नवी दिल्ली, दि. 11 -  रिझर्व्ह बॅंकेने (आरबीआय) सरकारला तीस हजार कोटी रुपयांचा लाभांश जाहीर केल्यानंतर  माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी सरकारवर ट्विटरच्या माध्यमातून टीका केली. लाभांश घेणा-या सरकारने आधी आरबीआयला नोटाबंदीमुळे बसलेला आर्थिक फटका भरुन द्यावा, असा टोला लगावला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या वर्षी नोटाबंदी जाहीर केल्यानंतर 500 आणि 2000 रुपयांच्या नव्या नोटा चलनात आल्या. या नोटा प्रिन्ट करण्यासाठी आरबीआयला आत्तापर्यंत कोट्यावधी रुपयांचा खर्च आला आहे. याच खर्चावर बोट ठेवत चिदंबरम यांनी सरकारला धारेवर धरले आहे. 

काय म्हणाले चिदंबरम?

नोटा बंदीचा खर्च किती? आरबीआयने 50,000 कोटी रुपये नव्या नोटांवर खर्च केल्याचे जाहीर केले आहे. मात्र, याबाबत सखोल माहिती आरबीआय देईल का? नोटाबंदीमुळे फायदा झाला की तोटा हे सांगेल का?  चलनातून बाद करण्यात आलेल्या नोटा आणि नव्याने चलनात प्रिन्ट करण्यात आलेल्या नोटांवर किती खर्च करण्यात आला, याबाबत आरबीआय माहिती देणार का, असा सवालही त्यांनी ट्विटरवरुन केला आहे.

जमा खर्चाचा मुद्दा का उपस्थित झाला?

2016-17 या वित्त वर्षासाठी आरबीआयकडून भारत सरकारला केवळ 30,659 कोटी रुपयांचा लाभांश दिला जाणार आहे. गेल्या वर्षी आरबीआयने 65,876 कोटी रुपयांचा लाभांश दिला होता. यंदा लाभांशाची ही रक्कम निम्म्यावर आली आहे. हाच धागा पकडत पी. चिदंबरम यांनी आरबीआय आणि केंद्र सरकारला धारेवर धरले. आरबीआयकडून सरकारला देण्यात येणाऱ्या या लाभांशात नोटाबंदीची किंमत म्हणून आणखी 50 हजार कोटी रूपयांची भर घातली पाहिजे, असे चिदंबरम यांनी म्हटले.