१५ ऑगस्टपर्यंत जिल्हा धूरमुक्त करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2019 11:14 PM2019-07-15T23:14:30+5:302019-07-15T23:15:02+5:30

गरीब, वंचित कुटुंबांना शंभर टक्के एलपीजी गॅस कनेक्शन देणे, शंभर टक्के कुटुंबांना शिधापत्रिका वाटप करणे व सर्व पात्र शिधापत्रिकांना शंभर टक्के धान्य वाटप करण्याच्या पंडित दीनदयाळ उपाध्याय अभियानाचा शुभारंभ चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आज सोमवारी राज्याचे वित्त, नियोजन व वने मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते करण्यात आला.

The city will be releasing smoke from August 15 | १५ ऑगस्टपर्यंत जिल्हा धूरमुक्त करणार

१५ ऑगस्टपर्यंत जिल्हा धूरमुक्त करणार

Next
ठळक मुद्देसुधीर मुनगंटीवार : जिल्ह्यात पंडित दीनदयाल उपाध्याय अंत्योदय अभियानाचा शुभारंभ

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : गरीब, वंचित कुटुंबांना शंभर टक्के एलपीजी गॅस कनेक्शन देणे, शंभर टक्के कुटुंबांना शिधापत्रिका वाटप करणे व सर्व पात्र शिधापत्रिकांना शंभर टक्के धान्य वाटप करण्याच्या पंडित दीनदयाळ उपाध्याय अभियानाचा शुभारंभ चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आज सोमवारी राज्याचे वित्त, नियोजन व वने मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी १५ ऑगस्टपर्यंत चंद्रपूर जिल्हा तर २०२० च्या गणेश स्थापनेपर्यंत संपूर्ण राज्य धूरमुक्त व गॅसयुक्त करण्याचे शासन नियोजन करीत असल्याची माहिती ना. मुनगंटीवार यांनी यावेळी दिली.
अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग अंतर्गत जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन भवनामध्ये आज कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या तीनही घटकांमधील लाभार्थ्यांना यावेळी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते एलपीजी कनेक्शन, शिधापत्रिकाचे वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमाला राज्याचे पशुसंवर्धन दुग्धविकास, मत्स्यविकास विभागाचे प्रधान सचिव तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालक सचिव अनुप कुमार, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष देवराव भोंगळे, महापौर अंजली घोटेकर, जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार, स्थायी समितीचे सभापती राहुल पावडे, सभापती संतोष तंगडपल्लीवार, अर्चना जीवतोडे, वरोराचे नगराध्यक्ष अहतेशाम अली, जिल्हा पुरवठा अधिकारी सुरेंद्र दांडेकर आदी उपस्थित होते.
जनप्रतिनिधींना सेवेची संधी देणारे अभियान
यावेळी उपस्थित जनप्रतिनिधींशी संवाद साधताना ना. सुधीर मुनगंटीवार म्हणाले, मूलभूत गरजांनी गरिबांना समृद्ध करणारे हे अभियान आहे. शेवटच्या वंचित माणसाच्या आयुष्यात आनंद देणारी ही योजना आहे. योजनेबाबत अतिशय सक्रियतेने व नोंदी ठेवत काम करावे, प्रत्येक पंचायत समिती, जिल्हा परिषद सदस्यांच्या प्रभागांमध्ये कोणत्या कुटुंबाकडे गॅस नाही आहे, याची नोंद असली पाहिजे. ज्यांच्याकडे गॅस नाही, शिधापत्रिका नाही व ज्यांना दोन व तीन रुपये किलो रुपयाचे धान्य मिळत नाही, अशा सर्व कुटुंबांच्या याद्या या जनप्रतिनिधींनीदेखील स्वत:कडे ठेवाव्यात. त्यांना ही सुविधा मिळावी, यासाठी प्रयत्न करावेत, असे निर्देश दिले. या जनप्रतिनिधींना प्रशासन सहकार्य करेल. कोणी अडचण आणत असेल तर ती आपण दूर करू. त्यामुळे आपला जिल्हा पंडित दीनदयाळ उपाध्याय अंत्योदय अभियानाच्या कार्यामध्ये महाराष्ट्रामध्ये सर्वात अग्रेसर असावा. चांदा ते बांदा असे महाराष्ट्राचे वर्णन केल्या जाते. त्यामुळे या योजनेचा चेहरा चंद्रपूर जिल्हा बनवा व चंद्रपूर जिल्ह्यात शंभर टक्के गॅस वाटप, शिधापत्रिका वाटप व अन्नधान्य वाटपाचे अभियान यशस्वी करा, असे आवाहन त्यांनी केले.

१५ आॅगस्टला उद्दिष्टपूर्ती करा
गरीबांच्या कामी येणे, हेच आमच्या राजकीय जीवनाचे उद्दिष्ट असते. पंडित दीनदयाळ उपाध्याय अंत्योदय हे अभियान अतिशय पुण्याचे काम असून आपल्या मतदारसंघातल्या प्रत्येकाला याचा लाभ मिळेल, यासाठी अतिशय जागरूकतेने काम करावे. गरीबातल्या गरिबांना उत्तम प्राथमिक सुविधा, रेशन कार्ड, पिण्याचे पाणी व त्यांना आरोग्याच्या उत्तम सुविधा, शिक्षण देताना सबका साथ, सबका विकास व सबका विश्वास या त्रिसूत्रीचा वापर करावा. १५ आॅगस्टपर्यत जिल्हयात प्रशासन व जनप्रतिनिधीनी मिळून उद्दिष्टयपूर्ती करावी, असा कालबद्ध कार्यक्रमही त्यांनी दिला.
२५ गावांमध्ये गरम पाण्याचा पथदर्शी प्रयोग
गरम पाणी करण्यासाठी सोलर योजनेचे प्रयोग करण्यात आले आहे. चंद्रपूर जिल्ह्यामधील २५ गावांमध्ये गरम पाणी करण्याचा पथदर्शी प्रकल्प राबविण्यात येईल व त्यानंतर संपूर्ण जिल्ह्यातदेखील निकषांवर आधारित प्रकल्प सुरू केल्या जाईल, अशी घोषणा पालकमंत्र्यांनी यावेळी केली.
पंतप्रधानांनी घ्यावी चंद्रपूरची नोंद
अभियानाची सुरुवात आपल्या जिल्ह्यापासून करायची असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीदेखील चंद्रपूर जिल्ह्यातील या क्षेत्रात केलेल्या कामाचा उल्लेख अभिमानाने ‘मन की बात’ मध्ये करावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. हे अतिशय रचनात्मक काम असून पुढचे २९ दिवस झोकून काम करून चंद्रपूर जिल्हा धूरमुक्त जिल्हा झाल्याची घोषणा १५ आॅगस्ट रोजी आपल्याला करता आली पाहिजे, यासाठी सर्व पद्धतीचे नियोजन करण्याचे आवाहनही ना. मुनगंटीवार यांनी केले.

Web Title: The city will be releasing smoke from August 15

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.