ग्रामसभांनी जलआराखडा तयार करावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2018 11:34 PM2018-01-15T23:34:35+5:302018-01-15T23:35:22+5:30

शेतकऱ्यांना नियोजन सांगणारे अशा पद्धतीचे काम, त्यांना जलसाक्षर करणारे केंद्र सुरू करण्याबाबत वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याशी चर्चा झाली होती.

Gramsabha should prepare the water table | ग्रामसभांनी जलआराखडा तयार करावा

ग्रामसभांनी जलआराखडा तयार करावा

Next
ठळक मुद्देराजेंद्र सिंग : गावागावात स्वयंसेवेत काम करणारे जलदूत

आॅनलाईन लोकमत
चंद्रपूर : शेतकऱ्यांना नियोजन सांगणारे अशा पद्धतीचे काम, त्यांना जलसाक्षर करणारे केंद्र सुरू करण्याबाबत वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याशी चर्चा झाली होती. देशभरातील अन्य नेत्यांप्रमाणे तेदेखील चर्चा करतील व विसरून जातील, असे वाटत होते. मात्र त्यांनी दोन वर्षांत या विषयाचा पाठपुरावा केल. अर्थसंकल्पात तरतूद केली. यशदा, वनविभाग व महसूल विभाग यांना यामध्ये सहभागी केले. हे अभियान सुरू करण्यासाठी स्वत: संपर्कात राहून प्रत्यक्ष यंत्रणा उभी केली. गावागावात स्वयंसेवेत काम करणारे जलदूत उभे केलेत. आता ग्रामसभांमधून आपल्या गावाचा जल आराखडा तयार करण्याचे कार्य व्हावे, असे मत जलपुरुष डॉ. राजेंद्र सिंग यांनी व्यक्त केले.
चंद्रपूर येथील चांदा क्लब ग्राऊंडवर सोमवारी जलसाक्षरता केंद्राचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. यावेळी राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर, जलसंधारण मंत्री राम शिंदे यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
याप्रसंगी जलपुरूष डॉ. राजेंद्र सिंग यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला. पाऊस-पाण्याचा बदल लक्षात घेऊन पिकाचे नियोजन करा, असे आवाहन त्यांनी शेतकºयांना केले. भारतातील पहिले जलसाक्षरता केंद्र चंद्रपूर येथे सुरू होत असल्याचा आनंदही त्यांनी व्यक्त केला.
१५ ते १९ जानेवारी या काळात जिल्हाभरातील शेतकऱ्यांना जल, जमीन, जंगल यांच्या बळकटीकरणाला उभारी देणारे विविध मार्गदर्शन सत्र, कार्यशाळा, प्रदर्शन व विक्री अनुभवायला मिळणार आहे. कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा), जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, जलसंपदा विभागाअंतर्गत विभागीय जलसाक्षरता केंद्र चंद्रपूर यांच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. दोन भव्य मार्गदर्शन हॉल, योजना व माहिती, कृषी तंत्रज्ञान, कृषी निविष्ठा, सेंद्रीय शेती, बिगर सेंद्रीय शेती यांचे दालन, शेतमाल विक्री, माहिला बचत गटांचे विक्री प्रदर्शन, पशुसंवर्धन विकासांची प्रदर्शनाचे एकूण चार वेगवेगळे दालन, अशी चांदा क्लबला व्यापणारी भव्यता यामध्ये आहे.
यावेळी ना. सुधीर मुनगंटीवार म्हणाले, चंद्रपूर जिल्ह्यामध्ये कृषी वाचनालयाचा प्रायोगिक प्रकल्प २१ गावांमध्ये सुरू केला आहे. १२५ पुस्तके याठिकाणी देण्यात आली आहे. शेतीबद्दल आत्मियता वाढावी, हा यामागील उद्देश आहे. उथलपेठमध्ये मशरुमचा प्रयोग करण्यात आला. या प्रयोगाला कसा प्रतिसाद मिळतो, याकडे लक्ष ठेवून आहोत. जिल्हात पंजाब नॅशनल बँकेच्या मदतीने समुद्रपूर येथे शेती प्रशिक्षण केंद्र उभारण्याचे काम सुरू आहे. चंद्रपूरमध्ये सुरू करण्यात आलेले बांबू संशोधन आणि प्रशिक्षण केंद्र शेतकºयांसाठी वरदान ठरत असून यामाध्यमातून शेकडो कुटुंबांना रोजगार मिळत आहे. त्यामध्ये वृद्धी करण्याचा आमचा संकल्प आहे.
लवकरच या विभागात कृषीवर आधारित राष्ट्रीय दर्जाच्या कौशल्य विकास केंद्राचे निर्माण करण्यासाठी केंद्र शासनाकडे मागणी केली आहे. जिल्हात मदर डेअरीचा प्रकल्प सुरू होत असून मोठ्या प्रमाणात दुध उत्पादक शेतकºयांची संख्या वाढवणे आमचे उद्दिष्ट आहे. मात्र हे सर्व करतांना यामध्ये शेतकºयांचा सहभाग महत्त्वाचा आहे. त्यासाठी प्रत्येकाने आपले योगदान द्यावे, असे आवाहन त्यांनी केले.
या कार्यक्रमामध्ये जिल्हा ग्रामीण यंत्रणेच्या आयोजनाचे प्रास्ताविक मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र पापळकर, विभागीय जलसाक्षरता केंद्राच्या शुभारंभाचे प्रास्ताविक विदर्भ पाटबंधारे विभागाचे कार्यकारी संचालक अविनाश सुर्वे, कृषी महोत्सवाचे प्रास्ताविक कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणेच्या प्रकल्प संचालक विद्या मानकर यांनी केले.
जलयुक्त शिवार ही लोकचळवळ -शिंदे
जलयुक्त शिवारसारखी योजना महाराष्ट्राने यशस्वी केली आहे. या अभियानाला आजच्या जलसाक्षरता अभियानाने बळकटी येणार असून सुधीर मुनगंटीवार हे कृषी क्षेत्रासाठी अतिशय सकारात्मक असणारे मंत्री आहे. राज्यात जलयुक्त शिवारने जमिनीखालील पाण्याच्या पातळीत दीड ते दोन मीटरने वाढविली आहे. जलयुक्त शिवार लोकचळवळ झाले आहे, असे प्रतिपादन जलसंधारण मंत्री राम शिंदे यांनी केले. शेतकऱ्यांना हजारो कोटींची कर्जमाफी देताना ना. मुनगंटीवार यांनी जलयुक्त शिवार योजनेला कोणतीही कपात सूचवली नाही. ‘जल है तो कल है’ याची जाणीव ठेवणारा वनमंत्री महाराष्ट्राकडे असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. यावेळी शेतकऱ्यांशी संवाद साधताना त्यांनी आपल्या घराघरातील वर्षाच्या, महिन्याच्या आर्थिक बजेटप्रमाणे पाण्याचेदेखील नियोजन करा, असे आवाहन केले.

Web Title: Gramsabha should prepare the water table

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.