Lokmat Money > बिझनेस न्यूज > पीएनबीचे मानांकन घटले; घोटाळ्याचा परिणाम

पीएनबीचे मानांकन घटले; घोटाळ्याचा परिणाम

मूडीजने बँकेचे अंतर्गत नियंत्रण कमजोर असल्याचे ताशेरेही ओढले आहेत.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2018 12:07 AM2018-05-22T00:07:58+5:302018-05-22T00:07:58+5:30

मूडीजने बँकेचे अंतर्गत नियंत्रण कमजोर असल्याचे ताशेरेही ओढले आहेत.

PNB rating dropped; The result of the scandal | पीएनबीचे मानांकन घटले; घोटाळ्याचा परिणाम

पीएनबीचे मानांकन घटले; घोटाळ्याचा परिणाम


मुंबई : नीरव मोदी याने केलेल्या १३,४०० कोटी रुपयांच्या महाघोटाळ्यामुळे आंतरराष्ट्रीय मानक संस्था मूडीजने पंजाब नॅशनल बँकेचे (पीएनबी) मानांकन घटविले आहे. मूडीजने बँकेचे अंतर्गत नियंत्रण कमजोर असल्याचे ताशेरेही ओढले आहेत.
मूडीजने बँकेचे मानांकन परिदृश्य मात्र स्थिर ठेवले आहे. बँकेने घोटाळ्याचा परिणाम मोठ्या प्रमाणात पचवला आहे, असा या परिदृश्याचा अर्थ होतो. मूडीजने पीएनबीचे मानांकन घटवून बीए१/एनपी केले आहे. आधी ते बीएए३/पी-३ होते. याशिवाय बँकेचे आधारभूत ऋण आकलन बी१ करण्यात आले आहे. आधी ते बीएए३ होते.
गेल्या फेब्रुवारीत पीएनबीमध्ये १३,४०० कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचे उघडकीस आले होते. हा घोटाळा समोर आल्यानंतर मूडीजने बँकेचा आढावा सुरू केला होता. बँकेला सरकारकडून काही भांडवल मिळू शकेल, असे मूडीजला वाटते. याशिवाय बँक आपल्या काही संकीर्ण मालमत्ता विकूनही काही भांडवल उभे करू शकते. बँकेला विक्री करता येईल अशा संपत्तीत काही जमीन जुमला आणि उपकंपनी पीएनबी हाऊसिंग फायनान्समधील हिस्सेदारीचा समावेश आहे. या उपाययोजना केल्या तरी बँकेची आर्थिक स्थिती घोटाळ्यापूर्वीच्या स्थितीत येऊ शकणार नाही.


बाह्य भांडवलाची गरज
मूडीजने म्हटले आहे की, बासेल तीन सीईटी-१ चे गुणोत्तर मार्च २०१९ पर्यंत आठ टक्क्यांपर्यंत आणण्यासाठी बँकेला २०१८-१९ मध्ये किमान १२ हजार कोटी ते १३ हजार कोटी रुपयांच्या बाह्य भांडवलाची गरज लागेल.

नीरव मोदीच्या १७० कोटींच्या मालमत्ता जप्त
पंजाब नॅशनल बँकेकडून घेतलेली १३ हजार कोटी रुपयांहून अधिक कर्जे बुडवून देशाबाहेर फरार झालेला हिरे व्यापारी नीरव मोदी याच्याशी संबंधित १७० कोटी रुपयांच्या मालमत्तांवर अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) सोमवारी जप्ती आणली.

पीएनबी घोटाळ्यासंबंधी सीबीआयने नीरव मोदी आणि त्याच्या कंपन्यांविरुद्ध फौजदारी गुन्हे नोंदवून आरोपपत्र दाखल केल्यानंतर ‘ईडी’नेही मनी लॉड्रिंग कायद्यान्वये तपास सुरु केला आहे. याचाच एक भाग म्हणून हा हंगामी जप्तीचा आदेश सोमवारी जारी करण्यात आला, असे ‘ईडी’मधील सूत्रांनी सांगितले. सक्षम प्राधिकाऱ्यांनी शिक्कामोर्तब केल्यावर ही जप्ती कायम होईल.सूत्रांनुसार ज्या मालमत्तांवर जप्ती आणली गेली आहे त्यात नीरव मोदी व त्याच्या कंपन्यांची अनेक बँक खाती, स्थावर मालमत्ता व शेअरसह अन्य प्रकारची गुंतवणूक यांचा समावेश आहे.

Web Title: PNB rating dropped; The result of the scandal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.