाबतचा प्रस्ताव महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला सादर करावा लागणार आहे. त्यानंतर त्याची तपासणी करून कंपनी सुरू करण्याचा परवाना दिला जाणार आहे.

‘लोकमत’ने टिपली प्रत्येक घडामोड
कंपनीतून होणाऱ्या प्रदूषणाची तक्रार झाल्यानंतर शासन व प्रशासनाच्या पातळीवर झालेल्या प्रत्येक घडामोडींची माहिती ‘लोकमत’ने सर्वप्रथम वाचकांपर्यंत पोहचविली हे विशेष.

लॉयड्स कंपनीच्या राक्षसी प्रदूषणामुळे नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत आहे. शेतातील कापूस काळा पडून शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत असल्याची तक्रार जिल्हाधिकारी व महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे केली होती. मात्र त्यांनी गांभिर्याने न घेतल्याने विधान परिषदेचे उपसभापती माणिकराव ठाकरे यांच्याकडे तक्रार केली. त्यांनी ही तक्रार अतिशय गांभिर्याने घेतल्याने महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रणाने अखेर कंपनीला ४८ तासात बंद करण्याचे आदेश बजावले आहे. प्रदूषणावरुन एखाद्या कंपनीला बंद करण्याची पाळी येत असेल, तर अन्य कंपन्यांनीही यापासून धडा घेण्याची गरज आहे.
- महेश मेंढे, तक्रारकर्ते व सचिव चंद्रपूर जिल्हा शहर काँग्रेस कमिटी, चंद्रपूर.

Web Title: Lloyd's in Chandrapur district will have to locked within 48 hours

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.