9 crore in seven days | सात दिवसात नऊ कोटी

ठळक मुद्देमनपाची आक्रमक मोहीम : मालमत्ताधारकांकडे ४२ कोटींचा कर थकीत

रवी जवळे।
आॅनलाईन लोकमत
चंद्रपूर : शासकीय कार्यालये व खासगी व्यापाऱ्यांकडे मनपाचा ४२ कोटी तीन लाख रुपयांचा कर थकीत आहे. त्यामुळे मनपाने जप्ती मोहीम राबवून कर वसुलीचा धडाका सुरू केला आहे. मनपाच्या पथकाने एका आठवड्यात तब्बल नऊ कोटी ३३ लाख रुपयांचा कर वसूल करून मनपाच्या तिजोरीत जमा केला आहे.
मागील दोन वर्षांपासून शासकीय कार्यालये व अनेक खासगी व्यापाºयांनी मालमत्ता कर मनपा कार्यालयात जमा केलेला नाही. २०१६ या वर्षातील १६ कोटी ६७ लाख रुपये मालमत्ता कर थकित आहे तर २०१७ या वर्षातील २५ कोटी ३६ लाख रुपये कर मालमत्ताधारकांनी अद्यापही भरलेला नाही. दोन्ही मिळून ही थकित रक्कम तब्बल ४२ कोटींच्या घरात गेली आहे. उत्पन्नाचे स्रोत असे बंद झाल्याने विकासकामे करताना मनपाला अडचणी येत आहे. त्यामुळे मनपा आयुक्त संजय काकडे यांनी जप्ती मोहीम राबविण्याच्या कर विभागाला सूचना दिल्या. त्यानुसार कर विभाग प्रमुख तुकड्यादास डुमरे यांनी मोहीम सुरू केली. शहरातील २२ दुकानात धडक देऊन त्यांना कराचा भरणा करण्याची तंबी दिली. ज्या मालमत्ताधारकांनी कराचा भरणा करण्यास असमर्थता दर्शविली, त्यांच्या दुकानांना सील ठोकण्यात आले. पिंक प्लॅनेट या दुकानामालकाकडे चार लाख ५१ हजार रुपये थकित होते. त्यांच्या दुकानाला मनपाने सील ठोकले. नागपूर मार्गावरील भुप्ता यांच्या चाळीतील तीन दुकानांनाही सील ठोकले. या मोहिमेत २०१६ च्या थकितदारांकडून तीन कोटी ५८ लाख रुपये वसूल करण्यात आले तर २०१७ च्या थकितदारांकडून पाच कोटी ७५ लाख रुपये वसूल झाले आहेत.

बांधकाम विभागाकडे ४६ लाख रुपये
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अनेक इमारती मनपा हद्दीत आहेत. या इमारतींचा मालमत्ता कर अजूनही बांधकाम विभागाने मनपा कार्यालयात जमा केलेला नाही. सार्वजनिक बांधकाम विभाग १ आणि २ मिळून एकूण ४६ लाख रुपयांचा कर थकित आहे. मनपाच्या जप्ती पथकाने बांधकाम विभागाला दहा दिवसांच्या आत कराचा भरणा करा, अन्यथा सील ठोकण्याचा इशारा नोटीसद्वारे दिला आहे.
पोलीस, वनविभागाकडेही थकबाकी
शहरात असलेल्या बहुतेक शासकीय कार्यालयांकडे मनपाचा मालमत्ता कर थकित आहे. शासनाकडून निधी येत नसल्यामुळे कराचा भरणा केला जात नाही. पोलीस विभागाकडे १२ लाख रुपये थकित आहे. वनविभाग-आठ लाख रु., जिल्हा कारागृह- चार लाख रु., जिल्हा सामान्य रुग्णालय-सात लाख रु., आकाशवाणी- तीन लाख ५० हजार रुपये व इतर काही शासकीय कार्यालयांकडे मालमत्ता कर थकित आहे.

मनपाचे जप्ती पथक गोलाबाजारात
गोलबाजार ही चंद्रपुरातील फार जुनी बाजारपेठ आहे. दाटीवाटीने शेकडो दुकाने या ठिकाणी वसली आहेत. येथील अनेक दुकानमालकांनी अद्यापही मालमत्ता कर मनपा कार्यालयात जमा केलेला नाही. त्यामुळे आता मनपाचे जप्ती पथक गोलबाजारात धडकणार आहे.

मालमत्ताधारकांकडे कोट्यवधींचा कर थकित आहे. त्यामुळे मनपाला जप्ती मोहीम राबवावी लागत आहे. व्यापारी, शासकीय कार्यालये व नागरिकांनी कराचा भरणा करून सहकार्य करावे.
- तुकड्यादास डुमरे,
कर विभाग प्रमुख, मनपा चंद्रपूर.


Web Title: 9 crore in seven days
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.