राज्यात अटल आनंदवन घन वन प्रकल्प कार्यान्वित होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2019 12:00 PM2019-06-26T12:00:03+5:302019-06-26T12:04:38+5:30

राज्यातील नागरी क्षेत्रात तसेच ग्रामीण भागात अटल आनंदवन घन वन प्रकल्प कार्यान्वित करण्याचा निर्णय राज्य मंत्रीमंडळाच्या मंगळवारी झालेल्या बैठकीत घेण्यात आला.

Atal Anandvan Sol forest project will be implemented in the state | राज्यात अटल आनंदवन घन वन प्रकल्प कार्यान्वित होणार

राज्यात अटल आनंदवन घन वन प्रकल्प कार्यान्वित होणार

Next
ठळक मुद्देमंत्रीमंडळाचा निर्णय अर्थमंत्री मुनगंटीवार यांच्या अर्थसंकल्पीय घोषणेची पूर्तता

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : राज्यातील नागरी क्षेत्रात तसेच ग्रामीण भागात अटल आनंदवन घन वन प्रकल्प कार्यान्वित करण्याचा निर्णय राज्य मंत्रीमंडळाच्या मंगळवारी झालेल्या बैठकीत घेण्यात आला. अर्थ तथा वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सन २०१९-२० चा अर्थसंकल्प विधानसभेत सादर करताना याबाबत केलेल्या घोषणेची पूर्तता झाली आहे.
जगात सर्वच क्षेत्रामध्ये प्रयोगशीलतेतून नवनवीन तंत्राचा विकास होत आहे. उपलब्ध कमी क्षेत्रामध्ये जास्त वृक्षांचे आवरण आणि घन वन अर्थात डेन्स फॉरेस्ट निर्माण करण्याचा प्रयोग जपानमध्ये मियावाकी या वनस्पती शास्त्रज्ञाने सुरू केला. भारतामध्ये बंगलोर, हैद्राबाद इत्यादी ठिकाणी हा प्रयोग यशस्वीपणे राबविण्यात आला आहे. चंद्रपूर जिल्हयातील आनंदवन येथे महारोगी सेवा समितीच्या जमिनीवर हा प्रकल्प उत्तमरित्या विकसित करण्यात आला आहे. या प्रकल्पाचे यश लक्षात घेवून राज्यातील नगरपालिका, नगरपंचायती, महानगरपालिका व शहर विकास प्राधिकरणे यांच्या क्षेत्रात आणि ग्रामीण भागात अटल आनंदवन घन वन प्रकल्प कार्यान्वित करण्याचा निर्णय वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने घेण्यात आला आहे.
राज्यातील वनक्षेत्र व वनेतर क्षेत्रावरील वृक्षाच्छादन २० टक्क्यावरून ३३ टक्क्यांपर्यंत नेण्यासाठी हरित महाराष्ट्र प्रकल्प राबविण्यात येत आहे. यासाठी राज्यात तीन वर्षात ५० कोटी वृक्षारोपण करण्याचा कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. १ जुलै २०१९ ते ३० सप्टेंबर २०१९ या तीन महिन्यांच्या कालावधीत ३३ कोटी वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. ही वृक्ष लागवड मोहिम व संगोपन कार्यक्रम निरंतरपणे पुढे सुरू राहण्यासाठी शहरी आणि काही ठिकाणी ग्रामीण भागात असलेली मोकळया जागांची कमतरता लक्षात घेता अन्य पर्याय वापरून वृक्षाच्छादन वाढविणे अत्यंत गरजेचे आहे. ही बाब लक्षात घेवून वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी राज्यातील शहरी व ग्रामीण भागात अटल आनंदवन घन वन प्रकल्प कार्यान्वित करण्याचा घेतलेला निर्णय महत्वपूर्ण मानला जात आहे.

योजनेचा उद्देश
शहरी भागातील जागेची कमतरता विचारात घेवून छोटया छोटया क्षेत्रात मोठया प्रमाणावर वृक्ष लागवड करणे, रोपवनास जैविक पदार्थ, सेंद्रीय खते, पाणी अशा पूरक संसाधनाची जोड देवून कमी कालावधीत रोपांची चांगली व जलद वाढ साधणे, जिवंत रोपांची टक्केवारी जास्तीत जास्त राखणे, शहरी भागात वृक्षराजी वाढवून प्रदूषणावर नियंत्रण करणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे.

Web Title: Atal Anandvan Sol forest project will be implemented in the state

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.