कर्जमाफी दिलेल्या शेतकऱ्यांकडून व्याज वसूल करू नये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2018 12:40 AM2018-02-18T00:40:11+5:302018-02-18T00:40:55+5:30

छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेत शासनाने कर्जमाफी दिलेल्या किंवा एकरकमी परतफेड योजनेअंतर्गत मंजूर कर्ज खात्यावर ३१ जुलै २०१७ नंतरचे व्याज बँकांनी वसूल करु नये.

Do not charge interest from the debt waiver farmers | कर्जमाफी दिलेल्या शेतकऱ्यांकडून व्याज वसूल करू नये

कर्जमाफी दिलेल्या शेतकऱ्यांकडून व्याज वसूल करू नये

Next
ठळक मुद्देसहकार मंत्र्यांचे निर्देश : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत सहकार विभागाचा आढावा

ऑनलाईन लोकमत
चंद्रपूर : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेत शासनाने कर्जमाफी दिलेल्या किंवा एकरकमी परतफेड योजनेअंतर्गत मंजूर कर्ज खात्यावर ३१ जुलै २०१७ नंतरचे व्याज बँकांनी वसूल करु नये. याबाबत राज्यस्तरावर एसएलबीसीच्या बैठकीमध्ये बँकांनी व्याज वसूल करु नये, असा निर्णय झालेला असून या निर्णयाचे सर्व बँकांनी तंतोतंत पालन करण्याचे निर्देश सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी दिले.
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमध्ये शनिवारी सहकार विभागाच्या आढावा बैठकीमध्ये ते बोलत होते. यावेळी आ. नाना श्यामकुळे, जिल्हा परिषद अध्यक्ष देवराव भोंगळे, महापौर अंजली घोटेकर, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष मनोहर पाऊनकर, सहकार विभागाचे विशेष कार्यकारी अधिकारी संतोष पाटील, विभागीय सहनिबंधक सहकारी संस्था प्रवीण वानखेडे, जिल्हा उपनिबंधक ज्ञानेश्वर खाडे, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे सरव्यवस्थापक एम. व्ही. पोटे, सहकार क्षेत्रातील संबंधित विविध अधिकारी व पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.
जिल्ह्यात असलेल्या पगारदार व नागरी सहकारी पतसंस्थांनी त्यांना मिळणाऱ्या नफ्यातील २० टक्के रक्कमेची गुंतवणूक करुन जिल्ह्यात सहकारी तत्वावर रुग्णालय उभारून गरीब व दूर्बल घटकातील नागरिकांना उत्तम सेवा देण्याचे कार्य करावे, असे आवाहनही सहकार मंत्री देशमुख यांनी केले. या बैठकीत कृषी उत्पन्न बाजार समितीचा आढावा घेवून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. तसेच जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने १०० विविध कार्यकारी सहकारी सोसायट्यांना नवीन व्यवसायासाठी कर्ज देण्याच्या सूचना केल्या. यामुळे सोसायट्या सक्षमीकरणाचा शासनाचा उद्देश सफल होईल, असे ते म्हणाले. अटल पणन महाअभियानांतर्गत ज्या विकास संस्थांची व्यवसायासाठी निवड करण्यात आली आहे. त्या संस्था योग्यरित्या कार्यान्वित होण्याकरीता सर्व अधिकाऱ्यांनी कार्यवाही करावी, अशा सूचनाही त्यांनी दिल्या. या बैठकीत ना. देशमुख यांनी कर्जमाफी, बाजार समिती, सहकारी संस्था यासह विविध विषयाचा आढावा घेतला.
जिल्ह्यात ९१ हजार शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ
चंद्रपूर जिल्ह्यात छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँक, राष्ट्रीयकृत व ग्रामीण बँक मिळून थकीत कर्ज असणारे शेतकरी, प्रोत्साहनपर लाभ देण्यात येणारे लाभार्थी व एकरकमी योजनेंतर्गत लाभ देण्यात आलेले शेतकरी असे एकूण ९१ हजार १५७ कर्जमाफीस पात्र लाभार्थ्यांना ३५१ कोटी २२ लाख रुपयांचा लाभ देण्यात आल्याची माहिती जिल्हा उपनिबंधक ज्ञानेश्वर खाडे यांनी दिली.

Web Title: Do not charge interest from the debt waiver farmers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.