इरई नदीला हवा निधी !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2018 12:15 AM2018-01-15T00:15:38+5:302018-01-15T00:17:01+5:30

चंद्रपूरची जीवनदायिनी असलेल्या इरई नदीचे प्रथम वाटोळे करण्यात आले.

Funds to the river Irai! | इरई नदीला हवा निधी !

इरई नदीला हवा निधी !

Next
ठळक मुद्देसिंचन विभाग हतबल : खोलीकरणाचे काम ठप्प

आॅनलाईन लोकमत
चंद्रपूर : चंद्रपूरची जीवनदायिनी असलेल्या इरई नदीचे प्रथम वाटोळे करण्यात आले. त्यानंतर आंदोलने केल्यामुळे प्रशासन खडबडून जागे झाले आणि इरई नदीच्या खोलीकरणासाठी प्रयत्न करू लागले. अखेर यासाठी शासनाकडून मंजुरी मिळाली आणि २०१५ मध्ये नदीच्या रुंदीकरण व खोलीकरणाचे काम सुरू झाले. पावसाळ्यात हे काम थांबविण्यात आले होते. मात्र त्यानंतर हिवाळा लोटत असतानाही खोलीकरणाचे काम ठप्पच आहे. निधी नसल्यामुळे सिंचन विभागही आपली हतबलता दाखवित आहे.
अलिकडच्या काळात चंद्रपूर शहरासह जिल्ह्याचा औद्योगिक विकास झाला. एमईएल, चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्र, वेकोलिच्या कोळसा खाणी व चंद्रपूर एमआयडीसीमध्ये अनेक उद्योग आले. या उद्योगांनी इरई नदीचे वाटोळे केले. इरई नदी चंद्रपूरकरांसोबतच अनेक गावांची तहान भागविणारी नदी आहे. चंद्रपूर शहराला ही नदी लागून असतानाही या नदीचे जिल्हा प्रशासन जतन करू शकले नाही. पठाणपुरा गेटबाहेर इरई नदीच्या पात्राला लागूनच वेकोलिचे मातीचे महाकाय ढिगारे आहेत. या ढिगाºयामुळे इरई नदीचे पात्रच बदलले. याशिवाय पावसाळ्यात इरई नदीतील पाणी वाहून जाण्यास अडथळा निर्माण झाला. यामुळे अनेकदा चंद्रपूरकरांना पूरपरिस्थितीचा सामना करावा लागला. याशिवाय गाळ कधीच उपसण्यात न आल्याने या नदीत प्रचंड गाळ साचला. कुशाब कायरकर यांची ‘वृक्षाई’, इरई नदी बचाव संघर्ष समिती, इको प्रो, ग्रिन प्लॅनेट या संघटनेनेही आपापल्या परीने इरई वाचविण्यासाठी लढा उभारला. प्रसंगी आंदोलने केली. ‘लोकमत’ने इरईची होत असलेली वाताहात वेळोवेळी प्रशासनाच्या निदर्शनात आणून दिली. त्यामुळे प्रशासनाला याची दखल घ्यावीच लागली. तत्कालीन जिल्हाधिकारी डॉ. दीपक म्हैेसेकर यांनी यासाठी पुढाकार घेत वेकोलि व वीज केंद्राला सहकार्य करण्यास भाग पाडले. त्यातून सिंचन विभागाद्वारे इरई नदीच्या खोलीकरणाला २० मे २०१५ रोजी प्रारंभ झाला. आतापर्यंत पडोली ते चवराळापर्यंतचे खोलीकरण आणि रुंदीकरण करण्यात आले.
यावर्षीच्या पावसाळ्यात खोलीकरणाचे काम थांबविण्यात आले. मात्र पावसाळा संपल्यानंतर काम सुरूच करण्यात आले नाही. हिवाळा लोटत असतानाही खोलीकरणाचे काम सुरू झालेले नाही. सिंचन विभाग निधीच नसल्याचे कारण पुढे करीत आहे. एकीकडे जिल्ह्यात विकासकामांचा सपाटा सुरू असताना चंद्रपूरच्या जीवदायिनीसाठी निधी मिळू नये, याबाबत संताप व्यक्त केला जात आहे.
राजेंद्र सिंग यांनी लक्ष द्यावे
नागपूर विभागात जलसाक्षरता केंद्र उभारण्यासाठी चंद्रपूरची निवड केली आहे. या केंद्राच्या उद्घाटनासाठी सोमवारी जलपुरुष राजेंद्र सिंग, राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, जलसंधारण व राजशिष्टाचार मंत्री राम शिंदे चंद्रपुरात येत आहेत. पाण्याशी संबंधित एक नवा अध्याय सोमवारी चंद्रपूरशी जुळला जाणार आहे. अशावेळी इरई नदीसाठी तत्काळ निधी मिळण्यासाठी प्रयत्न व्हावा, अशी मागणी पर्यावरणवांद्यांची आहे.
असे झाले खोलीकरण
२० मे २०१५ रोजी इरई नदीच्या खोलीकरणाला प्रारंभ झाला. प्रथम पडोली पुलापासून दाताळा पुलापर्यंत १५० मीटरपर्यंत नदीपात्राचे खोलीकरण करण्यात आले. त्यानंतर दुसऱ्या वर्षी दाताळा पुलापासून चौराळा पुलापर्यंतच्या पात्राचे खोलीकरण व रुंदीकरण करण्यात आले. हडस्तीजवळच्या वर्धा नदीच्या संगमापर्यंत इरई नदीचे खोलीकरण करणे प्रस्तावित आहे. मात्र हे काम आता रखडले आहे.

Web Title: Funds to the river Irai!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.