Spying through 40 apps with sharetaker, trackroller? China relations | शेअरईट, ट्रूकॉलरसह ४० अ‍ॅप्सद्वारे हेरगिरी? चीनशी संबंध

नवी दिल्ली : वुईचॅट, यूसी न्यूज, न्यूज-डॉग, ट्रूकॉलर आणि शेअरईट यासारख्या ४० पेक्षा जास्त मोबाइल अ‍ॅप्स चीनशी लिंक असल्याचे समोर आले असून, सरकारने या अ‍ॅप्सची छाननी सुरू केली आहे. चिनी सीमेवर तैनात असलेल्या जवानांना आपल्या मोबाइलमधून हे अ‍ॅप्स डिलिट करण्याच्या सरकारने याआधीच दिल्या आहेत.
सूत्रांनी सांगितले की, चिनी कंपन्यांनी बनवलेले अथवा चीनशी लिंक असलेले मोबाइल अ‍ॅप्स हे एकतर स्पायवेअर असतात अथवा मालवेअर असतात. ते हेरगिरीसाठी आणि सायबर घातपातासाठी वापरण्यात येत असल्याची गोपनीय माहिती आहे. त्यामुळे जवानांना हे अ‍ॅप्स उडवून आपले मोबाइल फॉरमॅट करण्यास सांगण्यात आले आहे. वुईचॅट हे मेसेजिंग प्लॅटफॉर्म आहे. यूसी न्यूज हे चीनच्या अलीबाबाने विकसित केलेले अ‍ॅप आहे. वुईइबो हे मायक्रो ब्लॉगिंग अ‍ॅप आहे. शेअरईट फाइल हस्तंतरित करण्यासाठी वापरले जाते. न्यूज-डॉग हे बातम्या पुरविते.
दरम्यान, ट्रूकॉलरच्या वतीने प्रसिद्धीस देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, आमचा चीनशी काहीही संबंध नाही. आमची कंपनी स्वीडनची आहे. आमच्या अ‍ॅपची का चौकशी केली जातेय, हेच आम्हाला कळेनासे झाले आहे.
काही महिन्यांपूर्वी सरकारने सुमारे दोन डझन स्मार्टफोन उत्पादक कंपन्यांना मोबाइल सुरक्षाविषयक कोणती प्रक्रिया व साधने वापरली जातात याची माहिती सादर करण्याचे आदेश दिले होते. यात बहुतांश कंपन्या चीनच्या आहेत.

चिनी कंपन्यांचा हिस्सा ५० टक्के

शिओमी, ओप्पो, विवो आणि जिओनी या चिनी कंपन्यांचा भारतातील १० अब्ज डॉलरच्या स्मार्टफोन बाजारात अर्ध्यापेक्षा जास्त हिस्सा आहे. बहुतांश कंपन्यांचे सर्व्हर चीनमध्ये आहे. शिओमीचे सर्व्हर सिंगापूर आणि अमेरिकेत आहे. या कंपन्यांनी दिलेल्या माहितीचा सरकार अभ्यास करीत आहे. या अ‍ॅप्सच्या यादीत मी व्हिडिओ कॉल, बायडू मॅप्स, मी स्टोअर, हाय सिक्युरिटी लॅब यांचा समावेश आहे.