कारची विक्री २०१७ मध्ये ४ वर्षांच्या उच्चांकावर, जीएसटीचा फायदा, ३0 लाखांहून अधिक वाहनांची खरेदी

By लोकमत न्यूज नेटवर्क on Wed, January 03, 2018 1:10am

२०१७ मध्ये कारच्या विक्रीने ४ वर्षांचा उच्चांक केला आहे. जीएसटीचा फायदा झाल्यामुळे २०१३ नंतर प्रथमच कारविक्रीचा आकडा ३० लाखांच्या वर गेला आहे. नोटाबंदीचा अडथळाही कारविक्रीची घोडदौड रोखू शकला नाही.

नवी दिल्ली : २०१७ मध्ये कारच्या विक्रीने ४ वर्षांचा उच्चांक केला आहे. जीएसटीचा फायदा झाल्यामुळे २०१३ नंतर प्रथमच कारविक्रीचा आकडा ३० लाखांच्या वर गेला आहे. नोटाबंदीचा अडथळाही कारविक्रीची घोडदौड रोखू शकला नाही. कार उद्योगातून मिळालेल्या माहितीनुसार, २०१७ मध्ये प्रवासी वाहनांची विक्री ९.२ टक्क्यांनी वाढून ३.२ दशलक्षावर गेली. २०१६ मध्ये २.९ दशलक्ष प्रवासी वाहने विकली गेली होती. ही आकडेवारी हंगामी स्वरूपातील असून, अंतिम आकड्यांत आणखी वाढ होऊ शकते. सूत्रांनी सांगितले की, २०१७ ची सुरुवात नोटाबंदीच्या छायेत झाली होती. ८ नोव्हेंबर २०१६ रोजी करण्यात आलेल्या नोटाबंदीचा परिणाम होऊन अर्थव्यवस्था ठप्प झालेली होती. खरेदीसाठी लोकांकडे पैसेच नव्हते. शोरूम ग्राहकांअभावी ओस पडलेले होते. या मंदीतून जीएसटीने उद्योगाला बाहेर काढले. जीएसटी लागू झाल्यानंतर किमती वाढण्याचा धोका लक्षात घेऊन लोकांनी जोरदार खरेदी केली. पुढे सणासुदीच्या काळातही जोरदार खरेदी झाली. मारुती सुझुकीचे चेअरमन आर. सी. भार्गव यांनी सांगितले की, सरत्या वर्षात कार उद्योगाने चांगली कामगिरी केली आहे. आम्ही आता नव्या वर्षाकडे अपेक्षेने पाहत आहोत. २०१७ मध्ये कंपनीने १.६ दशलक्ष कार विकल्या. कंपनीच्या विक्रीत तब्बल १५ टक्के वाढ झाली. भारतात विकल्या गेलेल्या प्रत्येक २ कारमध्ये एक कार मारुतीची आहे. ह्युंदाई इंडियाचे संचालक (सेल्स अँड मार्केटिंग) राकेश श्रीवास्तव यांनी सांगितले की, जीएसटीमध्ये किमती वाढण्याच्या भीतीने लोकांनी मोठ्या प्रमाणात खरेदी केल्यामुळे एप्रिल ते जून या तिमाहीत कार विक्रीचा वेग मजबूत राहिला. कार उद्योगातील सूत्रांनी सांगितले की, २०१७ मध्ये एसयूव्ही श्रेणीतील गाड्यांच्या विक्रीने उद्योगाला मोठा हातभार लावला. मारुतीची ब्रेझा, ह्युंदाईची क्रेटा आणि जीपची कंपास या गाड्यांनी उत्तम कामगिरी केली. मान्सूनने दिला हात चांगल्या मान्सूनचाही कार उद्योगाला फायदा झाला. सियामचे उपमहासंचालक सुगातो सेन यांनी सांगितले की, गेल्या २ ते ३ वर्षांच्या तुलनेत यंदा पाऊस चांगला राहिला. त्याचा परिणाम म्हणून कारची मागणी वाढली. यंदा सणासुदीचा हंगामही विक्रीसाठी चांगला राहिला. त्यामुळे एप्रिलपासून वाढलेली विक्रीची गती पुढे वर्ष संपेपर्यंत कायम राहिली. 2018 हे वर्षही आमच्यासाठी चांगले राहील, अशी आम्हाला अपेक्षा आहे. ९.२ टक्क्यांची वाढ 2017 32 लाख विक्री 2016 29 लाख

संबंधित

आंबोलीत बॅटरी आॅपरेट कार, पर्यटन सफारीसाठी निर्णय : पहिल्या टप्प्यात दहा कार
नवरात्रोत्सवामुळे फुल बाजारात सुगंधाचा दरवळ; दसऱ्यासाठी मागणी वाढली
लवकरच बदलणार तुमचं ड्रायव्हिंग लायसन्स, हे मिळणार नवे फीचर
कोल्हापूर : लालभडक कलिंगडे बाजारात, सीताफळ, सफरचंदांसह फळांची आवक वाढली
जुलैपासून एकाच पद्धतीचे वाहन परवाने

व्यापार कडून आणखी

मंदीमुळे उत्पादनांना मागणीच नाही
एसबीआय बँकेच्या माजी अध्यक्षा 'अरुंधती भट्टाचार्य रिलायन्सच्या संचालकपदी'
रिलायन्सची हॅथवे अन् डेनशी भागीदारी, जिओच्या ग्राहकांना मिळणार जबरदस्त स्पीड
रिलायन्सला केवळ 3 महिन्यात 9516 कोटींचा निव्वळ नफा
रिलायन्सची रेकॉर्डब्रेक कमाई, दुसऱ्या तिमाहीत कमावला बंपर नफा 

आणखी वाचा