दारुबंदी असलेल्या चंद्रपुरात ३७ मार्गांनी येते दारू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2018 11:35 AM2018-09-17T11:35:29+5:302018-09-17T11:37:40+5:30

चंद्रपूर जिल्ह्यात दारुबंदी असताना मोठ्या प्रमाणावर दारूची तस्करी होत आहे. लोकमतने केलेल्या निरीक्षणात चंद्रपूर सीमावर्ती भागातील तब्बल ३७ मार्गाने दारूची चोरटी वाहतुक सुरू आहे.

Alcohol has come from 37 places in Chandurpur | दारुबंदी असलेल्या चंद्रपुरात ३७ मार्गांनी येते दारू

दारुबंदी असलेल्या चंद्रपुरात ३७ मार्गांनी येते दारू

Next
ठळक मुद्देसर्व मार्ग पोलिसांना ज्ञात कारवाईचा केवळ फार्स

राजेश भोजेकर ।
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यात दारुबंदी असताना मोठ्या प्रमाणावर दारूची तस्करी होत आहे. लोकमतने केलेल्या निरीक्षणात चंद्रपूर सीमावर्ती भागातील तब्बल ३७ मार्गाने दारूची चोरटी वाहतुक सुरू आहे. हे सर्व मार्ग पोलिसांना ज्ञात आहे. केवळ नाममात्र कारवाई होत असल्यामुळे जिल्ह्यात दारूतस्करी सुरू असल्याची धक्कादायक माहिती आहे.
दारूमुळे कुटुंब उद्ध्वस्त होऊ नये, कुटुंबातील कलह थांबावा, घराघरात शांतता आणि आनंदाचे वातावरण राहावे, या उद्दात्त हेतूने राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपूर जिल्ह्यात दारुबंदी केली. मात्र अंमलबजावणीत पोलीस यंत्रणा फितुर निघाली. चंद्रपूर जिल्ह्याच्या सीमावर्ती भागातून मुबलक दारू येत आहे. परिणामी गल्लीबोळात दारू सहज उपलब्ध होत आहे. सीमावर्ती यवतमाळ, नागपूर, भंडारा जिल्ह्यात दारूबंदी नाही. दारूबंदी नसलेल्या तेलंगणा राज्याची सीमाही चंद्रपूर जिल्ह्याला लागून आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा, जिवती या तालुक्यांना तेलंगणा राज्याची सीमा लागून आहे, तर कोरपना तालुक्याला तेलंगणा राज्य व यवतमाळ जिल्ह्याची सीमा लागून आहे. या तीनही तालुक्यात १२ मार्गाने दारूची चोरटी वाहतुक होत आहे. चंद्रपूर तालुक्याला घुग्घुस येथून यवतमाळ जिल्ह्याची सीमा लागून आहे.
वरोऱ्याला यवतमाळ जिल्ह्याची सीमा लागून असून नागपूर-चंद्रपूर व नागपूर-वणी हा मार्ग वरोरा येथून जातो. या तालुक्यांत ११ मार्गाने दारूची तस्करी सुरू आहे. चिमूरला नागपूर व भंडारा जिल्ह्याची सीमा लागून आहे. ब्रह्मपुरी तालुक्याला भंडारा जिल्ह्याची सीमा लागून आहे. या दोन्ही तालुक्यात तब्बल १३ मार्गाने दारूची तस्करी सुरू आहे.

चंद्रपूर जिल्ह्यात दारू तस्करीचे हेच ते मार्ग
चिमूर तालुक्यातील मार्ग

नागपूर-भिसी-चिमूर, पवनी-कान्पा-चिमूर/ नागभीड/ ब्रह्मपुरी/ सिंदेवाही, भंडारा - पवनी - भुयार -साठगाव (कोलारी), भिवापूर-जवळी-भिसी, नागपूर-उमरेड-नांद-भिसी-चिमूर, नांद (जि.नागपूर)-मिनझरी-मुडपा-खडसंगी, नागपूर-नंदोरी-कोरा-मंगरुळ-खडसंगी, सिरसी-गिरड-मंगरुळ-खडसंगी, उमरेड-सिरसी-गिरड-समुद्रपूर-जाम- चंद्रपूर/चिमूर, पवनी-मिस्टी-भुयार-चिमूर.
कोरपना तालुका
आदिलाबाद-बेला-कोरपना, वणी-कोरपना, वणी-वनोजा-शिंदोला-कोरपना, कैलासनगर-विरुर-गाडेगाव-कोरपना, पायवाट- मेंडीगुडा-येलापूर-कोरपना, पायवाट-शंकरगुडा-शिवापूर-कोरपना
चंद्रपूर तालुका
बेलोरा-नायगाव-घुग्घुस, सिंदोला-मुंगोली-घुग्घुस,
वर्धा नदी मार्गे - सिंदोला-नायगाव घाट-घुग्घुस,
चांदूर(म्हातारदेवी)- घुग्घुस, जुगाद-वढा-घुग्घुस/चंद्रपूर.

