मुख्यमंत्र्यांवरील आपला विश्वास उडाला, लवकरच राजीनामा देणार - भाजपा आमदार

By ऑनलाइन लोकमत | Published: February 2, 2018 02:22 PM2018-02-02T14:22:32+5:302018-02-02T14:41:06+5:30

वेगळ्या विदर्भाबाबत आपण मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं होतं त्याचं उत्तर अद्याप मिळालं नसल्यामुळे मुख्यमंत्र्यांवरील आपला विश्वास उडाला आहे.

Fears your faith in CM, will resign soon - BJP MLA | मुख्यमंत्र्यांवरील आपला विश्वास उडाला, लवकरच राजीनामा देणार - भाजपा आमदार

मुख्यमंत्र्यांवरील आपला विश्वास उडाला, लवकरच राजीनामा देणार - भाजपा आमदार

Next

चंद्रपूर – वेगळ्या विदर्भाबाबत आपण मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं होतं त्याचं उत्तर अद्याप मिळालं नसल्यामुळे मुख्यमंत्र्यांवरील आपला विश्वास उडाला आहे. त्यामुळे योग्य वेळ येताच आपण आमदारकीचा राजीनामा देणार असल्याचं वक्तव्य  भाजपचे काटोलचे नाराज आमदार डॉ. आशिष देशमुख यांनी केलं आहे. आशिष देशमुख यांची ‘विदर्भ आत्मबळ यात्रा’ चंद्रपुरात पोहचली आहे. वेगळ्या विदर्भाच्या मागणीसाठी भाजपला कोंडीत पकडून त्यांनी ही यात्रा सुरु केली आहे. 

विदर्भ राज्याच्या मागणीसाठी ७ जानेवारीपासून ‘विदर्भ आत्मबळ यात्रा’ सुरू करण्यात आली आहे. या यात्रेच्या निमित्ताने बेरोजगार, शेतकरी, शेतमजुर आदींशी संवाद साधला जात आहे. विदर्भ विकासासाठी विदर्भ राज्याची निर्मिती होणे गरजेचे आहे. शिवसेना ही विदर्भ राज्य निर्मितीसाठी विरोध करीत असल्याने ती सरकारच्या गळ्याची हड्डी झाली होती. शिवसेनेने पुढील काळात स्वतंत्र निवडणूक लढण्याचे जाहीर केले आहे. याच संधीचे सोने विदर्भ राज्याच्या निर्मितीसाठी सरकारने केले पाहिजे. मागणीचा वेळीच विचार न झाल्यास आपण राजीनामाही देऊ, अशी माहिती आ. आशिष देशमुख यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली.

विदर्भ राज्य झाल्याशिवाय विदर्भाचा विकास शक्य नाही़ स्वतंत्र विदर्भ राज्यासाठी आपली आत्मबळ यात्रा सुरू असून, विदभार्साठी सर्व पर्याय खुले आहेत़. वेळ आल्यास आमदारकीचा त्याग करू. त्यामुळे भाजपाने दिलेल्या आश्वासनाप्रमाणे विदर्भ राज्याची निर्मिती करावी, अशी मागणी आमदार आशिष देशमुख यांनी करीत भाजपाला घरचा अहेर दिला़.  शेतकरी, बेरोजगार युवकांच्या समस्यांसह स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मागणीकडे राज्य आणि केंद्र सरकारचे लक्ष वेधण्यासाठी भाजपाचे काटोलचे आमदार डॉ़ आशिष देशमुख यांनी विदर्भ आत्मबळ यात्रा काढली. ही यात्रा गुरूवारी चंद्रपुरात पोहोचली़ यावेळी त्यांनी पत्रकार परिषद घेवून भाजपा सरकारच्या धोरणावर टिका केली. सुरुवातीपासूनच आपण विदर्भ राज्यासाठी संघर्ष करीत असून, यापूर्वी बेमुदत उपोषणसुद्धा केले होते़ त्यावेळी भाजपाचे तत्कालीन राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी आणि प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी भाजपा सरकार सत्तेवर येताच विदर्भ राज्य करू, असे आश्वासन दिले होते़. भाजपच्या नेत्यांनी अनेकदा विदर्भ राज्यासाठी अशासकीय ठरावसुद्धा मांडले आहेत़ मात्र, त्यांनी आता विदर्भ राज्याच्या मागणीवर चुप्पी साधली आहे, असे ते म्हणाले.

विदर्भात सर्वाधिक वीजनिर्मिती होते. सर्वाधिक कोळसा उत्पादन होते़ या उद्योगिकीकरणामुळे निर्माण प्रदूषणाचे चटके येथील जनतेला बसत आहे़ मात्र, येथील जनतेला २४ तास वीज मिळत नाही, अशी खंत त्यांनी व्यक्त केली़
भाजपा सरकारविरोधात जनतेमध्ये प्रचंड रोष आहे़ आगामी काळात हा रोष दिसून, येईल, असे संकेतही त्यांनी यावेळी दिले़ विदर्भ राज्याच्या मुद्यावर भाजपाचे आणखी काही आमदार आपल्यासोबत असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

शंकरपूर, भिसीत स्वागत
आमदार आशिष देशमुख यांच्या विदर्भ आत्मबळ यात्रेचे शंकरपूर व भिसीत दुपारच्या सुमारास आगमन झाले. त्यांच्या सोबत जि. प. सदस्य डॉ. सतीश वारजूकर, डॉ. रमेश गजबे, पं.स. सदस्य रोशन ढोक, भावना बावणकर, अमोद गौरकर, रामभाऊ भांडारकर, शामराव बोरकर, नितीन सावरकर, मोरेश्वर झाडे, प्राचार्य जाने यांच्यासह महाविद्यालयीन विद्यार्थी व नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले. यावेळी भिसीच्या ग्रामपंचायतीच्या वतीने आ. देशमुख यांचा सत्कार करण्यात आला. शंकरपूर येथेही सभा झाली.

Web Title: Fears your faith in CM, will resign soon - BJP MLA

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.