After 70 years Khadki Kollam got the road to Gudiya | ७० वर्षानंतर खडकी कोलाम गुड्याला मिळाला रस्ता
७० वर्षानंतर खडकी कोलाम गुड्याला मिळाला रस्ता

ठळक मुद्देप्रदीर्घ पाठपुराव्याला यश : गावकऱ्यांच्या चेहऱ्यावर फुलले हास्य

लोकमत न्यूज नेटवर्क
जिवती : डोंगराच्या पायथ्याशी वास्तव्याला असलेल्या खडकी येथील कोलाम गुड्यात ७० वर्षांनंतर पहिल्यांदाच रस्ता तयार करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. प्रदीर्घ पाठपुराव्यानंतर यश मिळाल्याने कोलाम बांधवांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
जिवती तालुक्यातील खडकी रायपूर ग्रामपंचायतमधील खडकी गुड्यात कोलाम बांधव राहतात. गुड्यात केवळ ११ घरे आहेत. रस्ता व अन्य मूलभूत सोयीसुविधा पोहोचल्या नाहीत. निवडणुकीला आश्वासने द्यायचे आणि निवडणूक संपली की या गुड्याकडे कुणीही फिरकत नाही. स्वातंत्र्यदिनी धरणे आंदोलने केली. जिवती तहसील कार्यालयासमोरही आंदोलन करून रस्त्याची समस्या प्रशासनाच्या लक्षात आणून दिली. अखेर कोलामगुड्यातील गंभीर समस्यांची जिल्हा प्रशासनाला अखेर दखल घ्यावी लागली. सदर रस्त्याचे काम सुरू करण्यात आले आहे.
अन्य समस्याही सोडवा
खडकी कोलाम गुडा विकासापासून वंचित आहे. कोलामांची व्यथा सर्वप्रथम ‘लोकमत’ने मांडली होती. दरम्यान, गुड्यातील मारोती सिडाम या युवकाने कोलाम विकास फाऊंडेशनच्या माध्यमातून प्रबोधनाला सुरूवात केली. रस्ता मिळाला, परंतु अन्य समस्यांकडे प्रशासनाने लक्ष देऊन सोडविण्याची मागणी केली आहे.


Web Title: After 70 years Khadki Kollam got the road to Gudiya
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.