lokmat Supervote 2024
Lokmat Money > बिझनेस न्यूज > व्होडाफोन-आयडिया ठरणार देशातील सर्वांत मोठी कंपनी

व्होडाफोन-आयडिया ठरणार देशातील सर्वांत मोठी कंपनी

By ऑनलाइन लोकमत | Published: September 1, 2018 06:45 AM2018-09-01T06:45:18+5:302018-09-01T06:45:52+5:30

Vodafone-Idea will be the country's largest company | व्होडाफोन-आयडिया ठरणार देशातील सर्वांत मोठी कंपनी

व्होडाफोन-आयडिया ठरणार देशातील सर्वांत मोठी कंपनी

नवी दिल्ली : आयडिया सेल्युलर आणि व्होडाफोन इंडिया या कंपन्यांच्या विलीनीकरणाची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. विलीनीकरणानंतर तयार झालेली नवी कंपनी भारतातील सर्वांत मोठी दूरसंचार कंपनी बनली आहे. दोन्ही कंपन्यांनी एक संयुक्त निवेदन जारी करून विलीनीकरणाची माहिती दिली. व्होडाफोन-आयडिया लि. असे नव्या कंपनीचे नाव असून, कंपनीचे ४0८ दशलक्ष ग्राहक आहेत.

नव्या कंपनीसाठी १२ सदस्यांचे संचालक मंडळ स्थापन केले आहे. त्यात ६ स्वतंत्र संचालक आहेत. कुमारमंगलम बिर्ला हे नव्या कंपनीचे चेअरमन आहेत. संचालक मंडळाने लगेचच कारभार सुरू केला असून, बालेश शर्मा यांची सीईओपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, दोन्ही कंपन्या एकत्र करण्यात आल्या असल्या तरी व्होडाफोन आणि आयडिया हे ब्रँड कायम राहतील. दोघांचा मिळून ३२.२ टक्के बाजार हिस्सा कंपनीकडे असेल. देशातील नऊ दूरसंचार मंडळांत कंपनी सर्वोच्च स्थानी राहील. सध्या भारती एअरटेल ही कंपनी पहिल्या स्थानी होती, तिच्या स्थानाला आता धक्का लागणार आहे. ३0 जून २0१८ रोजीच्या स्थितीनुसार, कंपनीचे कर्ज १,0९,२00 कोटी रुपये आहे. विलीनीकरण शुल्कापोटी कंपनीने दूरसंचार विभागास ३,९00 कोटी रुपये दिले असून, त्यानंतर कंपनीकडे १९,३00 कोटी रुपयांची रोख शिल्लक आहे.

विलीनीकरणाने खर्चात होईल बचत

रिलायन्स जिओचे दूरसंचार क्षेत्रात आगमन झाल्यानंतर बदललेल्या परिस्थितीत दोन्ही कंपन्यांचे विलीनीकरण करण्यात आले आहे. नव्या कंपनीचे ३.४ लाख स्थानांवर ब्रॉडबँड नेटवर्क असेल.

तसेच देशात १७ लाख किरकोळ विक्रीची केंद्रे असतील. विलीनीकरणामुळे कंपनीला दरवर्षी १४ हजार कोटी रुपयांचा लाभ होईल. कंपनीच्या महसुली खर्चात ८,४00 कोटींची बचत होईल.

Web Title: Vodafone-Idea will be the country's largest company

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.