ठळक मुद्देधोक्याची घंटा : पीक संरक्षणासाठी शेतकºयांना आता पर्याय हवा

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : वाघांचा जिल्हा म्हणून प्रसिद्ध असलेल्या चंद्रपूर जिल्ह्यात आतापर्यंत अनेक वाघांचा मृत्यू झाला आहे. वाघांच्या मृत्यूची कारणे शोधली तर अपवाद वगळता सर्वाधिक घटना जिवंत विद्युत तारेच्या कुंपणामुळे घडल्या आहेत. रानटी डुकरे व इतर वन्यप्राण्यांपासून होणाºया नुकसानीने त्रस्त शेतकरी पिकांच्या संरक्षणासाठी विद्युत तारेचे कुंपण करतात. मात्र अशा घटना रोखण्यासाठी वनविभागाने तत्काळ दखल घेत पिकांच्या संरक्षणासाठी शेतकºयांनाही पर्याय उपलब्ध करून देण्याची आता गरज निर्माण झाली आहे.
विदर्भात खास करून चंद्रपुरातील ताडोबा अभयारण्यात वाघांची संख्या सर्वाधिक आहे. शासनस्तरावरून वाघ वाचवा मोहिम सुरू असून विविध माध्यमातून जनजागृती सुरू आहे. मात्र सध्यास्थितीत चंद्रपूर जिल्ह्यात एकामागे एक वाघाचा मृत्यू होत असून यात विद्युत तारेचे कुंपण वाघांसाठी काळ ठरत आहे. त्यामुळे भविष्यातील व्याघ्र संवर्धनाची चिंता निर्माण झाली आहे.
काही घटनात वाघांना रेडीओ कॉलर असल्याने व कुणी माहिती दिल्याने या घटना समोर आल्या आहेत. वाघांसोबतच चंद्रपुरात ३ रानगवे विद्युत प्रवाहाने ठार झालेत. एका शेताच्या कुंपनातून अनेक वन्यप्राण्यांच्या हाडांचे सांगाडे काढण्यात आले. यावरून तृणभक्षी प्राणीही मोठ्या प्रमाणात मृत्यूमुखी पडत असल्याने चित्र आहे.
शेतपिक संरक्षणकरिता हवे प्रभावी उपाय
रानटी डुकरांमुळे शेतपिकांची सर्वाधिक नासाडी होते. त्यामुळे उभे पीक वाचविण्यासाठी अनेक प्रयत्न शेतकºयांकडून केले जातात. परिणामी शेतकरी विरूद्ध वाघ पयार्याने वनविभाग असा संघर्ष निर्माण होत आहे. वन्यप्राण्यांपासून उभे पीक वाचविण्यासाठी शेतकºयांकडे कुठलेही पर्याय नसल्याने जिवंत विद्युत तारा लावल्या जात आहेत. तारेला स्पर्श होताच वन्यप्राण्यासह मानवाचाही जीव जावू शकते. त्यामुळे ताडोबा-बफरच्या धर्तीवर ‘व्यक्तिगत सौर ऊर्जा कुंपण’ अनुदान तत्वावर पुरविण्याची मागणी इको-प्रो संस्थेचे अध्यक्ष बंडू धोतरे यांनी वनमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे केली आहे.
शेतकºयांचाच जीव जाण्याची भिती
जिल्ह्यात शेती करणारा मोठा वर्ग आहे. एक पिकावर शेतकºयाचे बजेट असते. मात्र रानटी डुकरांमुळे शेतपिकांची मोठी नासाडी होते. त्यामुळे उभे पीक वाचविण्यासाठी अनेक प्रयत्न शेतकºयांकडून केले जातात. तारेचे कुंपन शेताभोवती करून त्यात जिंवत वीज प्रवाह सोडला जातो. अशा चुकीच्या पध्दतीने आपला जीव जाईल, हे माहित असतानाही शेतकºयांकडून असे प्रकार सुरू आहेत. यात विद्युत प्रवाहाने शेतकरीच मृत पावल्याच्या अनेक घटना जिल्ह्यात घडल्या आहेत.
वन्यप्राण्यांचे भ्रमण मार्ग केवळ जंगल नाही
विदर्भातील वाघांची संख्या, त्यांचे होणारे स्थलांतर, स्थंलातर होताना वन्यप्राण्यांचे भ्रमणमार्ग हे फक्त जंगल नसल्याने शिवार, गावे, रस्ते-हायवे, नद्या-नाले ओलांडून पुढील वनक्षेत्राचा शेकडो किमीचा प्रवास पूर्ण करतात. तसेच वनव्याप्त गावातील शेती, वनालगत असलेले शिवारात वाघांचा वावर असते. शिवारातील पाळीव प्राण्यांची शिकार करण्यास किंवा शेतशिवारात येणारे रानडुक्कर, निलगाय व इतर तृणभक्षी प्राणी यांची शिकार करण्यास वाघ येते. अशावेळी तिथे शेतकºयाने तारेचे कुंपण करून त्यात जिवंत विद्युत प्रवाह सोडून ठेवल्यास तिथे वाघांसाठी धोका संभवतो.
वीज कंपनी व वनविभागात समन्वयाचा अभाव
प्रकल्पाच्या क्षेत्रातलगत किती शेतकºयांनी कृषी पंप घेतले याची माहिती वनविभागाकडे अजुनही नाही. विशेष म्हणजे, वीज वितरण कंपनीचे पथक चौकशीसाठी जात असताना वनविभागाच्या अधिकाºयांशी समन्वय साधत नाही. परिणामी व्याघ्र प्रकल्पाच्या प्रतिबंधित क्षेत्रालगत विद्युत तारांच्या स्पर्शाने वाघ आणि अन्य वन्यप्राणी मृत्यूमुखी पडत आहेत.
अनुदानातील जाचक अटींमुळे शेतकरी त्रस्त
वन्यप्राण्यांच्या नुकसानीपासून पिकांचे संरक्षण व्हावे यासाठी जंगलालगतच्या शेतकºयांना कुंपण आणि सौर ऊर्जेचे तार देण्याची योजना सध्यास्थितीत सुरू आहे. मात्र लाभार्थ्यांना जाचक अटी लावल्याने अनेक शेतकरी योजनेचा लाभ घेऊ शकत नाही. अल्पभुधारक शेतकºयाने अनुदानावर कुंपण तार घेतल्यास रकमेची परतफेड करण्याचा कालावधी अत्यंत कमी आहे. इमारत बांधण्यासाठी शासनाकडून कर्ज घेतल्यास तीस वर्षे परतफेड करण्याची मुदत देण्यात आली. मात्र कुंपण तारांसाठी घेतलेले कर्जाचा भरणा करण्यास केवळ १५ वर्षांचीच मुदत दिल्याने शेतकºयांना ही अट त्रासदायक ठरली आहे.