जिवती व राजुरा तालुका
मेंडीगुडा-जिवती, भारी-इंदाना- जिवती, लेंडीगुडा - केरामेरी-जिवती. तेलंगणा-लक्कडकोट-राजुरा, तेलंगणा-विरुर(स्टे).- राजुरा, रात्रीला रेल्वे मार्गाने (दोन्ही बाजुने)
ब्रह्मपुरी तालुका
पवनी-सावरला-चोरगाव-ब्रह्मपुरी.
लाखांदूर - वडसा-ब्रह्मपुरी.
वैनगंगा नदी मार्गे
इटान-भालेश्वर-ब्रह्मपुरी
वरोरा तालुका
नागपूर-खांबाडा-वरोरा, वणी-पाटाळा-वरोरा, खैरी(वडकी) सोईट-माढेळी-वरोरा, मानगाव-थोराना-वरोरा, मारडा (जि. यवतमाळ) -वरोरा, नंदीग्राम एक्स्प्रेस-(दोन्ही बाजुने)

प्रमुख मार्गावरील नाकाबंदी नावाचीच
काही प्रमुख मार्गावर जिल्हा पोलिसांनी चौक्या लावून नाकाबंदी केलेली आहे. तरीही या भागातून जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर दारूची तस्करी होत आहे. पोलिसांना दारूच्या कारवाया दाखवायच्या असतात. त्या अनुषंगानेच या कारवाया करण्यात येत असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.

पोलीस अधीक्षकांची वड्या तस्करांवर करडी नजर
डॉ. महेश्वर रेड्डी हे नुकतेच चंद्रपूर जिल्हा पोलीस अधीक्षक म्हणून रूजू झाले आहे. लहान-सहान दारूविक्रेत्यांना पकडण्यापेक्षा मोठ्या तस्करांच्या मुसक्या आवळण्याचे फर्मान त्यांनी सर्व यंत्रणेला दिलेले आहेत. तेव्हापासून दारू पकडल्यानंतर ती कुठून आली. याचा शोध घेत त्यांच्यावर कारवाईचा बडगा उगारणे सुरू केले आहे. मात्र ही कारवाई करताना ठाणेदारांसह यंत्रणेची चांगलीच अडचण होत असल्याचे समजते. त्यामुळे या कारवयांबाबत संभ्रम आहे.

कौन बनेगा करोडपती अन् चंद्रपूरची दारू
च्दूरचित्रवाहिनीवर कौन कौन बनेगा करोडपती हा कार्यक्रम पुन्हा सुरू झाला आहे. यामध्ये एका प्रश्नासाठी चार पर्याय सुचविले जातात. या मलिकेच्या आधारावर सोशल मीडियावर चंद्रपूर जिल्ह्यातील दारूबंदीवर विनोद सर्वत्र व्हायरल केला जात आहे. यामध्ये ‘चंद्रपूर जिल्ह्यात एका फोनकॉलवर कोण आधी तुमच्या घरी पोहचेल, असा प्रश्न नमूद केला आहे. या खाली १. पिज्जा, २. पोलीस, ३. अ‍ॅम्ब्युलन्स, ४. दारू हे चार पर्याय दिलेले आहे. या संदेशावरून चंद्रपूर जिल्ह्यातील दारूबंदीसाठी पोलिसांवर लक्ष्य केल्याचे दिसून येते. दारूबंदीचा निर्णय चांगला असला तरी चंद्रपूर पोलीस त्याची अंमलबजावणी करण्यात कमी पडल्याचे जाणवते.

Web Title: Alcohol has come from 37 places in Chandurpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.