Five hospitals will be upgraded to power renewal | पाच रुग्णालयांचे होणार विद्युत नूतनीकरण

ठळक मुद्दे२ कोटी २७ लाखांची तरतूद : रुग्णालयातील तांत्रिक अडचणी दूर होणार

आॅनलाईन लोकमत
चंद्रपूर : मागील काही वर्षांपासून जिल्ह्यातील ब्रह्मपुरी, सिंदेवाही, सावली, नागभीड येथील ग्रामीण रुग्णालय आणि चिमूर येथील उपजिल्हा रुग्णालयातील विद्युत नुतनीकरणाचे काम रखडले होते. त्यामुळे तांत्रिक समस्यांचा सामना करावा लागत होता. शासनाने २ कोटी २७ लाख १७ हजार ७७६ रुपयांच्या अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता दिली. त्यामुळे ही कामे आता लवकरच मार्गी लागण्याची आशा निर्माण झाली आहे.
ग्रामीण रुग्णालय ब्रह्मपुरी, सिंदेवाही, सावली, नागभीड आणि चिमूर येथील उपजिल्हा रुग्णालयात विद्युतकरणाची कामे अर्धवट होते. त्यामुळे वीज पुरवठा वारंवार खंडीत होण्याचे प्रकार सुरू आहे. अद्यावत आरोग्य सुविधा देत असताना विद्युत नुतनीकरण न झाल्याने विविध समस्यांचा सामना करावा लागत होता. अतिशय जुनाट पद्धतीने वीज फिटिंग केल्याने आधुनिक सुविधा देणे कठिण झाले. या तालुक्यांतील नागरिक प्रामुख्याने ग्रामीण रुग्णालयावरच अवलंबून आहेत. त्यामुळे सुसज्ज वैद्यकिय सुविधा देण्यासाठी विद्युत पुरवठा नियमित सुरू ठेवणे गरजेचे होते. शासनाने ग्रामीण रुग्णालय व उपजिल्हा रुग्णालयाची इमारत उभारली. मात्र विद्युत नुतनीकरण न झाल्याने आरोग्य सुविधा मिळत नव्हत्या. यासंदर्भात लोकप्रतिनिधींनीही प्रशासनाकडे लक्ष वेधले. आरोग्य सेवा संचालनालयाकडे तक्रार करून विद्युत नुतनीकरण करण्याची मागणी केली होती. सार्वजनिक बांधकाम विभागाने इमारती उभ्या करताना विद्युत नुतनीकरणाची शिफारस केली होती. परिणामी तत्कालीन जिल्हा शल्यचिकित्सकांनी विद्युत नुतनीकरणासंदर्भात राज्य शासनाकडे पत्रव्यवहार केला. दरम्यान, सार्वजनिक आरोग्य विभागाने विद्युत नुतनीकरणाच्या कामाचे अंदाजपत्रक व आराखड्यास प्रशासकीय मान्यता दिली. शिवाय २ कोटी १७ लाख १७ हजार ७७६ रुपयांना मंजुरी प्रदान केली. कामाची निविदा येत्या काही दिवसात काढण्यात येणार असून विद्युत नुतनीकरणाचे रखडलेले काम पुर्ण होण्याची आशा निर्माण झाली आहे.
वास्तु मांडणी आराखडा
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मुख्य वास्तूशास्त्रज्ञांकडून विद्युत नुतनीकरणाच्या कामाचे नकाशे तयार करण्यात येणार आहे. शिवाय वास्तु मांडणी आराखडा तयार करून त्याचे सादरीकरण केले जाईल. ह्या आराखड्याला वेगळ्या मंजुरीची आवश्यकता राहणार नाही. कामाच्या जागेची उपलब्धता, योग्यता याबाबतची खात्री ग्रामीण रुग्णालय तसेच उपजिल्हा रुग्णालयाच्या वरिष्ठ अधिकाºयांना करावी लागणार आहे.