चंद्रपूर : भाजपाचा कार्यकाळ म्हणजे ‘फटा पोस्टर निकला झिरो’ अशी अवस्था झाली आहे, अशी टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर केली. ते चंद्रपुरात काँग्रेसच्या ‘जनआक्रोश’ मेळाव्यात बोलत होते.

भाजपा सरकारच्या तीन वर्षाच्या अपयशी कारभाराविरोधात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने राज्यव्यापी जनआक्रोश सप्ताहाचे आयोजन केले आहे. आज चंद्रपूर येथे चौथा जनआक्रोश मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्याला अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व महाराष्ट्राचे प्रभारी मोहन प्रकाश, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण, विधान परिषदेचे उपसभापती माणिकराव ठाकरे, माजी मंत्री आ. नसीम खान, विधानसभेतील पक्षाचे उपगटनेते विजय वडेट्टीवार यांच्यासह काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते, पदाधिकारी व हजारोंचा जनसमुदाय उपस्थित होता.

आघाडी सरकारच्या काळात शेतक-याची आत्महत्या झाली तर सरकारवर 302 चा गुन्हा दाखल करण्याची मागणी देवेंद्र फडणवीस करायचे. भाजपा सरकारच्या काळात 12 हजारांपेक्षा जास्त शेतक-यांनी आत्महत्या केल्या आहेत. या सरकारने आता स्वतःवर 302 चा गुन्हा दाखल करावा. जनतेचा अंत पाहू नका. जनता पेटून उठली आहे. आता तुमचे सरकार कोसळल्याशिवाय राहणार नाही. राज्यात आणि केंद्रात परिवर्तन निश्चित आहे असे अशोक चव्हाण म्हणाले.

याचबरोबर, सरकारने गेल्या तीन वर्षात एकाही आश्वासनाची पूर्तता केली. काँग्रेस पक्षाने जनतेच्या प्रश्नांसाठी लढाई सुरु केली आहे. लाठ्या काठ्या खाऊ. जीव गेला तरी बेहत्तर पण जनतेला न्याय देण्यासाठी संघर्ष करू. भाजप सरकारची कर्जमाफी म्हणजे तारीख पे तारीख. घोषणा करून चार महिने झाले कर्जमाफीचे पैसे दिले नाहीत आणि ऊर्जामंत्री म्हणतात सात दिवसांत वीज बिल भरा अन्यथा कनेक्शन तोडू. अगोदर कर्जमाफीचे पैसे द्या.  25 वेळा शासन निर्णय बदलले. लोकांना कर्जमाफीचा लाभ मिळू नये म्हणून जाचक अटी व शर्ती घातल्या. कर्जमाफीच्या फॉर्ममध्ये शेतक-यांची जात विचारता. जात पाहून कर्जमाफी देणार का ?असा सवालही अशोक चव्हाण यांनी केला.

उत्तर प्रदेशात हेमा मालिनींच्या समोर बैल आला म्हणून रेल्वेच्या स्टेशन मास्तरला निलंबित करण्यात आले. पण विदर्भात कीटकनाशक फवारणीमुळे 25 पेक्षा जास्त शेतक-यांचा मृत्यू झाला. तरी सरकारने काहीच कारवाई केली नाही. केंद्रातील आणि राज्यातील सरकार असंवेदनशील आहे. इंदिरा गांधी यांनी बँकाचे राष्ट्रीयीकरण करून सामान्यांना बँकांची दारे खुली केली. पण आता पंतप्रधान नरेंद्र मोदी याच बँकातील पैसे आपल्या उद्योगपती मित्रांना वाटत आहेत, अशी टीका मोहन प्रकाश यांनी केली. 

दरम्यान, जनआक्रोश सप्ताहातील पाचवा जनआक्रोश मेळावा उद्या अमरावती येथे होणार आहे.