भाकरीचा शोधच ठरला नम्रताचा काळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2018 12:31 AM2018-02-19T00:31:26+5:302018-02-19T00:32:04+5:30

मानवाला जगण्यासाठी दोन सांजेची भाकर गरजेची असते. याच भाकरीसाठी त्याला अनेक कष्ट उपसावे लागतात. कष्टातूनच दोन वेळची भ्रांत भागवली जाते.

 It was a matter of humble time | भाकरीचा शोधच ठरला नम्रताचा काळ

भाकरीचा शोधच ठरला नम्रताचा काळ

Next
ठळक मुद्देकुणाल व कृतिकाचा आधार हरपला

राजकुमार चुनारकर।
ऑनलाईन लोकमत
चिमूर : मानवाला जगण्यासाठी दोन सांजेची भाकर गरजेची असते. याच भाकरीसाठी त्याला अनेक कष्ट उपसावे लागतात. कष्टातूनच दोन वेळची भ्रांत भागवली जाते. याच भाकरीसाठी चिमूर तालुक्यातील नेरी गावातील नम्रता राजेंद्र पिसे घरच्या हलाखीच्या परिस्थितीमुळे दोन सांजेच्या भाकरीच्या शोधात शेतावर मजुरीसाठी गेली. दरम्यान, याच दरम्यान झालेल्या वाघाच्या हल्ल्यात नम्रता पिसे या महिलेला आपला जीव गमवावा लागला. भाकरीचा शोधच तिच्यासाठी काळ ठरला.
चिमूर तालुक्याचा परिसर हा ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाला लागलेला असल्याने या गावात जंगली प्राण्यांचा नेहमी वावर असतो. त्यामुळे या गावात अनेकदा वन्यप्राणी येतात तर परिसरातील नागरिक सरपनासाठी किंवा गुरे चारण्यासाठी जंगलात गेले असता अनेकावर वाघासह अस्वल आदी प्राण्यांनी हल्ले करून जखमी केले. अनेकांना जीव गमवावा लागल्याच्या घटना घडल्या आहेत.
चिमूरपासून १२ किमी अंतरावर असलेल्या नेरी येथील पेठ मोहल्यात नम्रता व राजेद्र पिसे कुणाल व कृतिका या आपल्या दोन अपत्यांसोबत राहत होते.
घरची परिस्थिती हलाखीची असल्याने राजेंद्र दुसऱ्याच्या गाडीवर चालक म्हणून काम करीत होता तर दोन मुलाचे शिक्षण व परिवाराचा खर्च एकट्या राजेंद्रवर येऊ नये, म्हणून नम्रता मिळेल त्या कामावर जायची.
नेहमीप्रमाणे पती राजेंद्र सकाळी वाहन घेऊन चालकाच्या चाकरीवर गेला. नम्रता आपल्या घरची कामे आटपून व पाचव्या वर्गात शिकणारा कुणाल व तिसऱ्या वर्गात शिकणारी कृतिकाची शाळेची तयारी करून वॉर्डातील चार महिलांसोबत नेरी-चिमूर रोडवरील लांजेवार यांच्या शेतात कापूस वेचायला गेली.
थोडा वेळ कापूस वेचत असतानाच दबा धरून बसलेल्या वाघाने नम्रताला काही कळायच्या आतच हल्ला करून नम्रताच्या नरडीचा घोट घेतला.
यामध्ये नम्रता गंभीर जखमी झाली. तिला उपचारासाठी उपजिल्हा रूग्णालय चिमूर येथे आणण्यात आले. मात्र गंभीर दुखापत असल्याने नागपूर येथे रेफर करण्यात आले. उपचारादरम्यान नम्रताचा मृत्यू झाला. नम्रताच्या अचानक जाण्याने कुणाल व कृतिका यांच्या डोक्यावरील मायेचा हात हिरावला आहे. यामुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे

Web Title:  It was a matter of humble time

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Tigerवाघ