The death of ashwala along with the Junkyard forest labor, Tharar in the Thanwana forest of Bhadhavati | झुंजीत वन मजुरासह अस्वलाचाही मृत्यू, भद्रावतीच्या तिरवंजा वनातील थरार 

चंद्रपूर (भद्रावती) : बांबू कटाईसाठी जंगलात गेलेल्या १० वनमजुरांवर अस्वलाने अचानक हल्ला चढविला. तीन मजूर समयसुचकतेने पळून गेले. चार जण तेथील एका झाडावर चढल्याने ते बचावले, तर तिघांची अस्वलाशी कडवी झुंज झाली. यामध्ये गंभीर जखमी झालेल्या एका वनमजुराचा घटनास्थळीच मृत्यू झाला, तर दोघेजण गंभीर जखमी झाले. ही घटना मंगळवारी दुपारी ३ वाजताच्या सुमारास भद्रावती वनपरिक्षेत्रातील तिरवंजा राखीव वनातील कक्ष क्रमाक २०३ मध्ये घडली. बुधवारी सकाळी घटनास्थळ परिसरात हल्ला करणारे अस्वलही मृतावस्थेत आढळून आले.
धर्मसिंग संबरू टेकाम (५२) असे मृतकाचे नाव आहे, तर जखमींमध्ये प्रेमलाल धानू सायाम (४२) व संबलिंग सिंग चौधरी उईके (२१) तिघेही रा. बय्यर म. प्र. यांचा समावेश आहे. पैकी एकाची प्रकृती चिंताजनक आहे. जखमींना पुढील उपचारासाठी नागपूरला हलविण्यात आले असल्याची माहिती भद्रावती वनपरिक्षेत्राधिकारी एस. व्ही. म्हैसकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. 
प्राप्त माहितीनुसार, भद्रावती वनपरिक्षेत्रातील तिरवंजा राखीव वनात सुमारे  १० वनमजुर बांबू कटाईचे काम करीत होते. अशातच एकाएकी एका अस्वलाने त्या वनमजुरांवर हल्ला चढविला. हे बघून तेथील अन्य चार वनमजूर आपला जीव वाचविण्यासाठी झाडावर चढले, तर अन्य तिघे जण घटनास्थळावरून पळून गेले. तर उर्वरित धर्मसिंग संबरू टेकाम, प्रेमलाल धानू सायाम व संबलिंग सिंग चौधरी उईके या तिघांची अस्वलाशी कडवी झुंज झाली. यामध्ये तिघेही गंभीर जखमी झाले. धर्मसिंग संबरू टेकाम यांनी अस्वलाशी कडवी झुंज देताना अस्वलावर जवळच्या कु-हाडीने हल्ला चढविला. यामध्ये अस्वलही गंभीर जखमी झाली. मात्र धर्मासिंग हा काहीवेळाने जागीच गतप्राण झाला. पळून गेलेल्या वनमजुरांनी याची माहिती वनपरिक्षेत्राधिकारी म्हैसकर यांना दिली. लगेच त्या  वनरक्षक गुरुदास वरखेडे, भोगेकर व सदर वनमजुरांना घेऊन घटनास्थळी दाखल झाल्या. यानंतर जखमींना उपचारार्थ रुग्णालयात हलविले. आज सकाळी वनविभागाच्या अधिका-यांना घटनास्थळी हल्ला करणारी अस्वलही मृतावस्थेत आढळली.


Web Title: The death of ashwala along with the Junkyard forest labor, Tharar in the Thanwana forest of Bhadhavati
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.