लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : दूरसंचार क्षेत्रात धमका करणाऱ्या रिलायन्स जिओने आपल्या दरांत काही प्रमाणात वाढ केल्यामुळे भारती एअरटेल, व्होडाफोन आणि आयडिया सेल्यूलर या स्पर्धक कंपन्यांकडूनही दरवाढ केली जाण्याची शक्यता जाणकारांनी व्यक्त केली. तथापि, रिलायन्सचा बहुचर्चित ४जी फिचर फोन आल्यानंतरच स्पर्धक कंपन्या दरवाढीचे धाडस करतील, असे विश्लेषकांनी सांगितले.
मध्यस्थ संस्था यूबीएसने जारी केलेल्या टिपणात म्हटले आहे की, रिलायन्सच्या स्पर्धक कंपन्यांकडून दरवाढ केली जाण्याची शक्यता असली, तरी या कंपन्या रिलायन्स आणि आपल्या दरांत १५ ते २0 टक्क्यांचा फरक ठेवतील. जिओचा फिचर फोन लाँच झाल्यानंतर दरवाढीची घोषणा होऊ शकते. आपली ब्रँड व्हल्यू कमी होऊ नये, यासाठी विद्यमान कंपन्या रिलायन्सपेक्षा थोडा अधिक दर ठेवतील.
भारतात सध्या २जी फोन वापरणाऱ्यांची संख्या अधिक आहे. त्यांना ४जीच्या नेटवर्कमध्ये आणण्यासाठी रिलायन्सने स्वस्त ४जी फिचर फोन आणण्याचा निर्णय घेतला आहे. एचएसबीसीच्या अंदाजानुसार, या फोनची किंमत फक्त ५00 रुपये असेल. नव्या फिचर फोन ग्राहकांसाठी जिओचे डाटा दरही कमालीचे स्पर्धात्मक असतील. त्यामुळे विद्यमान कंपन्या निर्णयासाठी फिचर फोनची वाट पाहत आहेत.
जिओने आपल्या धन धना धन आधार प्लॅनचा दर ५0 टक्क्यांनी वाढविला आहे. हा दर ९५ रुपयांवरून १४२ रुपयांवर गेला आहे. या वाढीनंतरही कंपनीचा दर स्पर्धात्मकच आहे.
याशिवाय जिओने आपल्या ३0९ रुपयांच्या प्लॅनमध्ये व्हॅलिडिटी पीरिअड आणि मोफत डाटा यातही कपात केली आहे. हा प्लॅन आता २ महिन्यांसाठी वैध असेल. या काळात ५६ जीबी डाटा ग्राहकास मिळेल. आधी हा प्लॅन ३ महिन्यांसाठी होता, तसेच त्यात ८४ जीबी डाटा होता.
>दरात स्थैर्य उपयुक्तच
‘सेल्युलर आॅपरेटर्स असोसिएशन आॅफ इंडिया’चे महासंचालक राजन मॅथ्यूज यांनी सांगितले की, दरात स्थैर्य आल्यास दूरसंचार उद्योगास उपयुक्तच ठरेल. तथापि, दरयुद्ध संपले, असे आताच म्हणता येणार नाही. बाजार अजूनही तीव्र पातळीवर स्पर्धात्मक आहे. खरे दर स्थैर्य येण्यास अजून तीन ते चार तिमाहींचा कालावधी लागेल.