बफर झोन क्षेत्रातील शेतकºयांसाठी शासनाने डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी जनवन विकास योजना सुरू केली. या योजनेतर्गंत सौर ऊर्जेवर चालणारे कुंपण आणि चैन लिंक ही उपकरणे अनुदानावर दिली जातात. बफर झोन क्षेत्रातील शेतकºयांचा या योजनेला चांगला प्रतिसाद मिळत आहे. इतर शेतकºयांनीही योजनेचा लाभ घ्यावा.
- विजय शेळके
मुख्य वनसंरक्षक, चंद्रपूर.

अनेक शेतकºयांच्या जमिनी जंगलालगत आहेत. या जमिनीतील पीक नेहमीच जंगली श्वापदांचे बळी ठरत असते. त्यामुळे शेतकºयांचा जीव तळमळतो व पिकाच्या रक्षणासाठी विद्युत प्रवाह सोडण्याचा निर्णय घेतो. यात शेतकºयाचाही बळी जात असते. अशी वेळ येऊ नये, यासाठी वनविभागाने शेतकºयांना सौर ऊर्जेवरील तारेचे कुंपण उपलब्ध करून द्यावे.
- ईश्वर मेश्राम
शेतकरी, कानपा.

वन्यप्राण्यांकडून शेतपिकाची डोळ्यादेखत नासधूस होते. वारंवार वनविभागाला वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करावा, अशा सूचना केल्या जातात. परंतु वनविभागाचे अधिकारी याकडे दुर्लक्ष करीत असल्याने शेतपिकाची पूर्णत: नासाडी होत आहे.
मात्र अजूनही वन्यप्राण्यांच्या बंदोबस्ताची कोणतीही उपाययोजना वनविभागाने केली नाही.
- प्रभाकर जुनघरी
शेतकरी, गोवरी.

घटना क्रमांक १ : ३ नोव्हेंबर २०१६ ला कोठारी वनपरिक्षेत्रातील धानापूर येथे एक वाघ मृतावस्थेत आढळला.
घटना क्रमांक २ : ३ डिसेंबर २०१६ ला तेलगांणा राज्यात कागजनगर येथे मध्य चांदा वनविभागातून स्थलांतरीत झालेला वाघ वीज तारेच्या स्पर्शाने मृत पावला.
घटना क्रमांक ३ : १७ एप्रिल २०१७ ला नागभीड वनपरिक्षेत्रातील मांगली येथे वाघाचा मृत्यू.
घटना क्रमांक ४ : २७ एप्रिल २०१७ रोजी रेडीओ कॉलर असलेला प्रसिद्ध श्रीनीवास वाघ ब्रम्हपुरी वनविभागात मृत अवस्थेत आढळला.
घटना क्रमांक ५ : ३ मे २०१७ पाथरी वनपरिक्षेत्रातील पालेबारसा येथे वाघाचा मृत्यू.
घटना क्रमांक ६ : २४ मे २०१७ चिचपल्ली वनपरिक्षेत्रातील केळझर येथे वाघाचा मृत्यू मात्र कारण अस्पष्ट.
घटना क्रमांक ७ : ४ जुलै २०१७ मूल वनपरिक्षेत्रात झुंजीत दोन वाघाचा मृत्यू.
घटना क्रमांक ८ : १३ आॅक्टोबर २०१७ ला ब्रम्हपुरी येथून सोडण्यात आलेली वाघिण शेतातील वीज प्रवाहाने बोर व्याघ प्रकल्प लगत वर्धा जिल्ह्यात मृत पावली.
घटना क्रमांक ९ : ४ नोव्हेंबर २०१७ ला चपराळा येथे रेडीओ कॉलर लावून सोडण्यात आलेली वाघिण विद्युत प्रवाहाच्या धक्काने गडचिरोली जिल्ह्यातील मारोडा जंगल परिसरात मृत पावली.
घटना क्रमांक १० : ७ नोव्हेंबर २०१७ चिमूर वनक्षेत्रातील आमडी शिवारात वीज तारेच्या कुंपणामुळे वाघाचा मृत्यू.


Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.