लोकसभेच्या तयारीत मग्न सेनेचे धानोरकर युतीमुळे अस्वस्थ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2019 10:53 PM2019-02-20T22:53:10+5:302019-02-20T22:54:14+5:30

आरोप-प्रत्यारोपाचे शस्त्र बासणात गुंडाळून भाजप-शिवसेनेने निवडणुकीसाठी एकमेकांच्या गळ्यात हात टाकल्यामुळे चंद्रपूर लोकसभा मतदार संघात पक्ष आदेशानुसार निवडणुकीसाठी सज्ज झालेले शिवसेनेचे वरोरा-भद्रावतीचे आमदार सुरेश ऊर्फ बाळू धानोरकर यांचा मात्र हिरमोड झाल्याचे समजते.

During the Lok Sabha election, due to the coalition alliance, it is unhealthy | लोकसभेच्या तयारीत मग्न सेनेचे धानोरकर युतीमुळे अस्वस्थ

लोकसभेच्या तयारीत मग्न सेनेचे धानोरकर युतीमुळे अस्वस्थ

Next
ठळक मुद्देयुतीतील बिघाड काँग्रेसच्या पथ्यावर : नव्या समीकरणाचे संकेत

राजेश भोजेकर ।
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : आरोप-प्रत्यारोपाचे शस्त्र बासणात गुंडाळून भाजप-शिवसेनेने निवडणुकीसाठी एकमेकांच्या गळ्यात हात टाकल्यामुळे चंद्रपूर लोकसभा मतदार संघात पक्ष आदेशानुसार निवडणुकीसाठी सज्ज झालेले शिवसेनेचे वरोरा-भद्रावतीचे आमदार सुरेश ऊर्फ बाळू धानोरकर यांचा मात्र हिरमोड झाल्याचे समजते. लोकसभेची मानसिकता तयार केल्यानंतर आता यातून बाहेर पडणे त्यांच्यासाठी त्रासदायक होत असल्याची माहिती आहे.
सुरुवातीला त्यांच्या नावाची चर्चा काँग्रेसमध्येही व्हायला लागली होती. हे उल्लेखनीय. काँग्रेसचा उमेदवार अद्यापही जाहीर झालेला नाही. युतीनंतर जिल्ह्यातील राजकीय घडामोडींमध्ये आमदार धानोरकर यांच्या हालचाली महत्त्वाच्या ठरणार असून या घडामोडी काँग्रेसच्या पथ्यावर पडणाऱ्या असतील, असेही बोलले जात आहे.
लोकसभेची चर्चा सुरू झाल्यापासूनच शिवसेना आमदार धानोरकर यांचे नाव काँग्रेसकडून उमेदवारीसाठी घेतले जात होते. काँग्रेसचे विधान सभेतील उपगटनेते आमदार विजय वडेट्टीवार यासाठी आग्रही होते, असाही सूर होता. आ. वडेट्टीवार हे पूर्वी शिवसेनेत होते. आ. धानोरकर यांनी शिवसेनेचा धनुष्य खाली ठेवून काँग्रेसचा हात धरावा, अशी त्यांची सुप्तइच्छा असल्याचेही बोलले जात होते. मात्र आमदार धानोरकर यांनी याबाबत कुठेही जाहीर वाच्यता केली नाही. दरम्यान, राज्य पातळीवर भाजप-सेनेचे वाद विकोपाला जात होते. यातच शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपवर सातत्याने टीकेची झोड उठवताना ‘एकला चलो’ची भूमिका घेतली. शिवाय महाराष्ट्रातील प्रत्येक लोकसभा मतदार संघात उमेदवार उभा करण्याची तयारीही शिवसेनेने सुरू केली होती. याला चंद्रपूर लोकसभा मतदार संघही अपवाद नव्हता. या मतदार संघात शिवसेनेने आ. बाळू धानोरकर यांना तयारीला लावले होते. यामुळे आ. धानोरकरांच्या नावाची काँग्रेसकडून सुरू असलेली चर्चा एकाएकी थांबली. धानोरकरांनीही मानसिकता तयार करून लोकसभा मतदार संघातील कार्यक्रमांना हजेरी लावणे सुरू केले होते. अशातच त्यांनी भाजपवर टीकाही करायला सुरूवात केली होती. हे सारेकाही सुरू असताना शिवसेना पक्ष प्रमुखांनी भाजपसोबत युती केली. यामुळे भाजपच्या ताब्यातील लोकसभा मतदार संघातील शिवसेनेच्या संभाव्य उमेदवारांची मोठी अडचण झाली. युतीमध्ये चंद्रपूर लोकसभा मतदार संघ हा भाजपच्याच वाट्याला असेल. हे तेवढेच सत्य आहे. आधी टीका करायची, आता मांडीला मांडी लावून बसावे लागणार. शिवसेनेत निर्माण झालेली ही अस्वस्थता काँग्रेसच्या पथ्यावर पडणारी आहे. ही नामी संधी काँग्रेस ‘कॅश’ करते वा नाही हे बघण्यासारखे आहे.
युतीमुळे संजय देवतळेंचे गणित बिघडले
२०१४ च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या तिकिटावर पराभूत, नंतर विधानसभा निवडणुकीत वरोरा-भद्रावती मतदार संघात भाजपच्या तिकीटावर लढून अपयशी ठरलेले संजय देवतळे यांचे राजकीय गणित भाजप-शिवसेना युतीने चांगलेच बिघडले आहे. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना व भाजप स्वतंत्रपणे लढली होती. संजय देवतळे हे भाजपचे उमेदवार होते. शिवसेनेचे बाळू धानोरकर यांनी त्यांचा पराभव केला होता. २०१९ च्या विधानसभेसाठी या दोन्ही पक्षांची युती झाली आहे. हा मतदार संघ पूर्वीपासूनच शिवसेनेकडे आहे. पुढेही तो राहतील. यामुळे संजय देवतळे यांची अस्वस्थता चांगलीच वाढली आहे. राजकीय भवितव्य टिकवून ठेवण्यासाठी ते पुन्हा काँग्रेसचा हात धरू शकतात, अशीही चर्चा ऐकायला येत आहे.
काँग्रेसच्या उमेदवारावर भाजपचे गणित
काँग्रेसने आपला उमेदवार गुलदस्त्यात ठेवल्यामुळे भाजपचीही मोठी अडचण झाली आहे. काँग्रेसकडून इच्छुक असलेल्या प्रत्येक चेहºयासोबत नवे समीकरण जुळलेले आहे. काँग्रेसचा उमेदवार जाहीर झाल्यानंतर भाजपही आपले नवे डावपेच आखण्याच्या बेतात आहे. मात्र काँग्रेसने उमेदवारच जाहीर न केल्यामुळे भाजपला रणनिती आखताना अडचण येत असल्याची माहिती आहे.
काँग्रेसचा उमेदवार अद्यापही गुलदस्त्यातच
चंद्रपूर लोकसभा मतदार संघात भाजपने लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तयारी गतीने सुरू केली असली तरी काँग्रेसचा उमेदवार अद्यापही गुलदस्त्यातच आहे. उमेदवाराची घोषणा केव्हा होईल. त्यानंतर संभाव्य उमेदवाराला प्रचाराला किती काळ मिळेल, याबाबत काँग्रेस कार्यकर्ते संभ्रमात दिसत आहे.

Web Title: During the Lok Sabha election, due to the coalition alliance, it is unhealthy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.