ठळक मुद्देस्मार्ट काम करा, काम प्रेझेण्ट करा, मागेमागे राहू नका.

-चिन्मय लेले

आपण सगळेच मन लावून काम करतो, म्हणजे आपल्याला तरी तसंच वाटतं. पण तरी आपलं करिअर शाइन करत नाही, काही जेमतेम कुवतीची माणसं आपल्यापुढे निघून जातात, पण आपल्याला हवं तसं यश मिळत नाही. आपण ढोर मेहनत करुनही मागेच पडतो, असं का होतं? याची अनेक उत्तरं आहेत, पण तरी तीन चूका आपण हमखास करतो ज्यानं आपल्या करिअरचा स्पीड मंदावतोच, आपलं कामही झाकोळलं जातं. या चूका तुम्हीही करताय का? तपासून पहा.

1) आपल्याला नेमकं काय करायचं हेच माहिती नाही.

आहे त्या नोकरीचा कंटाळा येतो. हे काम नको होतं. पण पुढे काय? याचं उत्तर नसतं. आपल्या आहे त्याच नोकरीतही पुढे काय करायचं? तू काय करशील? या प्रश्नांची उत्तरं नसतात. आणि मग जे करतो तेच आवडत नाही इथंच गाडं अडतं. करिअर पुढे सरकायचं तर आपल्याला नेमकं काय करायचं हे ठरवता यायला हवं. ते चुकेलही, पण नेमकं हवं काय ते ठरवाच. 
त्यातून मग फोकस नाही
काय करायचं हेच माहिती नाही, तर वर्तमानात फोकस काय करणार? भविष्याचं प्लॅनिंग काय करणार? नाहीच होतं. म्हणून मग आपण आहे तिथंच गोलगोल फिरतो. अनेकजण नोकर्‍या बदलतात पण करिअरवाढ होत नाही.

2) ढोर मेहनत करताय?
आता ही काय चूक झाली का? पण आजच्या काळात ही चूकच आहे. म्हणजे होतं काय की आपण खूप काम करतो. पण तेच ते चाकोरीचं, रोजचं. बॉस काय म्हणतो रोजचं काम केलं ते ठीक, पण वेगळं काय केलं?
मग आपण गप्प. कारण आपल्या कामात क्रिएटिव्हीटी नाही, वेगळेपणा नाही. नवीन काम करायला फुरसतच नाही. परिणाम, जे थोडं पण वेगळं करतात ते दिसतात. आपण मागेच. तेव्हा ढोर मेहनत सोडा. स्मार्ट व्हा. कामाचा प्राधान्यक्रम ठरवा.

3) काम दाखवता येत नाही.
अनेकांना हे वाक्य आवडत नाही. पण आजकाल इतरांचं काम कुणाला दिसत नाही. बॉसला नाही, व्यवस्थापनाला नाही. ते आपण नीट दाखवलं पाहिजे. प्रेझेण्ट केलं पाहिजे. मांडलं पाहिजे. तरच लोक त्याची दखल घेतात. न बोलणार्‍याचे गहूही विकले जात नाही हे लक्षात ठेवलेलं बरं!