15 Memorandum of Understanding between Chandrapur and Gadchiroli | १५ सामंजस्य करारांचा चंद्रपूर व गडचिरोलीला लाभ
१५ सामंजस्य करारांचा चंद्रपूर व गडचिरोलीला लाभ

ठळक मुद्देसुधीर मुनगंटीवार : हे सामंजस्य करार शहरी व ग्रामीण विकासाच्या दिशेने टाकलेले शुभलक्षणी पाऊल

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : हे सामंजस्य करार शहरी व ग्रामीण विकासाच्या दिशेने टाकलेले एक शुभलक्षणी पाऊल आहे. अनेक संस्थांनी ग्रामीण महाराष्ट्राच्या विविध क्षेत्रात एकत्र येऊन काम करण्यासाठी दाखवलेली रुची ही निश्चित स्वागतार्ह आहे. चला, सर्व मिळून काम करू महाराष्ट्राचा सर्वंकष विकास करू, असे आवाहन यावेळी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.
मंगळवारी सह्याद्री अतिथीगृहात महापरिवर्तन : भागीदार विकासाचे या कार्यक्रमांतर्गत ना. मुनगंटीवार यांच्या उपस्थितीत विविध संस्थांनी शासनाच्या विविध यंत्रणांबरोबर १५ सामंजस्य करार केले. त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी वन विभागाचे प्रधान सचिव विकास खारगे, डॉ. आनंद बंग व इतर मान्यवर उपस्थित होते. ना. मुनगंटीवार म्हणाले, या करारांमुळे महिला सक्षमीकरण, मॉडेल अंगणवाड्यांची निर्मिती, पिण्याचे शुद्ध पाणी उपलब्ध करून देण्याची व्यवस्था, कौशल्य विकासातून रोजगार निर्मिती, वन जमीनींचे वाटप करून सामूहिक वनव्यवस्थापनातून केलेला वन विकास ही सर्वच क्षेत्रे ग्रामीण महाराष्ट्राला अधिक सशक्त आणि बलवान करणारी आहेत.
असे झाले सामंजस्य करार
टाटा ट्रस्टने चंद्रपूर जिल्ह्यातील जिवती, मुल आणि पोंभूर्णा तर गडचिरोलीत जिल्ह्यातील भामरागड आणि कुरखेडा या तालुक्यात एकात्मिक बाल विकास सेवा योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीतून कुपोषण निर्मूलन आणि मॉडेल अंगणवाडींच्या निर्मितीचा सामंजस्य करार केला. याचा चंद्रपूर जिल्ह्यातील २ लाख तर गडचिरोली जिल्ह्यातील १ लाख ६४ हजार ४११ लाभार्थ्यांना लाभ मिळेल. मॅजिक बस आणि जिल्हाधिकारी चंद्रपूर यांच्यात झालेल्या सामंजस्य कराराद्वारे चंद्रपूर येथे प्रोजेक्ट मॅनेजमेंट युनिट स्थापन करून शिक्षण आणि कौशल्य विकास यांची सांगड घालताना नावीन्यपूर्ण उपक्रमांची अंमलबजावणी केली जाईल. तीन वर्षात अतिरिक्त ७५ हजार मुलांपर्यंत पोहचण्याचा प्रयत्न आहे. यात शिक्षकांचे प्रशिक्षण हा घटक असून विद्यार्थ्यांमध्ये जीवन कौशल्यांचा विकास कसा करावयाचा हे सांगितले जाईल. सेफ वॉटर नेटवर्क आणि जिल्हाधिकारी चंद्रपूर व गडचिरोली यांच्यातील सामंजस्य कराराद्वारे चंद्रपूर जिल्ह्यात १० वॉटर स्टेशन्स स्थापन करण्यात येतील. जे स्वंयसहाय्यता बचतगटामार्फत चालवले जातील. याचा दोन लाख लोकांना लाभ होईल तर गडचिरोली जिल्ह्यातही एक लोकांसाठी शुद्ध पिण्याच्या पाण्यासाठी १० वॉटर स्टेशन्स स्थापन करण्यात येतील. कम्युनिटी फॉरेस्ट राईटसच्या प्रभावी अंमलबजावणीतून वनांचे जतन, संवर्धन करताना आदिवासी बांधवांना रोजगार उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने विभागीय आयुक्त अमरावती व नागपूर यांच्यात सीएफआरए मॉडेल अंमलबजावणीसाठी करार झाला.


Web Title: 15 Memorandum of Understanding between Chandrapur and Gadchiroli
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.