शेकडो एकरातील उगविलेले अंकुर कोमेजणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2018 10:54 PM2018-06-25T22:54:40+5:302018-06-25T22:55:03+5:30

मॉन्सूनच्या पहिल्या पावसाने हजेरी लावल्याने तालुक्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांनी पऱ्हे टाकले. पावसाने उघाड दिल्याने मातीत उगविलेले अंकुर करपण्याच्या मार्गावर आले आहेत.

Hundreds of grassroots shoots will grow | शेकडो एकरातील उगविलेले अंकुर कोमेजणार

शेकडो एकरातील उगविलेले अंकुर कोमेजणार

Next
ठळक मुद्देशेतकऱ्यांमध्ये चिंता : पावसाने दडी मारल्याने हजारो हेक्टरवरील पेरण्या खोळंबल्या

लोकमत न्यूज नेटवर्क
सिंदेवाही : मॉन्सूनच्या पहिल्या पावसाने हजेरी लावल्याने तालुक्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांनी पऱ्हे टाकले. पावसाने उघाड दिल्याने मातीत उगविलेले अंकुर करपण्याच्या मार्गावर आले आहेत.
सिंचनाची सुविधा असलेले शेतकरी पिकांना पाणी देत आहेत. पण बहुतांश शेतकऱ्यांना पावसाची प्रतीक्षा आहे. पाऊसच नसल्याने पेरण्या खोळंबल्या आहेत. मॉन्सूनपूर्व पावसाचे जोरदार आगमन झाल्याने शेतकऱ्यांनी मशागत करून पेरणीची तयारी केली. आठ दिवसांपासून पावसाने उघाड दिल्याने चिंताग्रस्त झाले आहेत. येत्या चार दिवसात पावसाचे आगमन झाले नाही तर धान उत्पादक शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट उभे राहू शकते. विहिर असलेल्या शेतकऱ्यांनी धानाचे पऱ्हे टाकले. पण सुविधा नसलेले शेतकरी चिंतेत दिसत आहे. मोहाळी व गुंजेवाही क्षेत्रात आठ दिवसांपासून पाऊस आला नाही. सिंचन सुविधा नसल्याने रोपे वाचविण्यासाठी विहिरींचा आधार घ्यावा लागत आहे. या परिसरात वन्य प्राण्यांकडून पिकांचे नुकसान होते. यावर्षीदेखील हाच प्रकार सुरू आहे. किन्ही व मुरमाडी परिसरात वाघाच्या भितीमुळे रोपांची निगराणी ठेवू शकत नाही. त्यामुळे मोठे नुकसान होते. पेरणी झाल्यापासून काही शेतकरी शेतावर चजात नाही आहे. मागील वर्र्षाच्या तुलनेत यंदा धान लागवडीचे क्षेत्र कमी झाले आहे.
पाऊसच नाही तर कशी करायची?
आयुधनिर्माणी (भद्रावती) : मृग नक्षत्र लागल्यानंतर सुरूवातीचे दोन दिवस बऱ्यापैकी हजेरी लावल्यानंतर पावसाने दडी मारलीे. त्यामुळे उकाड्याने नागरिक हैराण झाले. अंगाची लाहीलाही होत आहे. पाऊस केव्हा पडतो, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. जूनपासून पावसाळा सुरू होतो. हवामान खात्याने यंदा पाऊस समाधानकारक पडेल, असे भाकीत करून सगळ्यांना खुश करून टाकले होते. मात्र त्यांचे भाकीत चुकल्याची प्रतिक्रिया शेतकरी व्यक्त करीत आहेत.
सुरूवातीला पावसाने दमदार हजेरी लावल्याने शेतकऱ्यांच्या अपेक्षा उंचावल्या होत्या. पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला. उकाड्यापासून दिलासा मिळाला होता. वातावरण थंड झाल्याने आनंद पसरला होता. मात्र आठवडा उलटूनही पाऊस न पडल्याने वातावरण पुन्हा तापू लागले आहे. उन्हामुळे जीव कासावीस होत आहे. नागरिकांना घराबाहेर जाताना विचार करावा लागत आहे. पाऊस आला तर यंदा शेती कशी करायची, हा प्रश्न शेतकरी विचारू लागले आहेत.
कर्जाचा भार वाढण्याचा धोका
गेवरा : परिसरात धानाची शेती केली जाते. पण, पाऊस नसल्याने यंदा कर्जाचा भार वाढण्याचा धोका व्यक्त केला जात आहे. बहुतांश शेतकऱ्यांनी पऱ्हे टाकले. जून महिन्यात बºयापैकी पडणारा पाऊस गायब झाला. त्यामुळे शेतकऱ्याचे सर्व नियोजन कोलमडले आहे. अनेक शेतकºयांनी कर्ज काढून शेती केली. पण पाऊस आला नाही तर उत्पादन कसे होणार या प्रश्नाने शेतकरी धास्तावला आहे. खरीप पिके वाया गेल्यास शेतकऱ्यांवर आर्थिक संकटांची कुऱ्हाड कोसळण्याची स्थिती निर्माण झाली आहे.
हवामान विभागावर रोष
पोंभुर्णा : शेतकऱ्यांनी बियाणे व खताची खरेदी केली. काही शेतकऱ्यांनी कर्ज काढून पेरणीची वाट पाहत आहे. पण पाऊस नसल्याने खरीप हंगाम शुन्य नजरेने शेतकरी शेताकडे पाहत आहे. हवामान खात्याच्या खोट्या अंदाजाला बळी पडून पेरणीची घाई करणारा शेतकरी आता रोष व्यक्त करीत आहे. यंदा खरीप हंगामात चांगले पीक येईल या आशेवर रखरखत्या जमिनीची मशगत केली. जगण्याच्या उमेदीने शेतकऱ्यांनी पेरणी केली. हवामान विभागाच्या अंदाजावर विश्वास ठेवला. पण पाऊस न आल्याने शेतकºयाचे सर्व नियोजन वाया गेले आहे. पावसाअभावी उष्णता वाढली. पेरलेले बियाणे करपत आहे. उधार -उसणे करून बियाणे विकत घेतले. पावसाअभावी दुबार पेरणीच्या भीतीने शेतकरी चिंताग्रस्त झाला. तालुक्यात भाताची शेती अधिक प्रमाणात केली जाते. काही शेतकरी भाजीपाला लावतात. यावर यांचा उदरनिर्वाह चालतो. पण, पावसाच्या चिंतेने शेतकरी हतबल झाला. कृषी विभागाने या तालुक्यात योग्य मार्गदर्शन केले नाही. पुरेसा पाऊस नसल्याने पेरण्या करू नका, अशी माहिती गावागावांत पोहोचविण्यात आली नाही. त्यामुळे हंगाम टळेल या हेतूने बऱ्याच शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या. मात्र, पावसाने दगा दिल्याने आर्थिक नुकसान होण्याची शक्यता निर्माण झाली. कृषी विभागाने आता तरी मार्गदर्शन करावे, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

Web Title: Hundreds of grassroots shoots will grow

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.