ठळक मुद्देसकाळी उठल्यावर आपल्या खर्चाचा टोन फक्त सेट कराजो खर्च होतोय तो खरोखरच योग्य कारणासाठी आहे का, हा खर्च मी पुढे ढकलला तर चालणार आहे का, नाहीच केला तर काय बिघडेल.. असा फक्त विचार करायचा.त्यासाठी दिवसातला एक मिनिट पुरेसा आहे.

- मयूर पठाडे

खर्चावर नियंत्रण ठेवा, फार खर्च करू नका, वायफळ खर्च तर अजिबातच नको.. हे आपल्यालाही पटतंच.. त्याला विरोध कोणाचा असणार आहे?.. पण खरंच आपण तसं करतो, वागतो? किंवा तशी कृती प्रामाणिकपणे आपल्याकडून घडते?.. खरं सांगायचं तर त्याबाबत आपण सिस्टेमॅटिक पद्धतीनं विचारच केलेला नसतो. गरज पडली, म्हणून घेतली वस्तु, केला खर्च.. असं प्रत्येकाचंच होतं. त्याबाबत फार विचार कोणीच केलेला नसतो, पण लोकांच्या खर्चाच्या मानसिकतेचा अभ्यास केलेले तज्ञ आता सांगतात, त्यासाठी फार अभ्यास करण्याचीही गरज नाही, नजर मात्र असायलाच हवी. आपल्या खिशातून पैसा कसा जातो, कुठे जातो, कशासाठी जातो, याकडे नुसती नजर असली, तरी आपण आपला पैसा वाचवून शकतो आणि त्याला अटकाव घालू शकतो.
यासंदर्भात अनेक अभ्यासकांचं आता म्हणणं आहे, त्यसाठी फार नाही, दिवसाचे तुमचे केवळ साठ सेकंद पुरेसे आहेत. सकाळी उठल्यावर तुमच्या खर्चाचा टोन फक्त सेट करा, त्याच्या बाहेर जाऊ नका आणि दिवसभरात मी आज माझा जो काही खर्च होईल, तो या दिशेच्या पलीकडे होणार नाही, याकडे लक्ष ठेवा.. तो खरोखरच योग्य कारणासाठी आहे का, हा खर्च मी पुढे ढकलला तर चालणार आहे का, नाहीच केला तर काय बिघडेल.. असा फक्त विचार करायचा. त्यासाठी दिवसातला एक मिनिट पुरेसा आहे.
यासंदर्भात एक मोठा अभ्यसही करण्यात आला. हा अभ्यास सांगतो, रोज सकाळचा हा फक्त एक मिनिट तुमचे खूप पैसे वाचवतो आणि तुमच्या खर्चावर बंधनं टाकतो. हे आपोआप घडतं.. अशा अनावश्यक खर्चाला आपण आळा घातला तर आपल्याही घरातील पैशाची पुंजी हळूहळू वाढू लागेल आणि अंतिमत: तुमच्या लक्षात येईल, अरे, हा खर्च जर आपण अगोदरच टाळला असता, तर खरोखरच आवश्यक असणाºया कितीतरी गोष्टींसाठी, आपल्या, आपल्या मुलाबाळांच्या भवितव्यासाठ हा पैसा आपल्याला वापरता आला असता..
काही हरकत नाही, ही एक मिनिटाची ट्रिक आपल्याला आता कळली आहे. त्याचा वापर करुन आपल्या घरातलं पैशाचं झाड आपण वाढवू! लखपती, करोडपती होऊ!..