सप्ताहाच्या प्रारंभी तांत्रिक कारणाने राष्ट्रीय शेअर बाजारात व्यवहार न होऊनही गुंतवणूकदारांनी दाखविलेल्या विश्वासामुळे पाचपैकी चार दिवस निर्देशांकांनी नवनवीन उच्चांक गाठून सप्ताह गाजविला. सप्ताहामध्ये संवेदनशील निर्देशांक आणि निफ्टीने अनुक्रमे ३२ हजार आणि ९९०० अंशांचा टप्पा ओलांडला. सलग चौथ्या सप्ताहात निर्देशांक वाढीव पातळीवर बंद झाला असून मार्चच्या मध्यानंतरची सर्वाधिक साप्ताहिक वाढ या सप्ताहामध्ये नोंदविली गेली आहे.
मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सप्ताहाच्या प्रारंभीच वाढीव पातळीवर खुला झाला. सप्ताहामध्ये त्याने ३२१०९.७५ ते ३१४७१.४१ अंशांदरम्यान आंदोलने घेतली. सप्ताहाच्या अखेरच्या दिवशी विक्रीच्या दबावाने काहीसा खाली येऊन तो ३२०२०.७५ अंशांवर बंद झाला. मागील बंद निर्देशांकाच्या तुलनेमध्ये तो ६६०.१२ अंश म्हणजेच २.१० टक्क्यांनी वाढून बंद झाला. मुंबई शेअर बाजारातील साप्ताहिक उलाढाल ९१५०.१३ कोटी रुपयांनी वाढून २६५५०.३४ कोटी रुपयांची झाली.
राष्ट्रीय शेअर बाजारातही जोरदार तेजी अनुभवायास मिळाली. सोमवारी तांत्रिक कारणाने जवळपास संपूर्ण दिवसभर व्यवहार बंद राहूनही सप्ताहात येथील निर्देशांक (निफ्टी) २.२८ टक्के म्हणजेच २२०.५५ अंशांनी वाढून ९८८६.३५ अंशांवर बंद झाला. तत्पूर्वी त्याने ९९०० अंशांचा उंबरठा ओलांडला होता. मिडकॅप आणि स्मॉलकॅप या क्षेत्रीय निर्देशांकांमध्येही अनुक्रमे १.६४ आणि ०.४९ टक्के वाढ झाली.
अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हने लवकरच व्याजदरातील वाढीचे संकेत दिले आहेत. त्याचप्रमाणे भारतातील ग्राहक मूल्य निर्देशांकावर आधारित चलनवाढीमध्ये झालेली घट येथील व्याजदर घटवू शकते अशी अटकळ बांधली जात आहे. याच कारणामुळे बहुदा परकीय वित्तसंस्थांनी सप्ताहामध्ये १४५९.८६ कोटी रुपयांच्या समभागांची खरेदी केली. साखरेवर वाढविलेले आयात शुल्क आणि सरकारने घेतलेले अन्य निर्णयही वाढीसाठी लाभदायक ठरले.
-(शेअर समालोचन, प्रसाद गो. जोशी)