मुंबई : स्टेट बँक आॅफ इंडियाच्या ग्राहकांना कार्ड पेमेंटसाठी आता कार्ड स्वाइप करण्याची आवश्यकता भासणार नाही, कारण एसबीआयने पेमेंटचे नवे तंत्र आणले आहे. यात तुमचा मोबाइल स्वाइप मशीनच्या जवळ नेल्यास तुमचे पेमेंट होऊन जाईल. या माध्यमातून ग्राहक कॉन्टेक्टलेस पेमेंट करू शकतील.
‘होस्ट कार्ड इम्युलेशन’ (एचसीई) द्वारे सहज पेमेंट करता येणार आहे. एसबीआय यासाठी आपले अ‍ॅप्लिकेशन अद्ययावत करत आहे. एसबीआयचे ग्राहक पूर्वीपासूनच कार्डऐवजी स्मार्टफोनचा वापर करत आहेत. त्यासाठी बँकेने सॅमसंग पे प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिला आहे. पुढील महिन्यापासून कार्ड स्वाइपचे नवे तंत्र बँक आणणार आहे.
एसबीआय कार्डचे सीईओ विजय जसुजा यांनी सांगितले की, आम्ही भारत क्यूआर कोडसाठी कार्ड सक्षम केली आहेत. नोटाबंदीपूर्वी दर महिन्याला ६० हजार कार्ड ग्राहकांना वितरित होत होती. नोटांबदीनंतर मासिक १ लाख कार्ड वितरित होऊ लागली. आता हे प्रमाण मासिक २ लाख कार्ड आहे. सध्या १५ ते २० टक्के कार्ड बिग बझार आणि टाटासारख्या सहयोगी कंपनीकडून येतात.

काय आहे होस्ट कार्ड इम्युलेशन?
मोबाइल पेमेंटची ही सुविधा बँकेच्या अ‍ॅपवर आधारित असते. ग्राहकाने आपल्याजवळच्या नीअर फिल्ड कम्युनिकेशनजवळ (एनएफसी) आपला मोबाइल नेल्यास पेमेंट होईल. त्यामुळे एसबीआयच्या ग्राहकांना आता दुकानात नगद किंवा कार्ड सोबत नेण्याची आवश्यकता नाही.

मोबाइलचे महत्त्व वाढतेय
सरकारने डिजिटल पेमेंटला चालना दिल्यानंतर मोबाइलद्वारे व्यवहार वाढले आहेत. भीम अ‍ॅपमधून निधीचे हस्तांतरण सहज होत आहे.
एकूणच आर्थिक व्यवहारात मोबाइलचे (आणि क्रमांक) महत्त्व वाढले आहे. सर्व नियम पाळल्यास हे व्यवहार अतिशय सुरक्षित असल्याचा दावा तज्ज्ञ करत आहेत..


Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.