भद्रावतीत माणुसकीच्या भिंतीसाठी अलोट गर्दी !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2017 12:45 AM2017-07-24T00:45:05+5:302017-07-24T00:45:05+5:30

जाती-पाती व धर्माची वर्गवारी करणाऱ्या सगळ्याच भिंती जमिनदोस्त करणारी भिंत म्हणजे माणूसकीची भिंत.

The crowd of humble human beggars! | भद्रावतीत माणुसकीच्या भिंतीसाठी अलोट गर्दी !

भद्रावतीत माणुसकीच्या भिंतीसाठी अलोट गर्दी !

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
भद्रावती : जाती-पाती व धर्माची वर्गवारी करणाऱ्या सगळ्याच भिंती जमिनदोस्त करणारी भिंत म्हणजे माणूसकीची भिंत. राजस्थानच्या बिलवारा शहरातून सुरु झालेला ‘माणूसकीची भिंत’ हा उपक्रम भद्रावतीत पोहचला. अन् या उपक्रमाला उदंड प्रतिसाद मिळाला. देणाऱ्या आणि घेणाऱ्यांची या भिंतीजवळ अलोट गर्दी उसळली. रोटरी क्लब, इनर्व्हील क्लब, भद्रावती व विवेकानंद महाविद्यालय भद्रावती यांच्या वतीने ही माणूसकीची भिंत साकारण्यात आली.
नको असेल ते द्या- हवे असेल ते घेवून जा, असे आवाहन करणारी ही भिंत आज सर्वत्र सामाजिक दायित्वाची सर्वांना जाणीव करून देत आहे. एकीकडे माणसांच्या ऋणानुबंधात, एकमेकांच्या नातेसंबंधात अनावश्यक गोष्टीच्या भिंती निर्माण होत आहे. तर दुसरीकडे ही भिंत माणसांना एकमेकांशी जोडत आहे. विवेकानंद महाविद्यालय भद्रावती येथे आयोजित या उपक्रमात दात्यांच्या मदतीने जुने व नवीन कपडे तसेच जीवनोपयोगी साहित्य प्राप्त करुन ते समाजातील गरीब, गरजू व वंचितांना मोफत उपलब्ध करुन देण्यात आले. जवळपास तीन ते चार हजार गरजू व वंचितांना सदर साहित्य वितरित करण्यात आले. नव्हे तर ते त्यांनी हक्कानीच घेतले. माणूसकीच्या भिंतीने त्यांना हा हक्क प्रदान केला होता. यावेळी त्यांच्या चेहऱ्यावर दिसणारे समाधान हेच या उपक्रमाचे फलित ठरले.
२५ बॉय १५ फूट एवढी भिंत विवेकानंद महाविद्यालयात साकारण्यात आली आहे. मागील तीन महिन्यांपासून रोटरी क्लब, इनरव्हील क्लब, भद्रावती व विवेकानंद महाविद्यालयातर्फे जुने कपडे गोळा करण्याचे काम सुरु आहे. चार ते पाच हजार जुने कपडे या कालावधीत गोळा करण्यात आले. त्यात साड्या, शर्ट, पँट, लहान मुला-मुलींचे कपडे, ब्लँकेट, स्वेटर, छत्र्या, बांगड्या व अन्य संसारोपयोगी वस्तूूंचा समावेश होता. यासोबतच आयोजकांतर्फे ७५ हजार रुपयांचे नवीन साहित्य घेवून ते वाटप करण्यात आले. हा उपक्रम समोरही राबविल्या जाणार असून भिंतीला कपडे अटकवून ठेवण्यात येणार आहे. ज्यांना हवे असेल ते कपडे ते घेऊन जाऊ शकतात. सोबतच दात्यांनी जुने कपडे आणून द्यावे, असे आवाहनही आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.
माणूसकीच्या भिंतीचा विस्तार संपूर्ण महाराष्ट्रभर व्हावा. चंद्रपूर जिल्ह्यात लगेच माणूसकीच्या भिंती निर्माण करु,असे या भिंतीच्या पहिल्या उदघाटनप्रसंगी वित्त, नियोजन तथा वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केलेले आवाहन याप्रसंगी महत्वाचे ठरते. या उपक्रमाचे जिल्ह्यात सर्वत्र अनुकरण व्हावे. निश्चितच ती गरज आहे.

Web Title: The crowd of humble human beggars!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.