Enforce the plastic ban | प्लास्टिक बंदीची अंमलबजावणी करा
प्लास्टिक बंदीची अंमलबजावणी करा

ठळक मुद्देकुणाल खेमणार : जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : देशामध्ये महाराष्ट्राने सर्वप्रथम प्लास्टिक बंदी लागू सर्वांपुढे आदर्श निर्माण केला. पुढच्या पिढ्यांच्या सुरक्षिततेसाठी या कायद्याची काटेकोरपणे अंमलबजावणी आवश्यक आहे. त्यामुळे प्लास्टिक बंदीसाठी नव्या कायद्यानुसार प्राधिकृत अधिकाऱ्यांची नियुक्ती झाली. त्यामुळे कठोर कार्यवाही करून सक्रीयता दाखविणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी कुणाल खेमनार यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयात पर्यावरण विभागामार्फत आयोजित आढावा बैठकीमध्ये ते बोलत होते. राज्य शासनाच्या पर्यावरण विभागाने प्लास्टिक पिशवी व थर्माकोल मुक्त महाराष्ट्र जनजागृती अभियानाला सुरूवात केली आहे. या अभियानामध्ये महानगरपालिका व नगरपरिषदमध्ये आयुक्त, उपायुक्त, शॉप अ‍ॅण्ड एस्टॉब्लिशमेंट अधिकारी, निरीक्षक, अनुज्ञप्ती निरीक्षक, स्वच्छता निरीक्षक, आरोग्य निरीक्षक, आरोग्य अधिकारी यांना कार्यवाही करण्याचे अधिकार देण्यात आले आहे. याशिवाय उपजिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, तलाठ्यांना नामनिर्देशित केले. जिल्हा परिषदमार्फत मुख्य कार्यकारी अधिकारी, गटविकास अधिकारी, आरोग्य अधिकारी, विस्तार अधिकारी, शिक्षणाधिकारी, गटशिक्षणाधिकारी, ग्रामसेवक कार्यवाही करू शकतात. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ व पर्यावरण विभाग सदस्य सचिव, प्रादेशिक अधिकारी, उपप्रादेशिक अधिकारी, क्षेत्र अधिकारी, शास्त्रज्ञांनाही प्राधिकृत करण्यात आले.
आरोग्य विभागामार्फत संचालक, आरोग्यसेवा, उपसंचालक, आरोग्य अधिकारी, पुरवठा उपआयुक्त व जिल्हा पुरवठा अधिकारी, वनाधिकारी, उपवनसंरक्षक अथवा नामनिर्देशित केलेले अधिकारी यासंदर्भात कार्यवाही करू शकतात. २०० मिलीपेक्षा कमी द्रव धारण क्षमता असलेल्या पिण्याच्या पाण्याच्या पीईटी व पीईटीई बाटल्या पिण्याच्या पाण्याची पिशवी, थर्माकोल अथवा तत्सम आदी उत्पादन करणाऱ्या कंपन्यांची तपासणी करण्याविषयीही मार्गदर्शन करण्यात आले.


Web Title: Enforce the plastic ban
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.